पान:पायवाट (Payvat).pdf/175

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

करून दिलेला रिचर्ड्सचा परिचय पाहिला, तर गेल्या दशकातील काम अधिक समर्थपणे याही दशकात करण्याचा प्रयत्न चालू आहे असे म्हणावे लागेल. विशेषतः पाश्चिमात्य विचारवंतांच्या बाबतीत एक गोष्ट ध्यानात घ्यावी लागते की, त्यांच्या वैचारिक भूमिका परस्परांच्यापेक्षा फार भिन्न असतात. आणि त्यांची धडपड एकेक सुसंगत मीमांसा उभी करण्याची असते. या मीमांसेचा सुटा भाग स्वीकारायचा आणि उरलेली मीमांसा सोडून द्यायची या पद्धतीमुळे समजापेक्षा गैरसमज होण्याचा संभव जास्त आहे.
 डॉ० रिचर्ड्स हे वाङ्मयास्वादाचा विचार करताना परस्परविरोधी प्रेरणाच्या समतोलाचा विचार करतात. याचे एक कारण हे आहे की, त्यांच्या मीमांसेप्रमाणे ललित वाङ्मयात भाषेचा वापर भाववृत्तिप्रेरक असतो. वास्तववर्णनाचा तिथे वापर नसतो. वास्तववर्णनाचा संदर्भ त्यांनी सोडून दिल्यामुळे व भावप्रेरक असा भाषेचा वापर मानल्यामुळे भाववृतीची निर्मिती यापलीकडे काव्यानुभवात त्यांची मीमांसा इतर कशाचा उल्लेख करू शकत नाही. दुसरे म्हणजे, मानवी व्यक्तिमत्त्व प्रेरणांचे बनलेले असते, अशी त्यांची भूमिका असल्यामुळे वाङ्मयास्वादात प्रेरणांचा कोणतातरी समन्वय लावणे त्यांना भाग होते. मानवी व्यक्तिमत्त्व प्रेरणांचे बनलेले असते ही भूमिका लक्षात न घेता अगर भाषेच्या भाववृत्तिप्रेरक वापराची भूमिका लक्षात न घेता रिचर्ड्सची मीमांसा स्वीकारणे अगर नाकारणे हे तर सोडाच, पण ती समजून घेता येणेसुद्धा कटीण आहे. हे जे रिचर्ड्सविषयी आहे, तेच कमीअधिक फरकाने सर्व प्रमुख पाश्चिमात्य मीमांसकांविषयी आहे. प्रमुख पौर्वात्य मीमांसकांत वैचारिक भूमिकांचा फरक एवढ्या मोठ्या प्रमाणात नसतो.
 पौर्वात्य साहित्यशास्त्र ज्या भूमिकांचे प्रतिपादन करते, त्याही बरोबर असतील आणि पाश्चिमात्य मीमांसकांचे म्हणणे बरोबर असेल किंवा सर्वांचेच म्हणणे आपल्याला नाकबूल असेल. आपण जे जवळचे आणि एका कालखंडातले लोक आहोत, त्यांना तरी एकमेकांच्याविषयी विचार करताना एखाद्या मुद्दयावर एकमताने बोलता येणे कुठे शक्य आहे ? वाङ्मयसमीक्षाशास्त्रात एकमतापेक्षा मतभेदच महत्त्वाचे आहेत. निदान हे तरी एक असे निरुपद्रवी ठिकाण आहे, की ज्या ठिकाणी विचारस्वातंत्र्य अत्यंत महत्त्वाचे आहे असे सर्वजण मानतात. याही ठिकाणी जर निरनिराळ्या प्रश्नांवर एकमत व्हायला लागले, तर मग समाजातील विचारस्वातंत्र्यालाच गंभीर धोका निर्माण होण्याचा संभव आहे. निरुपद्रवी ठिकाणी एकमताची प्रस्थापना करण्याचा प्रयत्न लौकिक जगातल्या सर्व उपद्रवी ठिकाणांतील विचारस्वातंत्र्य उन्मळून पडल्यानंतर होतो. निदान एवढे तरी स्वातंत्र्य आपण प्रयत्नाने जतन केले आहे.

 स्वातंत्र्य प्रयत्नाने निर्माण करावे लागते. स्वातंत्र्य प्रयत्नपूर्वक कष्टाने जतन करावे लागते. आणि कोणतेही एक स्वातंत्र्य निर्धास्त व्हायचे असेल तर त्याभोवती उरलेली स्वातंत्र्ये उभी करायची असतात, हे सत्य जगाच्या इतिहासात मान्य असले तरी अजून मराठी वाङ्मयसमीक्षा हे मान्य करायला तयार नाही. माणसाच्या समाजाला स्वातंत्र्य

गेल्या दहा वर्षातील मराठी समीक्षा १६९