पान:पायवाट (Payvat).pdf/166

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

नवे प्रस्थान या दशकात ठेवल्याचे आढळून येत नाही. ललित वाङ्मयाप्रमाणे वाङ्मयसमीक्षेच्या प्रांतातही असे घडते की एखादा ग्रंथकार काही विचार मांडून ठेवतो. हे त्याचे चिंतन स्वीकारार्ह असेलच असे नाही. पण त्याचे विचार जर इतरांना विचारह वाटले, तर अनुकूल-प्रतिकुल चर्चेच्या एका वावटळीचा आरंभ होतो. काहीजणांना काही गोष्टी पटतात, इतर काहीजणांना त्या पटत नाहीत. एका विचारवंताच्या विवेचनाला अगर ग्रंथाला मध्यवर्ती गृहीत धरून पुढच्या सगळ्या अनुकूल-प्रतिकूल विवेचनाचा पसारा सुरू होतो. असे ग्रंथ त्या-त्या क्षेत्रात बीजग्रंथ म्हणून मान्यता पावतात. दुसऱ्या महायुद्धानंतरच्या मराठी समीक्षेतील बीजग्रंथ म्हणून जर असा उल्लेख करायचा असेल, तर तो मर्ढेकरांच्या 'साहित्य आणि सौंदर्य' या ग्रंथाचा व ग. त्र्यं. देशपांडे यांच्या 'भारतीय साहित्यशास्त्र' या ग्रंथाचा करावा लागेल. या दोन्ही ग्रंथांतील विवेचन मला सर्वस्वी मान्य आहे असे नव्हे. उलट ते विवेचन मोठ्या प्रमाणात मला अमान्य आहे. पण हा प्रश्न मान्य-अमान्य असण्याचा नसून कोगते ग्रंथ मध्यवर्ती समजून चर्चा करावी लागते याचा आहे.
 दुसरा प्रकार एखाद्या प्रभावी समीक्षकाचा असतो. कळत-नकळत त्या समीक्षकाच्या पावलावर पाऊल टाकून इतर लेखक लिहू लागतात. प्रत्येक समीक्षकाच्या आवडीनिवडी आणि मते यांत फरक असतो. हे मान्य केले तरी वाङ्मयाकडून काय अपेक्षावे, वाङ्मयाकडे कोण्या दिशेने पाहावे, याविषयीच्या भूमिकांचा त्यांत सारखेपणा असतो. दुसऱ्या महायुद्धानंतर मराठीतील वाङ्मयसमीक्षेवर असा प्रभाव जर कुणाचा पडला असेल, तर तो प्रा. वा. ल. कुलकर्णी यांचा आहे. असा प्रभाव पडण्याची दुसरी शक्यता दि. के. वेडेकरांच्या बाबतीत होती. पण वेडेकरांना हे यश मिळाले नाही. सर्वांत प्रभावी समीक्षक या दशकापूर्वी उदय पावतो. बीजग्रंथही या दशकापूर्वीचे आहेत. म्हणून या दशकात मराठी समीक्षेत कोणताही मूलभूत महत्त्वाचा बदल झालेला आहे असे मला वाटत नाही.

 मराठीत रसचर्चेचा आरंभ जवळजवळ मराठी समीक्षेच्या उदयाइतका जुना आहे. मराठी वाङ्मयसमीक्षकांनी वाङ्मयाच्या आकलन-मूल्यमापन-विवेचनासाठी किती प्रमाणात रससिद्धान्ताचा स्वीकार केला, असा जर प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर-फारसा स्वीकार केलेला दिसत नाही असेच द्यावे लागेल. मराठी समीक्षेचा आरंभ इंग्रजी समीक्षेचे वोट धरून आधुनिक काळात होतो. पण सर्वानी रससिद्धान्ताला मान्यता दिलेली आहे. संस्कृत साहित्यशास्त्राशी आपला अनुबंध अप्रतिहत आहे, असे सांगण्याचा सर्वांचा आग्रह सुरू असतो. म्हणून रसचर्चेत मराठीला नवीन असे काहीच नाही. ती ग. व्यं. देशपांडे यांच्या ग्रंथापूर्वीही होती. पण भारतीय काव्यशास्त्र हे एक परंपरागत काव्यशास्त्र आहे. ज्या मंडळींनी हे काव्यशास्त्र निर्माण केले, त्यांना काय अभिप्रेत होते हे तपासून पाहण्याचा फार मोठा आणि चांगला प्रयत्न ग. त्र्यं. देशपांडे यांनी केलेला आहे. संस्कृत काव्यशास्त्राचा उदय ज्या अतिप्राचीन काळात होतो, त्याची माहिती देणारा भरतनाट्यशास्त्रापूर्वीचा ग्रंथ आज उपलब्ध नाही. भरतापासून आनंदवर्धनापर्यंत संस्कृत काव्य-

१६० पायवाट