मोठ्यांचा आधार लागून तो काही प्रमाणात वाटेवर येईल या भूमिकेतून आपल्या एका अपत्याचे काहीसे अकल्याण करण्यास तयार झालेला लाचार माणूस हा विषम-विवाहातील वधूपिता असतो. स्वतःच्या मुलांची माया आणि संसाराची चिंता त्याला हे पाऊल उचलण्यास भाग पाडीत असते.
आणि तरीही हा वधूपिता आपल्या मनाच्या समाधानासाठी काही गोष्टी सतत बोलतच असतो. वराचे वय थोडे मोठे असले तरी हरकत नाही; तो शरीराने धडधाकट आहे- गेला बाजार, अजून देवाची दया असली तर पंधरा-वीस वर्षे नवरदेव हिंडता, फिरता, कमावता असायला घोर नाही; मुलीला चार पोरे-बाळे होतील; पोरगी मोठ्या घरी पडेल--अशा प्रकारची स्वप्ने बोलून दाखविणारा, दारिद्रयामुळे दुबळा आणि वात्सल्यापोटी निष्ठुर झालेला असा हा वधूपिता असतो. पैशाच्या दोन घागरी घरी पुरून ठेवणारा, पाच हजार रुपये हुंडा घेणारा व एकुलती एक मुलगी केवळ द्रव्यलोभामुळे म्हाताऱ्यास विकायला तयार झालेला कंजूष, द्रव्यलोभी कांचनभट हा विषम-विवाहातल्या वधूपित्यांचा प्रतिनिधी नाही. अशा घटना घडत नाहीत असे कुणीच म्हणणार नाही. पण अपवादभूत घटना म्हणजे समस्येच्या प्रतिनिधिक घटना नसतात. कांचनभट मुलीचे लग्न मोडले म्हणून वेडा होत नाही, तो हुंडा बुडाला म्हणून वेडा होतो. या वेडेपणाच्या भरातसुद्धा आपला मुलगा जयंत हा जर मुलगीच असता तर त्याचेही पाच हजार रुपये मिळाले असते अशी कल्पना करतो. जवळ पैसे असूनही आपल्याला मुलीच व्हाव्या, मुलगा असू नये, सर्व मुली म्हाताऱ्यांना द्याव्या आणि प्रत्येकीचे पाच हजार रुपये उभे करावेत अशी आकांक्षा असणारा वधूपिता विषम-विवाहाच्या परिस्थितीतील वधूपित्यांचा प्रतिनिधी होऊ शकणार नाही, हे उघड आहे.
शारदेत देवलांनी जो प्रश्न चित्रित करण्यासाठी निवडला आहे त्या सामाजिक प्रश्नावरील देवलांची पकड किती ढिली आहे व सामाजिक प्रश्न समजून घेण्याच्या देवलांच्या मर्यादा किती मोठ्या आहेत, याचे थोडेसे भान ह्या विवेचनावरून होण्यास हरकत नसावी. खरे म्हणजे बाला-जरठ विवाहावरील नाटक शोकान्त होणे अपरिहार्य होते. ही अपरिहार्यता आजच्या टीकाकारांना जशी जाणवते, तशी देवलांना जाणवलेली दिसत नाही. 'शारदेला' प्रस्तावना लिहिणाऱ्या हरिभाऊ आपट्यांनाही ह्या ठिकाणी शोकान्त नाट्याची अपरिहार्यता जाणवलेली होती असे प्रस्तावनेवरून वाटत नाही. नव्या समीक्षकांना ही अपरिहार्यता जाणवते. तिच्या संदर्भात कधीकधी असा प्रश्न विचारला जातो की, पाचव्या अंकाच्या दुसऱ्या प्रवेशात शारदा जीव देण्यासाठी नदीकाठी जाते या ठिकाणी शारदा नदीत जीव देते असा शोकपर्यवसायी शेवट 'शारदे'च्या संदर्भात स्वाभाविक व शोभून दिसणारा झाला नसता काय? मला वाटते, हा प्रश्न विचारणेच भाबडेपणाचे आहे. 'शारदा' हे नाटक सामाजिक समस्या चित्रित करणारे वास्तववादी नाटक आहे असे गृहीत धरूनच हा प्रश्न विचारला जातो. माझा मूळ गृहीताशीच मतभेद आहे.
जर 'शारदा ' नाटक समस्याप्रधान वास्तववादी नाटक असते , तर त्याचा शेवट