पान:पायवाट (Payvat).pdf/177

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रश्नाचा विचार करण्याची गरजच उरत नाही. खरे म्हणजे या. पद्धतीने या प्रश्नाचा विचार करता येणार नाही. जे कलात्मक असते ते अश्लील नसते, हे जरी मान्य केले तरी कोणते वाङ्मय कलात्मक आहे यावर एकमत होण्याचा संभव नसतो. जर 'काहीजणां'ना एक नाटक आणि कादंबरी कलात्मक आहे असे वाटत असेल, आणि इतर अनेकांना ती अश्लील आहे असे वाटत असेल, तर याठिकाणी निर्णय बहुमताच्या आधारे करावा की काय ? आणि बहुमत नेहमी कलावंताच्याविरुद्ध जाणार आहे हे आपण समजून घेतले पाहिजे. जे काहीजणांना कलात्मक वाटते ते इतर कितीही जणांना अश्लील वाटते, तरी काहीजणांच्या इच्छेखातर त्या वाङ्मयाला कलाकृतीचे संरक्षण मिळावे ही अपेक्षा व्यवहारात फलदायी होण्याचा संभव कमी आहे.
 वाङ्मयीन कलाकृती किंवा इतर कलाप्रकारांतील कलाकृती या एकदा निर्माण झाल्यानंतर त्या समाजाच्या मालकीच्या वस्तू होतात. त्यांच्याविषयी बरेवाईट बोलण्याचा जसा समाजाचा अधिकार असतो, · तसा या वस्तूंचे भवितव्य ठरविण्यासाठी समाजाचा अधिकार असतो; आणि हा समाज कलान्तर्गत व्यवहाराच्या शिस्तीपासून कलाकृतीकडे जाईल याची हमी कुणीच देणार नसते. कलाकृतींना शेवटचे संरक्षण कायदा देत नसतो. हे शेवटचे संरक्षण तिच्यावर प्रेम करणारे रसिक देत असतात. यां रसिकांना एखादी कलाकृती अश्लील नाही हे समजावून सांगण्याची जबाबदारी जर घेतली जाणार नसेल, तर मग या वाङ्मयाचे भवितव्य फार कठीण आहे आणि समाजात उठणाऱ्या लाटांच्याबरोबर, सुक्याबरोबर ओलेही जळणे स्वाभाविक आहे.
 खरा प्रश्न असा आहे की, आपण स्वातंत्र्यासाठी नियमन आवश्यक मानतो काय ? स्वातंत्र्य जतन करण्यासाठीसुद्धा कायद्यांचा आधार लागतो, हे आपल्याला मान्य आहे का ? कारण स्वातंत्र्याचा प्रश्न हा नुसत्या कलावंतांच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा प्रश्न नसून तो समाजातील सर्वप्रकारच्या स्वातंत्र्याचा प्रश्न आहे. कलावंताचे स्वातंत्र्य स्वतंत्र राष्ट्रातच नांदू शकते. स्वतंत्र राष्ट्रातसुद्धा जर आचार-विचार, उच्चार-प्रचार, संघटना आदी स्वातंत्र्ये शिल्लक असली, स्वातंत्र्याचे सर्व रूपांत जतन करणारी यंत्रणा समाजात असली तरच कलावंताचे स्वातंत्र्य अबाधित राहू शकते- असे आपण मानतो काय ? कलावंतांनी आणि वाङ्मयसमीक्षकांनी स्वातंत्र्य या कल्पनेचा अधिक तपशिलाने व खोलात जाऊन शोध घेतल्याशिवाय अश्लीलतेच्या प्रश्नाविषयी आपण फार जबाबदारपणे बोलू शकू असे मला वाटत नाही.

 कलावंतांच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा विचार वाङ्मयसमीक्षेच्या कक्षेत राहून करता येत नसतो. एखादी कलाकृती केवळ स्वतंत्र आहे येवढ्यामुळे ती चांगली ठरत नसते किंवा केवळ स्वतंत्र आहे यामुळे ती आकृती कलाकृतीही ठरत नसते. कलाकृतीला कलाकृती म्हणून ओळखण्यासही जे मूल्य उपयोगी पडत नाही आणि जे कलाकृतीचे बरेवाईटपण ठरविण्यासही साह्यकरी होत नाही, ते वाङ्मयीन मूल्य नसणार हे उघडच आहे. जे मूल्य वाङ्मयीन मूल्य नसून सामाजिक मूल्य आहे, त्याची केवळ ललित वाङ्मयाच्या

गेल्या दहा वर्षांतील मराठी समीक्षा १७१