केवळ एका नियतकालिकाच्या आधारे मराठीतील समीक्षणाच्या सर्व गरजा योग्य प्रकारे पार पाडल्या जाण्याचा संभव कमी आहे, इतकी विपुल प्रकाशने आता दरसाल मराठी वाङ्मयात येत असतात.
कोणतेही नियतकालिक झाले तरी त्या नियतकालिकाच्या मागे लेखकांचा एक वर्ग उभाच असतो. या वर्गाच्या आवडीनिवडींचे प्रतिबिंब त्या नियतकालिकातून दिसू लागणे अपरिहार्य असते. यानंतर त्या नियतकालिकावर गटबाजीचा आरोप होऊ लागतो. नियतकालिकावर गटबाजीचा आरोप होऊ लागला म्हणजे निदान वाङ्मयसमीक्षेच्या क्षेत्रात असे समजायला हरकत नाही की, त्या नियतकालिकात व्यक्त होणाऱ्या मतांना वाङ्मयाच्या जगात प्रतिष्ठा मिळालेली आहे. प्रतिष्ठा प्राप्त झालेली नियतकालिके आपापल्या भूमिकांना बांधलेली असतात. ती सर्वांनाच हवे ते देऊ शकत नाहीत. सगळ्याच दृष्टिकोणांतून आणि भूमिकांमधून वाङ्मयाची तपासणी होणे निकोप रसिकतेच्या वाढीच्या दृष्टीने आवश्यक असते. म्हणून 'आलोचने 'सारखी अजून काही नियतकालिके हवी आहेत. 'आलोचने 'सारखी अजून काही नियतकालिके आवश्यक वाटावीत हेच 'आलोचने 'चे यश आणि महत्त्व आहे.
जेव्हा हे नियतकालिक सुरू झाले त्यावेळी आरंभीच्या दोनचार अंकांत केव्हातरी एकदा 'खडक आणि पाणी' या पुस्तकाचे एक अतिशय चांगले परीक्षण आले आहे. त्या परीक्षणाच्या गुणवत्तेमुळेच माझे लक्ष 'आलोचने 'कडे वेधले गेले. तेव्हापासून आजतागायत अनेक परीक्षणे, वाद, विशेषांक, कवितांची रसग्रहणे, वैचारिक चर्चा असा फार मोठा पसारा 'आलोचने 'ने केला आहे. 'आलोचने'च्या विशेषांकांनी वाङ्मयीन जगातील स्थिरपद महानुभावांच्या पुनर्मूल्यमापनाचाही प्रयत्न मोठ्या प्रमाणात केला आहे. विशेषतः नवकाव्याच्या क्षेत्रातील कवितांची रसग्रहणे हा ते काव्य समजावून सांगण्याच्या दृष्टीने, कवी आणि वाचक यांच्यातील पूल जोडण्याच्या दृष्टीने, एक महत्त्वाचा प्रयत्न म्हटला पाहिजे. 'आलोचने 'तील अजून काही महत्त्वाच्या परीक्षगांची यादी मी देऊ शकेन. परंतु या परीक्षणांचा ताप असा आहे की ते सगळे लिखाण निनावी असते. वर्षाअखेर कुणी कोणते लेख लिहिलेले आहेत याची यादी येते. पण या यादीतले एकही नाव त्या लेखकाच्या परीक्षणासह माझ्या लक्षात राहत नाही. तेव्हा मला आवडलेल्या लिखाणाचे जर मी उल्लेख करू लागलो, तर कदाचित ते एकदोन लेखकांचे लेख असण्याचा संभव आहे. आणि पुष्कळ चांगले लिखाण 'आलोचने 'त आले आहे, हे सांगण्यातही अर्थ नाही. कारण त्यासाठीच तिचा अवतार आहे. या दहा वर्षात झालेल्या समीक्षणात्मक लिखाणाचा परिचयपर आलेख काढण्यात मला फार रस नाही. कारण त्यासाठी जी परिश्रमशीलता लागते तिचा माझ्यात अभाव आहे.
मला स्वतःला या दहा वर्षात मराठी समीक्षेचा काही वेगळा असा कालखंड सुरू झालेला आहे असे वाटत नाही. आधीच्या दहा वर्षांत मराठी समीक्षा ज्या प्रवाहांनी विकसित होत आली, तिचा काहीसा विस्तारच या दशकात दिसतो. समीक्षेने कोणते