पान:पायवाट (Payvat).pdf/164

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
गेल्या दहा वर्षांतील मराठी समीक्षा


'आलोचने 'च्या या दशवार्षिक समारंभाच्या निमित्ताने गेल्या दहा वर्षातील मराठी समीक्षेविषयी मी काही बोलावे, अशी अपेक्षा माझे मित्र दावतर यांनी व्यक्त केलेली आहे. बोलायचे म्हटल्यानंतर माझी अडचण अशी आहे की, गेल्या दहा वर्षाच्या समीक्षेमध्ये 'आलोचना' या नियतकालिकाचे फार महत्त्वाचे असे स्थान आहे. असेही म्हणायला हरकत नाही की, या एका मासिकाने गेल्या दहा वर्षांत मराठी समीक्षेमध्ये जी भर घातलेली आहे, तेवढी भर घालण्याचा योग या दहा वर्षांत कोणत्याही एका नियतकालिकाला आलेला नाही. म्हणून गेल्या दहा वर्षातील मराठी समीक्षेचा आढावा जर घ्यायचा, तर त्यात जास्तीतजास्त वेळ 'आलोचने 'विषयीच बोलावे लागेल आणि तेही सतत गौरवपर बोलावे लागेल. असे गौरवपर बोलण्यास माझी काहीच हरकत नाही. पण त्यामुळे यजमानांना संकोच वाटण्याचा संभव आहे. आणि दावतरांना संकोचात टाकावे अशी माझी इच्छा नाही.

 एका अर्थी हे घडणे स्वाभाविक होते. 'आलोचना' हे समीक्षेला वाहिलेले नियतकालिक असल्यामुळे त्याच्या प्रत्येकच अंकात वाङ्मयसमीक्षा आहेच. किंबहुना वाङ्मयसमीक्षाच आहे. त्या मानाने इतर भाग अगदीच थोडा आहे. प्रत्येक अंकामध्ये आलोचनात्मक लेखच भरलेले असल्यामुळे दर एक-दोन अंकांनंतर एखादा चांगला आणि महत्त्वाचा लेख 'आलोचने 'तून येतोच. लघुकथा, लघुनिबंध, कविता असे सर्वच वाङ्मयप्रकार हाताळणाऱ्या मासिकांमध्ये अधूनमधून समीक्षणात्मक लेख येतच असतात. पण त्यांची संख्या केवळ समीक्षेला वाहिलेल्या मासिकांमधून जे लेख येतील, त्या मानाने केव्हाही कमीच असणार. संख्येबरोबरच समीक्षेतील विविध उपप्रकार सतत हाताळले जाण्याचा योग जसा 'आलोचने'ला येतो, तसा तो इतर नियतकालिकांना येऊ शकत नाही. 'आलोचना' हे केवळ समीक्षेला वाहिलेले मासिक असूनसुद्धा मराठीतील सर्वच वाङ्मयप्रकारांतील प्रकाशित होणाऱ्या ग्रंथांना योग्य असा न्याय देण्यास ते अपुरे पडते.

१५८ पायवाट