पान:पायवाट (Payvat).pdf/16

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


  जर 'शारदा' नाटक समस्याप्रधान वास्तदवादी नाटक असते, तर त्याचा शेवट शोकपर्यवसायी होणे अपरिहार्यच ठरले असते. पण आहे या अवस्थेत 'शारदे'ची रचना समस्याप्रधान नाटकाची नाही. नवतरुणीचे किंवा बालिकेचे जरठाशी लग्न होणे ही सामाजिक समस्या आहे. लग्न ठरणे ही सामाजिक समस्या नाही. जर एकेका मुलीचे भुजंगनाथासारख्या वृद्ध कपीशी लग्न ठरून मोडत असते व शेवटी या मुलींना कोदंडासारखा अनुरुप वर मिळत असता, तर मग समस्या शिल्लकच राहिली नसती. बाला-जरठ विवाहाचे दुष्परिणाम दाखविण्यासाठी लिहिले जाणारे नाटक जरठाला विवाहाची इच्छा निर्माण होते इथून आरंभ पावू शकत नाही. समस्याप्रधान नाटकात निदान समस्या उपस्थित झाली पाहिजे. भुजंगनाथ आणि शारदा विवाहानंतर गंगापूरहून आपल्या गावी परत येतात व शारदेचा दु:खद संसार सुरू होतो, इथून समस्याप्रधान नाटकाचा आरंभ झाला पाहिजे. सर्व नाटकभर शारदेचा दारुण कोंडमारा प्रामुख्याने दाखवला जायला पाहिजे. परिणामी शारदा स्वैरिणी झाली असती अगर तिने आत्महत्या केली असती आणि याहीपेक्षा मोठ्या शक्तीचा नाटककार असता, तर त्याने उत्साहशून्य जीवन्मृत सौभाग्य आणि तितकेच मृतवत वैधव्य शारदा भोगीत बसली हीच बाब तिच्या मृत्यूपेक्षा अधिक भीषण करून दाखवली असती. पण अशा प्रकारचे नाटक लिहिण्याची देवलांची इच्छा नव्हती. शोकान्त नाटकाचा पुरेसा वाईट अनुभव देवलांनी घेतलेला होता. त्याची पुन्हा परीक्षा पाहण्याची देवलांची इच्छा नव्हती. बाला-जरठ विवाहावर नाटक लिहायचे हा देवलांचा पहिला हेतू होता. हे नाटक सुखान्त करायचे हा देवलांचा दुसरा हेतू होता. उद्बोधनासाठी ललित वाङ्मयाची निर्मिती करू इच्छिणाऱ्या लेखकांच्यासमोर एक प्रश्न नेहमी उभा असतो: आपण जे लिहितो आहोत ते जर उद्बोधनाचे साधन म्हणून उपयोगी पडायचे असेल तर रसिकांना प्रिय झालेच पाहिजे, ही त्यासाठी आवश्यक अट आहे. जे कुणीही वाचणारच नाही, जे कुणाला वाचवणार नाही अशा लिखाणाची किंमत प्रचाराचे साधन म्हणूनही शून्य असते. उद्बोधनासाठी लिहिणारे कलावंत मधून मधून रंजनाच्या सूत्रांशी तडजोड करीत बसतात असे जे आपल्याला दिसते, त्याचे कारण या ठिकाणी सापडते. उद्बोधनाच्या तीव्र जिज्ञासेपोटी देवलांनी वास्तविक जीवनदर्शनाशी तडजोडी केल्या असे म्हणावे का त्यांना मुळात शोकान्त नाटकाचा पुन्हा प्रयोग करण्याची इच्छा नव्हती असे म्हणावे, याच उत्तर निर्णायकपणे देवलच देऊ शकले असते. नाट्यरचनेच्या अभ्यासावरून आपण इतकेच म्हणू शकतो की, आरंभापासून देवलांची इच्छा सुखान्त नाटक लिहिण्याची होता. त्या दृष्टीने त्यांनी आपल्या नाटकाचे आरंभ-मध्य-शेवटासह विकल्पन केले आहे, नाटकातील बारीकसारीक दुवासुद्धा सुखी शेवटाच्या दृष्टीने या नाटकात आलेला आहे. जर या नाटकाची रचनाच सुखान्तिकेची असेल, तर मग शारदेने जीव देण्याच्या ठिकाणी नाटक संपावे ही गोष्ट शक्यच नव्हती.
  हे नाटक सुखान्त करण्याचा निर्णय देवलांनी प्रथम घेतला. ही आयत्या वेळी मनात आलेली कल्पना नव्हती. आरंभापासूनच नाटकाशी एकजीव झालेली ही कल्पना होती.

१० पायवाट