पान:पायवाट (Payvat).pdf/174

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

फारशी वाटचाल झालेली नाही. पण एक लेख मी मुद्दाम आपल्या निदर्शनाला आणतो. हा लेख एकनाथ शंकर महाराज यांनी लिहिलेला 'नवभारता'तील लेख आहे (नवभारत जुलै-ऑगस्ट १९७१). त्यांचे म्हणणे असे की, खरोखरी भट्टलोल्लटाला काय म्हणायचे आहे हे परंपरेने कधी समजूनच घेतलेले नाही. परंपरेच्या एका काव्यशास्त्रज्ञाला काय म्हणायचे आहे हे समजून घेण्यात जर परंपराप्रवाहातच घोटाळा निर्माण झालेला असेल तर मग विवेचनाची एक नवी दिशा निर्माण होते. आणि या दिशेने जाताना केवळ भट्टलोल्लटच नव्हे, तर शंकुक आणि भट्टनायक किंबहुना भट्टतौत यांच्याही बाबतीत थोडासा निराळा विचार करणे भाग पडते. एक शक्यता अशी आहे की, कदाचित ध्वनिसिद्धान्ताच्या विरोधकांनी उपस्थित केलेल्या मुद्दयांची फारशी समर्पक उत्तरे या सिद्धान्ताच्या पुरस्कर्त्यांनी दिलेली नाहीत, असे आपल्याला मानण्याची पाळी येईल.
 संस्कृत काव्यशास्त्राचा विचार करताना एक मुद्दा हाही विचारात घ्यावा लागेल, की रसिकाला जो काव्यस्वाद घडतो त्याचा प्रत्यय अलौकिक आहे. कवीची प्रतिभाशक्ती ही अलौकिक आहे. कवी जो अनुभव घेतो तो अनुभवसुद्धा या साहित्यशास्त्राने अलौकिक मानलेला आहे की काय ? कवीचा अनुभवसुद्धा जर अलौकिक असेल, तर मग या जगाशी त्या काव्याचा सगळा संबंध तुटूनच जातो. आणि काव्याचा आस्वाद अलौकिक असेल, तर मग ते काव्य मम्मट म्हणतो त्याप्रमाणे व्यवहारज्ञान देण्यासाठी, शिवाचे रक्षण करण्यासाठी, अप्रत्यक्षपणे उपदेश करण्यासाठी उपयोगी पडणे शक्य नाही. संस्कृत काव्यशास्त्राने लौकिक आणि अलौकिक पातळ्यांचा जागजागी कसा घोटाळा केला आहे, याचाही एकदा विचार आपल्याला करावा लागेल. त्याशिवाय लौकिक पातळीवरील भक्ताला लौकिक पातळीवरील मोक्ष मिळविण्यासाठी अलौकिक पातळीवरील काव्य कसे उपयोगी पडते हे सांगता येणार नाही. वल्लभ सांप्रदायिक वैष्णवांना भक्तिरसाची मांडणी करणे जितके सोपे आहे, तितके ती मांडणी करणे उरलेल्या संप्रदायांच्यासाठी सोपे नव्हते. पण सर्वांनी भक्तिरसाचा स्वीकार मात्र केलेला आहे.

मराठी समीक्षा जशी पौर्वात्यांना सोडू शकत नाही, तशी पाश्चिमात्यांनाही सोडू शकत नाही. पाश्चिमात्य साहित्यशास्त्राचा संदर्भ घेतल्याशिवाय आधुनिक मराठी वाङ्मयच समजावून सांगता येणे कठीण आहे. जी अडचण पौर्वात्यांच्या बाबतीत आहे, तीच पाश्चिमात्यांच्या बाबतीत आहे. त्यांना तरी नेमके काय म्हणायचे आहे, हे बिनचूकपणे आणि तपशिलाने आपल्याला कुठे माहीत आहे ? जसे पौर्वात्य समीक्षेविषयीचे आपले ज्ञान अंदाजे आहे, तसेच पाश्चिमात्यांच्याविषयीसुद्धा माहिती अंदाजेच आहे. कांट, क्राचे, कॉडवेल ही नावे घेतली काय किंवा रिचर्ड्स, अॅरिस्टॉटल यांची नावे घेतली काय, प्रत्येकाच्या सुट्यासुट्या भूमिका संदिग्ध भाषेत आपणासमोर उभ्या आहेत. अलिकडील काळात प्रा० पाटणकरांनी कांट आणि क्रोचे या दोघांचा तपशिलाने पुष्कळ खोलात जाऊन परिचय करून दिला आहे. याआधीच्या दशकात प्रा० गा. वि. करंदीकरांनी करून दिलेला अॅरिस्टॉटलचा परिचय किंवा असाच एकाने

१६८ पायवाट