पान:पायवाट (Payvat).pdf/170

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

'शिशुपालवधा'च्या बाबतीत मात्र अशी भूमिका घेतली की, हा ग्रंथ 'प्रवृत्तीया जोगा' झालेला आहे. निवृत्तिमार्गी महानुभावांना तो शोभेसा नाही.
 विद्यार्थ्यांच्या या प्रश्नाला तांत्रिक उत्तर दोन प्रकारचे देता येईल : पहिले उत्तर तर असे की ही सारी कथाच डॉ. कोलते यांना विश्वसनीय वाटत नाही. दुसरे उत्तर असे की, भास्करभट्टांना बोल लावणारा नागदेवाचार्य नसून बाईदेवबास आहे. ही दोन्ही उत्तरे मला स्वतःला समाधानकारक वाटत नाहीत. भास्करभट्ट बोरीकरांना दोष देणारा 'वृद्धाचारा'नुसार बाईदेवबास असो की 'अन्वयस्थळा'नुसार नागदेवाचार्य असो, आणि प्रत्यक्षात ही घटना घडलेली असो अगर नसो, प्रश्न शिल्लकच राहतो. काहीजणांना 'शिशुपालवध' शंगारिक वाटला, नरेन्द्राच्या 'रुक्मिणीस्वयंवरा 'बाबत मात्र तसे जाणवले नाही, इतके तर खरे दिसते. नरेन्द्राच्या काव्यातसुद्धा रुक्मिणीचे शृंगारवर्णन आहे, सौंदर्यवर्णन आहे, विप्रलंभाचा तपशील आहे, धारादामोधराचे विस्ताराने वर्णन आहे. नरेन्द्र हा कल्पनाविलासप्रधान कवी आहे, आणि त्याचा कल्पनाविलास मोठ्या प्रमाणात शृंगाराच्या सूचनांशी निगडित आहे. अशा अवस्थेत नरेन्द्रचा शृंगार कुणाला जाणवू नये, भास्करभट्टाचा शृंगार मात्र डोळ्यांना टोचावा, याचे कारण काय ? हा खरा प्रश्न आहे.
 नागदेवाचार्य हा धार्मिक गृहस्थ होता, त्याच्या वागण्यात सुसंगती शोधण्याचे कारण नाही- असे उघड चुकीचे व नास्तिक उत्तर द्यायचे नसेल तर संस्कृत साहित्यशास्त्राच्या खोलात शिरणे भाग आहे. माझे उत्तर पुढीलप्रमाणे आहे : ' रुक्मिणीस्वयंवरा'त शृंगाराचा जो आलंबनविभाव आहे, तो रुक्मिणी आहे. परिणामी रुक्मिणीची भूमिका शृंगारिक प्रेयसीची न होता परब्रह्म कृष्णाच्या भेटीसाठी व्याकुळ झालेल्या भक्ताची ती भूमिका होते. म्हणून शृंगाराच्या परिभाषेत जरी या ठिकाणी अभिव्यक्ती झाली असली, तरी रस मात्र शृंगार नसून भक्ती हाच आहे. प्राचीन साहित्यशास्त्रात असा शृंगार धर्मशृंगार किंवा मोक्षशृंगार याही नावाने संबोधिला जाई. तो रुक्मिणीसाठी धर्मशृंगार आहे, वाचकांसाठी मोक्षशृंगार आहे. उत्तरकालीन परिभाषेत सांगायचे तर वाचकांसाठी इथे भक्तिरस आहे. एकनाथांसाठी रुक्मिणी-कृष्णाचे मीलन ही जिवा-शिवाची भेट होते. नरेन्द्रासारख्या महानुभाव कवीसाठी हे भक्त व परमेश्वराचे मोक्षमीलन आहे. अशाप्रकारची भक्तीची बैठक शिशुपालवधातील शृंगाराला नाही. शिशुपालवधातील रुक्मिणीसुद्धा भक्ताच्या भूमिकेत नसून लौकिक पत्नीच्या भूमिकेत आहे. आजचे जे आपण वाचक, त्या आपणांला नरेन्द्र आणि भास्करभट्ट दोघांच्याही काव्यात धर्म आणि मोक्ष फारसा जाणवत नाही, शृंगारच जाणवतो; हा आपला पापी दृष्टिकोण आहे. ज्यांनी हे काव्य लिहिले आणि ज्यांच्यासाठी लिहिले, त्यांची भूमिका मात्र भक्तिमार्गी आहे. कृष्णाचे चरित्र हे सकलसुखाचे छत्र तर आहेच, पण ब्रह्मसुख मिळवून देणारे आहे असे जे नरेन्द्राला वाटते ते यामुळे.

 जुन्या मराठी वाङ्मयात सर्व कवींना स्वयंवरकथा लिहिण्याचा छंद जडलेला आहे. आपण असे म्हणणार आहोत का, की हे जुने मराठी वाङ्मय धार्मिक प्रेरणांनी भरलेले आहे,

१६४ पायवाट