पान:पायवाट (Payvat).pdf/171

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पण लेखकांना शृंगारिक लिहिण्याचा नाद आहे ? खरे तर असे म्हणायला पाहिजे की, जुन्या कवींच्यासाठी या साऱ्याच स्वयंवरकथा मोक्षशृंगाराच्या कथा होत्या; म्हणून तिथे काहींना भक्तिरस जाणवतो, काहींना शांतरस जाणवतो. माझी उत्तरे निर्विवाद मानली पाहिजेत, असा माझा आग्रह नाही. आग्रह असेल तर तो हा की, परंपरेचे साहित्यशास्त्र नीट समजून घेतल्याशिवाय प्राचीन मराठी वाङ्मयातील अनेक बाबी उलगडून दाखवताच येणार नाहीत. नाही तर आपण असे म्हणत राहणार की, भवभूतीने ' उत्तररामचरिता'त करुणरस रंगविलेला आहे, आणि परंपरा असे सांगत राहणार की ' उत्तररामचरिता'चा प्रधानरस शृंगार आहे. परंपरेप्रमाणे 'उत्तररामचरित' शोकान्त नाटक असू शकत नाही. कारण नाटक आपल्या परिपूर्ण स्वरूपात शोकान्त कधी नसते; त्याचा शेवट परंपरेनुसार अद्भुत आणि सुखकारक आहे.

 हे परंपरेचे काव्यशास्त्र एका विशिष्ट पद्धतीने दोन पिढ्यांनी स्थूलपणे मांडले. श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांनी अगर केळकरांनी ज्या पद्धतीने रसव्यवस्था मांडली, तो पहिल्या पिढीचा प्रकार आहे. जोग, वाटवे, द. के. केळकर या मंडळींनी ज्या पद्धतीने पौर्वात्य काव्यशास्त्र मांडले, तो दुसऱ्या पिढीचा प्रकार आहे. या दोन्ही पिढ्या काव्यशास्त्र मांडण्यापेक्षा दुसऱ्याच एका प्रेरणेने प्रभावित झालेल्या होत्या. स्वातंत्र्यपूर्व कालात ही प्रेरणा भारतात अतिशय बलवान होती. पाश्चिमात्यांनी ज्ञानाच्या विकासानंतर जे काही निष्कर्ष मांडलेले आहेत, जे शोध लावलेले आहेत, ते सगळे पौर्वात्य जगात फार पूर्वीच ज्ञात झालेले होते, ते सांगण्यासाठी एक धडपड चालू होती. तुम्ही नव्या मानस-शास्त्रात जे काही सांगणार आहात, ते दोन हजार वर्षापूर्वी आमच्या ऋषिमुनींनी सांगूनच टाकले आहे. जर्मनीने विज्ञानात जो काही विकास केलेला आहे, तो आमच्या अथर्ववेदातून चोरून नेलेला आहे. अशाप्रकारच्या विवेचनाची एक सामान्य भूमिका होती. तिचे व्यक्तिपरत्वे वेगळेवेगळे आविष्कार दिसतात. विज्ञान अथर्ववेदातून गेले आहे, गणित ज्योतिःशास्त्रातून गेले आहे, मानसशास्त्र योगशास्त्रातून गेले आहे. या भूमिकेचा एक भाग आधुनिक काव्यशास्त्राचे सर्व सिद्धान्त आमच्या ऋषिमुनींनी आधीच सांगून ठेवलेले आहेत असा प्रवाहित होतो. हाच मुद्दा सभ्यपणे सांगायचा असेल, तर तो सांगण्याची पद्धत कोणती ? ती पद्धत आधुनिक मानसशास्त्राच्या आधारे पौर्वात्य साहित्यशास्त्राचे समर्थन करण्याची आहे.
 या समर्थनासाठी कुणी मॅक्डुगल वापरतो, कुणी शग्ड वापरतो. कुणी अजून कोणत्यातरी मानसशास्त्रज्ञाचा आधार घेतो. एका पिढीने हे काम अतिशय विस्ताराने केलेले आहे. जे घडून गेले आहे त्याबाबत आता खंत करण्याचे कारण नाही. पण अशाप्रकारच्या समन्वयातून प्राचीन वाङ्मयपरंपरा आणि वाङ्मयीन संकेत यांवर योग्य प्रकाश पडण्याचा संभव फार कमी आहे. नव्या अभ्यासकांना यापुढे जायला पाहिजे. यापुढे जाताना दोन प्रश्न निर्माण होतात : पहिला प्रश्न परंपरेच्या या सगळ्या काव्यशास्त्रज्ञांना काय म्हणायचे आहे, हा आहे. वाटतो तेवढा हा प्रश्न सोपा नाही.

गेल्या दहा वर्षांतील मराठी समीक्षा १६५