पान:पायवाट (Payvat).pdf/167

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शास्त्रातील निरनिराळ्या भूमिकांचा उदय आणि विकास कसा झाला, याविषयी ग. त्र्यं. देशपांडे यांचा ग्रंथ जी माहिती पुरवितो, तिचे स्वरूप विवाद्य आहे. अशाप्रकारच्या विवेचनासाठी जो. ऐतिहासिक चिकित्सक दृष्टिकोण असावा लागतो, त्याचा मुळातच ग. व्यं. देशपांडे यांच्या ठिकाणी अभाव आहे. या रसव्यवस्थेला वैष्णवांनी पुढे दिलेले विशिष्ट रूप देण्यात जगन्नाथ, रूपगोस्वामी, मधुसूदनसरस्वती इत्यादींनी जो सहभाग घेतला-विशेषतः जगन्नाथ पंडितांनी रसानुभव आणि आत्मानुभव यांतील फरकच संपवण्याचा जो प्रयत्न केला त्याविषयी ग. त्र्यं. देशपांडे यांनी फारसे काही विवेचन केलेले नाही. भोजाच्या समन्वयाबाबतही त्यांना फारसे सांगायचे नाही. परंपरागत ज्ञान परंपरागत पद्धतीने समजावून सांगण्याचा त्यांचा प्रयत्न मात्र जवळपास यशस्वी झालेला आहे. आनंदवर्धन, मम्मट, विश्वनाथ इत्यादींना- विशेषतः मम्मट- विश्वनाथाला संस्कृत साहित्यशास्त्राचे जे स्वरूप अभिप्रेत होते, त्याचे फार चांगले आणि प्रामाणिक विवेचन देशपांडे यांच्या ग्रंथात आलेले आहे.
 वरच्या यादीत मी अभिनवगुप्तांचा उल्लेख जाणीवपूर्वक केलेला नाही. कारण अभिनवगुप्तांच्या विवेचनावर त्यांनी स्वीकारलेल्या तांत्रिक-शैव भूमिकेची जी छाप आहे 'ती लक्षात न घेता अभिनवगुप्तांचे विवेचन मम्मटाच्या माध्यमातून स्वीकारणे मला धोक्याचे वाटते. ग. व्यं. देशपांडे यांच्या पुस्तकाच्या मर्यादा अशा रीतीने दाखवल्या, तरी त्यामुळे त्या ग्रंथांचे महत्त्व कमी होत नाही. हा ग्रंथ डोळ्यांसमोर ठेवूनच गेल्या दहा वर्षात संस्कृत साहित्यशास्त्राचा पुनःपरिचय करून देण्याचा प्रयत्न मराठीत होतो आहे. हा प्रयत्न करणाऱ्या मंडळींत वा. के. लेले आणि रा. ब. आठवले यांचे स्थान महत्त्वाचे मानले पाहिजे.
 संस्कृत साहित्यशास्त्राचा मराठीत विचार प्रामुख्याने दोन पद्धतींनी व्हायला पाहिजे. एक तर परंपरेला काय म्हणायचे आहे, हे काळजीपूर्वक समजून घेऊन ते स्वीकारले अगर नाकारले गेले पाहिजे. दुसरे म्हणजे, परंपरेला जे म्हणावयाचे आहे, त्याची ऐतिहासिक चिकित्सा व्हायला पाहिजे. संस्कृत काव्यशास्त्राचा असा चिकित्सक विचार करण्याचा महत्त्वाचा प्रयत्न प्रथम दि. के. वेडेकरांनी आणि नंतर डॉ. सुरेंद्र बारलिंगे यांनी केला. पण हा प्रयत्न याहीपेक्षा अधिक तपशिलाने आणि व्यापक पायावर व्हायला पाहिजे. अशाप्रकारचा प्रयत्न करणारा एखादा प्रमुख मराठी ग्रंथ अजून निर्माण झालेला नाही.

 कै. मर्ढेकरांचे मराठी समीक्षेतील स्थान याहून थोडे निराळे आहे. ज्या प्रश्नांची चर्चा मढेकरांनी केली आणि ज्या पद्धतीने ते ती चर्चा करीत होते, त्या दोन्ही बाबी मराठीला नवीन होत्या. मर्ढेकरांच्या हयातीतच लोकांनी हे सांगितलेले आहे की, ह्यांच्या विवेचनात काही तथ्य नाही; मर्ढेकरांचे हे विचार अवघड भाषेत असले तरी वाष्कळपणाचे आहेत. त्यांच्या हयातीत असेही म्हटले गेले आहे की, हे म्हणतात त्यात अर्धसत्य आहे; काही मौलिक भूमिका व काही दुराग्रह यांचे चमत्कारिक मिश्रण त्यांच्या विवेचनात होते. त्यांच्याच हयातीत असेही म्हटले गेले आहे की, हा एक सर्वस्वी नवीन

गेल्या दहा वर्षातील मराठी समीक्षा १६१
पा....११