तेच लक्षणा आणि व्यंजनेलाही लागू होईल. असलेल्या अर्थाचा बोध करून देणे हे शब्दशक्तीचे काम आहे असे म्हटले की, त्यानंतर कोणतीही शब्दशक्ती अर्थनिर्मिती करणारी शक्ती उरणार नाही. हे मान्य केल्यानंतर व्यंजना-शक्तीच्या आधारे अलौकिक अर्थाची निर्मिती होते, असे आपण सुसंगतपणे कसे सांगणार आहोत ? व्यंजनेचा संपूर्ण सिद्धान्त अलौकिक अर्थाची निर्मिती कशी होते, हे सांगण्यासाठीच जन्माला आलेला आहे. या अलौकिक अर्थात रस हा सर्वात महत्त्वाचा अलौकिक अर्थ आहे. आणि हा अलौकिक अर्थ निर्माण करणारा काव्य हा अलौकिक व्यापार आहे. संस्कृत साहित्यशास्त्रातील सर्व अलौकिकतावादाचा आधार व्यंजना या शब्दशक्तीचा सिद्धान्त आहे व तोच मुळात सुसंगतपणे मांडता येणे कठीण आहे.
शब्दांच्या शक्ती अर्थबोधक शक्ती नसून अर्थ निर्माण करणाऱ्या शक्ती आहेत, असे मानले म्हणजे अभिधेच्या ठिकाणीसुद्धा अर्थनिर्मितीचे सामर्थ्य मानावे लागते. मुळात या ठिकाणी 'अर्थ' ह्या शब्दात एक घोटाळा आहे. संस्कृत परंपरेत लौकिक जगात असणाऱ्या ज्या वस्तू त्यांना अर्थ मानतात. या पद्धतीने विचार केला म्हणजे घोडा या शब्दाचा 'घोडा हा प्राणी' हा अर्थ आहे. प्रत्येक अर्थाच्या निर्मितीबरोबर लौकिक जगात भर पडत जाते. या संदर्भात कोणतीच शब्दशक्ती अर्थ निर्माण करू शकणार नाही. आणि जरी शब्दशक्ती अर्थ निर्माण करतात असे म्हटले, तरी त्यामुळे लौकिक जगात वस्तूंची भर पडेल. त्याचा अलौकिक जगात संबंध राहणार नाही. मी हे निश्चितपणे सांगू शकतो की, शब्दशक्तींचा विचार करताना साहित्यशास्त्रज्ञांच्या मनात अर्थ म्हणजे लौकिक वस्तू ही भूमिका गृहीत नाही. यानंतर अर्थशब्दाचा दुसरा वापर सुरू होतो. हा अर्थ लौकिक जगात असला काय अगर नसला काय, शब्दाच्याद्वारे तो वाचकाच्या मनात निर्माण होतो. आपण इंग्रजीत meaning हा शब्द या पद्धतीने वापरतो. एकदा अर्थाबाबत ही दुसरी भूमिका स्वीकारली की, कोणत्याही भाषेतील सगळे शब्द आणि सगळ्या शब्दशक्ती अर्थनिर्मात्या ठरतात. लौकिक जगातील अर्थ सांगणे आणि अलौकिक जगातील अर्थ सांगणे, हा फरक यानंतर शिल्लक राहणार नाही. अर्थ हा श्रोत्यांच्या, वाचकांच्या मनात असतो असे म्हटले, की मग शब्द वास्तवातील परिस्थितीचे वर्णन करणारे तरी ठरतात किंवा परिस्थितिनिरपेक्ष, संभाव्य, काल्पनिक, असत्य इत्यादी वर्णन करणारे तरी ठरतात. आजच्या ज्ञानाच्या संदर्भात शब्दशक्ति-विचार स्वीकारार्ह आहे किंवा नाही हा प्रश्न माझ्यासमोर नसून त्या जुन्या मंडळींच्या ज्ञानाच्या संदर्भात हा विचार नेमकेपणाने समजून कसा घ्यावा असा प्रश्न आहे.
संस्कृत साहित्यशास्त्राचा ऐतिहासिक चिकित्सक अभ्यास या दशकापूर्वी बेडेकरबारलिंगे यांनी सुरू केला. या अभ्यासातून मुख्य वाद नजरेस आला असेल, तर तो म्हणजे स्वतः भरतमुनी 'रस' हा आस्वादाचा विषय मानतात. आस्वादालाच रस समजत नाहीत. दुसरे म्हणजे, रसांची संख्या आठ मानण्यामागे काही विशिष्ट भूमिका आहेत. पुढच्या काळात त्या भूमिका क्रमाने मावळत गेल्या. या दिशेने या दशकात