(जातो. विट प्रवेश करतो.)
विट : वा! काय थाट आहे ! मोहरलेले आंबे आणि कोकिळा, झोके, उंची आसवे, अशोक आणि चंद्र ! मदनाचेही मन विचलित करणारी ही वसंताची चिरपरिचित शोभा.
कामीजन परस्परांच्या चुकांना क्षमा करीत आहेत. सम्राटाच्या आज्ञेप्रमाणे दूतीचे ५ संदेश अनिवार्य झाले आहेत. मणी, मोती आणि प्रवाळांनी गुंफलेल्या मेखलांची, रेशमी तलम वस्त्रांची, हार व हरिचंदनाची चव वाढविणारा वसंत वैभवाच्या शिखरावर आहे.
सर्वप्रिय, सर्वांना कामजनक असा हा ऋतू आणि ह्याचवेळी शेठ सागरदत्त यांचा पुत्र कुवेरदत्त व त्याची प्रिया नारायणदत्ता ६ ह्यांचे बिनसले. कारण काय तर भगवान नारायण विष्णूच्या मंदिरात मदनारावन या संगीतकाचा रसानुकूल अभिनय चालू होता आणि कुवेरदत्ताने मदनसेनेची प्रशंसा केली.
झाले. नारायणदत्ता जी रुसली ती “ तुझे प्रेमच तिच्यावर आहे” असा बोल लावून, पायधरणी, समजावणीचा अव्हेर करून आपल्या घरी निघून गेली.
कुबरेदत्ताने आपला सेवक सहकारक माझ्याकडे पाठवून विनविले की, " महाराज वैशिकाचल, ७ आपण ह्या नगरीचे अचल वसंत आहा. माझी दररात्र हजार रात्रींसारखी दीर्घ व कंटाळवाणी झाली आहे. माझ्यावर दया करा आणि आमची जोडी पुन्हा जुळवा.” आता कुबेरदत्त म्हणजे माझा मित्र आणि मी म्हणजे मदनाचे दुःख किती दुःसह आहे ह्याचा अनुभवी जाणता. ८ करणार काय ? सायंकाळ असूनही घराबाहेर पडलो.
घरवाली मोठी शंकेखोर. आता माझे वय झाले इतके तर तिला कळावे, पण तिच्या माथ्यात तिच्या तरुणपणीच्या आठवणीच ९ तेवढ्या रुतलेल्या आहेत. त्या उगाळून मला अडवू लागली. पण नारायणदत्तेचा राग दूर करण्याची माझी प्रतिज्ञा. त्यामुळे बाहेर पडलोच. आणि प्रतिज्ञेची तरी गरज काय ?
आम्रमंजिरीचा मादक गंध आणि सुस्वर कोकिलकूजन रुष्ट सुंदरीचा रुसवा घालवीलच. आणि दानी १० सुंदर, अनुकूल व यौवनाच्या विभ्रमांनी युक्त असणाऱ्या प्रियकराकडून समजूत पटण्यास उशीरच काय ? (परिक्रमा) अहो, ह्या पाटलीपुत्राची शोभा किती अपूर्व ! स्वच्छ झाडलेले, सुगंधी जलसिंचित, फुलांनी सजलेले हे रस्ते. ही जणू घरासमोरची दुसरी घरेच. तऱ्हेतऱ्हेच्या द्रव्यांनी आणि गिऱ्हाइकांनी गजबजलेली ही दुकाने. रावणाच्या दहा तोंडांनी आपापसांत बोलावे तसे वेदाध्ययन, संगीत आणि धनुष्यांचे टंकार ह्यांनी गुणगुणणारे हे भव्य प्रासाद. मेघांच्या गवाक्षांतून कैलासातील अप्सरांनी डोकावून पाहावे, त्याप्रमाणे ह्या प्रासादातन कुतूहलाने पाहणाऱ्या विजेप्रमाणे क्षणभर दिसणाऱ्या प्रमदा.
भव्य गज, देखणे अश्व, आणि सुंदर रथ ह्यांवर आरूढ होऊन इकडून तिकडे