पान:पायवाट (Payvat).pdf/17

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


देवलांच्या नाटकातील पदे पुष्कळदा संपूर्ण नाटकाची रचना होण्यापूर्वी तयार होत असत. या दृष्टीने पाहिले तर देवलांच्या मनात कुठेतरी एक झगडा चालू असल्याचे दिसते. त्यांनी वराचे वय पन्नाशीच्या जवळपास आरंभाला गृहीत धरले असल्याचे दिसते. त्या अनुरोधानेच ‘पन्नाशीची झुळुक लागली, बाइल दुसरी करू नको' हा उल्लेख आलेला आहे. पण पुढे नाटक सुखान्त करायचे ठरल्यानंतर नवरदेव पन्नास वर्षांचा असण्याची गरज उरली नाही. त्यांनी तो पंचाहत्तर वर्षांचा ठरवलेला आहे. जोडीला जोड म्हणून सुदाम-सावकार सत्तर वर्षांचा गृहीत धरला आहे. एक विवाह नाटकाच्या आरंभी घडलेला आहे. दुसरा नाटकात घडू घातलेला आहे. दोन्ही ठिकाणी देवलांनी नवरदेव अतिवृद्ध गृहीत धरले आहेत याला कारण आहे. एकदा नाटक सुखान्त करायचे म्हटल्यानंतर देवलांना दोन गोष्टींची काळजी घेणे भाग होते. एक तर नायिकेला अनुरूप असा वर शोधून देण्याची जबाबदारी देवलांना पार पाडणे भाग होते. सुखान्त नाटकाचा शेवट अनुरूप वराशी शारदेचा विवाह घडवून दिल्याशिवाय दुसरा कोणता कल्पिणे शक्य नव्हते. यासाठी कोदंड या पात्राची निर्मिती करणे आवश्यक होते. शेवटी शारदेचे जर कोदंडाशी लग्न लावायचे असेल, तर तिचे लग्न भुजंगनाथाशी होऊ देणे शक्य नव्हते. एकदा भुजंगनाथाचे आणि शारदेचे विधिवत लग्न झाले की, त्यानंतर सुखी शेवट होण्यासाठी भुजंगनाथ मरेपर्यंत वाट पाहणे व नंतर शारदेचा पुनर्विवाह लावून देणे अशी रचना करावी लागली असती. ही रचना झाल्यानंतर ते नाटक पुनर्विवाहावरील नाटक झाले असते. बाला-जरठ विवाहावरचे नाटक उरले नसते.
 बाला-जरठ विवाहाचा प्रश्न विधवाविवाहाशी निगडित आहे ही जाणीव देवलांच्या पिढीला येणे शक्य नव्हते. सुटा-सुटा प्रश्न विचारात घेणाऱ्या मंडळींना बालविवाह, विधवाविवाह आणि बाला-जरठ विवाह असा संयुक्त विचार करणे शक्य नव्हते. म्हणून सुखी शेवट करण्यासाठी भुजंगनाथाशी लग्न होऊन चालणार नव्हते. ते लग्न ठरणे आणि मोडणे या घटना आवश्यक होत्या. पण भुजंगनाथाचा शारदेबरोबरचा विवाह मोडायचा कसा ? हा विवाह मोडण्यासाठी परंपरावादी मनाला दुखावेल असा कोणताही मार्ग देवल स्वीकारण्यास तयार नव्हते, कारण त्यांचे स्वतःचे मनच परंपरावादी होते. परंपरावादाच्या कक्षेत राहून भुजंगनाथाचा विवाह मोडायचा असेल, तर काही पर्याय डोळ्यांसमोर होते. एक पर्याय भुजंगनाथच्या अपमृत्यूचा आहे. पण त्यामुळे कांचनभटाने शारदा दुसऱ्या म्हाताऱ्याला देऊ केली असती. हा कांचनभट वाटेतून बाजूला सारण्यासाठी देवलांनी त्याला शेवटी वेडा करून टाकला आहे. आणि तो वेडा होण्याइतपत धक्का बसावा यासाठी ऐन समारंभात विवाह मोडून दाखविला आहे. एक पर्याय शेवटच्या क्षणी भुजंगनाथाला विरक्ती निर्माण होण्याचा असा होता. पण या पर्यायात प्रेक्षकांची सहानुभूती भुजंगनाथाकडे जाते. हे घडून येणे देवलांना इष्ट नव्हते. भुजंगनाथ आजारी पडल्यामुळे असो, किंवा इतर कोणत्याही कारणामुळे असो, एकदा शारदेचा पिता वाचादत्त झाला की वाचादत्त पित्याने लग्न मोडणे परंपरावादाला मंजूर नव्हते.

देवलांची शारदा ११