पान:पायवाट (Payvat).pdf/172

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आपण असे समजून चाललेलो आहोत की या प्राचीनांना काय म्हणायचे आहे हे समजून घेणे सोपे आहे. आपण हे लक्षातच घेत नाही की, तुमची-माझी मने नव्या ज्ञानाच्या संस्कारांनी प्रभावित झालेली आहेत. आपल्याइतकीच त्या जुन्या मंडळींची मने ज्ञानाने प्रभावित झालेली होती. जगन्नाथ पंडित ज्यावेळी 'भग्नावरण चिद् ' म्हणजे रस असे म्हणतो, त्यावेळी त्याला काय म्हणायचे आहे हे समजणे फार कठीण आहे. जगन्नाथ पंडितांसाठी शुद्ध चैतन्यमय आत्मतत्त्व आवरणाने झाकले गेलेले आहे. हे आवरण म्हणजे काय ?-- याबाबतची स्पष्ट कल्पना जगन्नाथ पंडित वल्लभ सांप्रदायिक होते की शाङ्कर अद्वैती होते, हे ठरल्याशिवाय सांगता येणार नाही. आवरणभेद वाङ्मयातील आस्वादाने कसा होतो हे कळायचे असेल तर या ठिकाणी जगन्नाथ पंडितांना कोणत्या प्रकारच्या वाङ्मयाचा प्रत्यय अभिप्रेत आहे, याचा विचार करणे भाग आहे. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे ब्रह्मास्वादसहोदर असणारा काव्यानंद ब्रह्मास्वादस्वरूप आहे असे जगन्नाथांना का सांगावेसे वाटते याचे उत्तर दिले पाहिजे. जुन्या परंपरेत निर्माण होणाऱ्या मनाला ज्या गोष्टी अतिशय सरळ, साध्या आणि सोप्या वाटतात, त्या गोष्टी समजून घेणे कदाचित आपल्याला अतिशय अवघड आणि गुंतागुंतीचे होईल.
 ग. त्र्यं. देशपांडे यांचा उपयोग ह्या ठिकाणी आहे. परंपरेच्या मंडळींना काय म्हणायचे आहे, ते त्यांनी प्रामाणिकपणे सांगितलेले आहे. हा प्रयत्न ह्यापुढे विकसित व्हायला पाहिजे. आणि जे प्रश्न देशपांडे यांनी सोडून दिले आहेत, त्यांचा विचार करायला पाहिजे. पौर्वात्य समीक्षेच्या अभ्यासाचा हा एक महत्त्वाचा भाग आहे. पण त्याबरोबरच दुसराही महत्त्वाचा भाग आहे. त्यांनी जे म्हटले आहे ते आपल्या ज्ञानाच्या संदर्भात बरोबर आहे काय ? स्वीकारार्ह आहे काय ? हा मुद्दा बाजूला ठेवला तरी त्यांचे म्हणणे त्यांच्या ज्ञानाच्या संदर्भात तरी बरोबर आहे काय, हे एकदा पाहावे लागणार आहे. या मुद्दयावर फार तपशिलाने मी खोलात जाणार नाही. पण उदाहरणादाखल एक साधा मुद्दा आपणांसमोर ठेवतो.
 संस्कृत काव्यशास्त्र असे सांगते की शब्दाच्या शक्तीचे प्रकार तीन आहेत. त्यांनी स्वीकारलेल्या तीन प्रकारच्या शब्दशक्ती अभिधा, लक्षणा आणि व्यंजना या नावाने ओळखल्या जातात. आनंदवर्धनापूर्वी एक शब्दशक्ती म्हणून व्यंजनेला कुणी मान्यता दिली होती की नव्हती, हा वादाचा अगदी स्वतंत्र प्रश्न आहे. ह्या प्रश्नाचे उत्तर ऐतिहासिक पुराव्याच्या आधारे द्यावे लागेल. काहीजण आनंदवर्धनाच्यापूर्वी व्यंजनेचा विचार सुप्त रूपात होता असे म्हणतील, काहीजण नव्हता असे म्हणतील, पण निदान आनंदवर्धनानंतर तर व्यंजनेची भूमिका मान्य करूनच बहुतेक सर्वजण पुढे गेले आहेत. ज्यांनी व्यंजना ही शब्दशक्ती मानली, त्यांच्या म्हणण्यात सुसंगती कोणती आहे, हे समजण पुष्कळच कठीण आहे.

 अभिधा, लक्षणा आणि व्यंजना या तिन्ही शब्दांच्या शक्ती आहेत. आणि शब्दांच्या शक्ती म्हणजे अर्थबोधक शक्ती आहेत. अभिधा ही अर्थबोधक शक्ती आहे.

१६६ पायवाट