पान:पायवाट (Payvat).pdf/154

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रेमही त्यानेच जुळविलेले असते. नायक पैसेवाला व उदार असला म्हणजे विट त्याला दानशूर म्हणतो. हा दानशूर नायक तरुण आणि देखणा असला, गणिकेच्या इच्छेनुसार वागणारा असला, तर ही घटना सुखाची आहे. एरव्ही दुःख समजावयाचे. गणिका नेहमी मत्सरी प्रेयसी असते. नायक-प्रियकराकडे चार दिवस, पुन्हा घरी धंदा, पुन्हा प्रियकराचे घर असा गणिकेचा नित्य प्रवास चालू असतो.आणि विट सर्वांनाच लोचटपणे बोलतो. सर्वांनाच सोयिस्कर उपदेश करतो. तो नपुंसकेलासुद्धा बहुपुत्रा होण्याचा मिस्किलपणे आशीर्वाद देतो.
 जे गणिकांच्या वस्तीत येऊन सर्वस्व गमावतात, त्या मूर्ख लोकांविषयी विटाला सहानुभूती नसते, फक्त जिज्ञासा असते. जे संन्यास घेऊन चोरटा विलास करतात, त्यांच्याविषयी विटाला तिरस्कार असतो. कारण धंदा म्हणून ही परिस्थिती त्याला परवडणारी नसते. विट सर्वांना आश्वासने देतो. ती आश्वासनेही विटाच्या चतुर भाषणाइतकीच खोटी असतात. गणिकाही त्याला आपल्या गरजेनुसार मित्र मानतात. जिला त्याचा उपयोग असतो, ती त्याचे आभार मानते. जिला त्याचा उपयोग नसतो, ती तोंड फिरवते. विट प्रत्येक गणिकेला 'तू कुणाकडून आलीस' हा कायम प्रश्न विचारतो. गणिकांच्या वस्तीत हा प्रश्न अपेक्षित असतो. त्याचे उत्तर अभिमानाने दिले जाते. कारण त्या समाजात या व्यवहारात गुप्त असे काहीच नसते.
 आपल्या अलीकडील नाटकांत स्थळ बदलत नाही. संस्कृत नाटकात नांदीनंतर नाटक सुरू होते, भरतवाक्याने संपते, परिक्रमेने स्थळ बदलते. या बाबी लक्षात घेतल्यास यापुढील भाण आस्वादणे सोपे जाईल. हा सर्वात छोटा भाण वररुची याच्या नावाने उपलब्ध आहे. हा वररुची म्हणजे व्याकरणकार वररुची नव्हे.

वररुचिकृत


उ भ या भि सा रि का
(नांदी संपल्यावर सूत्रधार येतो.)

 कोण तू माझा, मी तरी तुझी कोण ? हे शठा, माझा पदर सोड. तोंडाकडे काय पाहतोस ? मी का तुझ्यासाठी व्यग्र आहे ? सुभग, हे खरे नाही. हे चंचला, दूर हो. तुझ्या प्रियेच्या दंतक्षतांनी अंकित असे तुझे ओठ मी ओळखते. त्या रुसलेलींचा रुसवा काढ, मी ती नव्हे. त्या मनबाधेची मनधरणी कर. ती तुझी. अशा प्रकारची वचने कामपीडित स्त्रिया तुम्हांला प्रणय-कलहात ऐकवोत.
हे तुमच्यासाठी आहे महाराजा! अरे मी बोलू इच्छीत असताना मध्येच हे काय ऐकू येत आहे ? (कान देऊन व कक्षेकडे पाहात ) पहा तर काय देखावा आहे !

 वसंताच्या आगमनामुळे हिरमसलेला लोधवक्ष 'मित्रकार्या 'मुळे ४ गडबडून गेलेल्या विटासारखा दिसत आहे.

१४८ पायवाट