आणि अलौकिक सामर्थ्याच्या नव्या समीक्षापद्धतीचा प्रारंभ आहे. या तीनही भूमिका त्यांच्या हयातीत मांडल्या गेलेल्या आहेत.
आज इतक्या वर्षांनंतर मागे वळून पाहिले तरी आपण त्याच ठिकाणी आहोत असे दिसते. तपशिलाने कुणी सत्तर पाने, कुणी शंभर पाने आणि एखादा विद्वान अडीचशे-तीनशे पाने लिहून आजही हे दाखवतो की, मर्ढेकरांच्या भूमिकेत काही तथ्य नाही. खंडनासाठी का होईना, पण अजून मर्ढेकरच सर्वांच्यासमोर उभे आहेत. मराठी सौंदर्यशास्त्र-विवेचनात इतर कुणाचा ग्रंथ मध्यवर्ती गृहीत धरून चर्चा करावी म्हटले तर तसा ग्रंथच नाही. दुसऱ्या महायुद्धापूर्वीच्या काळात जशी सगळी चर्चा तात्यासाहेब केळकरांच्या सविकल्प समाधीच्या भूमिकेभोवती फिरताना दिसते, तशी नंतरच्या काळात सगळी चर्चा मर्ढेकरांच्या सौंदर्यवाचक विधानार्थाभोवती फिरू लागते. वीजग्रंथाचे स्वरूपच असे असते की तिथून एका नव्या चर्चेला आरंभ होतो, आणि कितीही चर्चा झाली तरी पुन्हा काही सांगण्याजोगे शिल्लकच राहते. मर्टेकर आणि ग. त्र्यं. देशपांडे हे असे मराठीपुरते भाग्यशाली ठरलेले लेखक आहेत.
मराठी समीक्षा म्हटल्यानंतर तिचे सरळ तीनचार भाग पडतात. पहिला भाग तर हा आहे की, परंपरेने चालत आलेली आपल्याकडील जी संस्कृत परंपरेची पौर्वात्य साहित्य समीक्षा आहे, ती काही आपण सोडू शकत नाही. रसव्यवस्थेवर आणि संस्कृत साहित्यशास्त्रावर विश्वास असण्या-नसण्याचा इथे प्रश्न नाही. प्रश्न मराठी साहित्यावर विश्वास असण्याचा आहे. तेराव्या शतकापासून एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत जे मराठी निर्माण झाले आहे, ते लिहिणाऱ्यांच्या डोळ्यांसमोर संस्कृत साहित्यशास्त्रांची परंपरा होती. या प्राचीन मराठी वाङ्मयाचा विचार आपण संस्कृत साहित्यशास्त्र बाजूला ठेवून करू शकत नाही. पौर्वात्य समीक्षेतील रसव्यवस्था आधुनिक वाङ्मयाच्या विवेचनाला तर अपुरी पडतेच, पण प्राचीन मराठी वाङ्मयाच्या आकलनालाही ती समाधानकारक नाही हे म्हणणे निराळे. तसे आपण म्हणू शकतो. माझे तेच मत आहे. पण असे असले तरी परंपरागत काव्यशास्त्राचा संदर्भ घेतल्याशिवाय प्राचीन मराठी वाङ्मयाचे स्वरूप समजावून सांगणे अशक्यच होऊन जाते, हेही तितकेच खरे.
आपण असा एक साधा प्रश्न विचारावयाला पाहिजे : प्राचीन मराठी वाङ्मयात ज्ञानेश्वरी हा काव्याचा श्रेष्ठ ग्रंथ आहे की नाही ? कवी म्हणून असणाऱ्या ज्ञानेश्वराच्या योग्यतेबाबत कुण्याही मराठी अभ्यासकाचे दुमत होण्याचे कारण नाही. पण कवित्वाची एवढी अलौकिक आणि दैवी शक्ती असणाऱ्या या महाकवीने काव्य करण्यासाठी तत्त्वज्ञानपर ग्रंथ का निवडावा ? म्हणजेच भगवद्गीतेवरील टीका हेच आपल्या कवितेला क्षेत्र म्हणून त्यांनी का निवडावे ? ज्ञानेश्वरी ही गीताटीका असल्यामुळे एक मत असे की, ज्ञानेश्वरांची प्रमुख भूमिका आध्यात्मिक तत्त्वज्ञान सांगण्याची व भक्तिमार्गाचा उपदेश करण्याची आहे. तेथे काव्याचा उदय आनुषंगिक आहे. दुसरी भूमिका अशी की, ज्ञानेश्वरांची प्रमुख भूमिका कवीची आहे. ज्ञानेश्वरांची प्रमुख भूमिका दर्शनकाराची आहे