असे म्हणणारे लोक त्याठिकाणी नकळत आपोआप प्रतिपाद्याचे स्पष्टीकरण करताना काव्य आले असे समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात. ह्या भूमिकेप्रमाणे ज्ञानेश्वरीतील काव्य ही विचारांची सजावट आहे. स्वतः ज्ञानेश्वरांनी मात्र आपण श्रेष्ठ प्रकारचे काव्य लिहिणार आहोत अशी जाणीव ठिकठिकाणी व्यक्त केली आहे. श्रेष्ठ काव्य लिहिण्यासाठी तात्त्विक ग्रंथ कशाकरिता ? या प्रश्नाचे उत्तर कधीतरी दिल्याशिवाय आपली सुटका नाही. या प्रश्नाचे उत्तर एका विशिष्ट पद्धतीने देण्याचा प्रयत्न डॉ. वाळिंवे यांनी केला आहे. आपण सर्व बहश्रुत विद्वान श्रोते आहात. आपणाला ते उत्तर माहीत आहे असे मी गृहीत धरतो.
माझ्या विद्यार्थ्यांनी हा प्रश्न वर्गात अनेकदा उपस्थित केला आहे. मी जे उत्तर देतो, तेही या ठिकाणी नोंदविले पाहिजे. कदाचित माझे उत्तर डॉ. वाळिंवे यांच्या उत्तराइतके समर्पक व समाधानकारक असणार नाही. माझे उत्तर असे की, ज्ञानेश्वरांचा प्रयत्न शंगाराच्या माथ्यावर पाय ठेवील असा शांतरस आपल्या ग्रंथात निर्माण करण्याचा आहे. ज्ञानेश्वर हे परंपरेने शैव आहेत. काश्मिरी शैवसिद्धान्तांचा आणि अभिनवगुप्ताचा ज्ञानेश्वरांवर परिणाम झालेला आहे. अभिनवगुप्त 'शांत' हा नुसता रस मानत नाहीत, तर महारस मानतात. एकतर शांतरसाच्या पोटात सारे रस येतात, म्हणून तो महारस आहे. दुसरे म्हणजे अभिनवगुप्तांच्या भूमिकेप्रमाणे सर्वच रसांची परिणती शेवटी शांतरसात होते, म्हणून तो महारस आहे. अभिनवगुप्तांनी शांतरसाचा स्थायीभाव तत्त्वज्ञान मानला आहे. त्यामुळे हा महारस निर्माण करण्यासाठी ज्ञानेश्वरांना तत्त्वविवेचनातच मुख्य संधी होती. ती त्यांनी साधली आहे. कारण या ठिकाणी अध्यात्मवादी दर्शनकार आणि कवी या दोन भूमिका सुसंगत व परस्परसाह्यकारी होतात. ज्ञानेश्वरांनी काव्यासाठी तत्त्वज्ञानग्रंथ निवडला असेल, तर हे त्यांचे करणे अभिनवगुप्तांच्या साहित्यशास्त्रविवेचनाशी सुसंवादी आहे.
आपला रसव्यवस्थेवर विश्वास असो किंवा नसो, आपण संस्कृत साहित्यशास्त्र सोडू शकत नाही, या माझ्या म्हणण्याचा अर्थ आता स्पष्ट होईल. आपण प्राचीन मराठी साहित्य सोडू शकत नाही. त्या साहित्याला पार्श्वभूमी संस्कृत परंपरेची असल्यामुळे, तेही आपण सोडू शकत नाही. आपल्यापैकी जे मराठीचे प्राध्यापक असतील किंवा महाविद्यालयात मराठीचे विद्यार्थी असतील, त्यांच्यासमोर अधूनमधून असे प्रश्न उपस्थित होणारच की ज्या प्रश्नांच्या उत्तराचा शोध घेण्यासाठी म्हणून आपल्याला पौर्वात्य समीक्षेत शिरणे भागच आहे.
माझ्या वर्गातील काही अनुभव मी आपणांसमोर ठेवतो. परवाच एका विद्यार्थ्याने मला विचारले की. भास्करभट्टाचा 'शिशुपालवध' हा ग्रंथही नागदेवाचार्याच्यासमोर होता. नरेन्द्राचा 'रुक्मिणीस्वयंवर' हा ग्रंथही त्यांच्यासमोर होता. कवी नरेन्द्र आपले 'रुक्मिणीस्वयंवर' घेऊन महानुभाव पंथात आले, तेव्हा नागदेवाचार्य हेच पंथाचे आचार्य होते. पण 'रुक्मिणीस्वयंवरा'बाबत मौन धारण करणाऱ्या नामदेवाचार्यांनी