Jump to content

पान:पायवाट (Payvat).pdf/153

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

'चतुर्भाणी' या नावाने चार भाण प्रकाशित केले. हे भाण गुप्त-संस्कृतीच्या काळातील म्हणजे पाचव्या-सहाव्या शतकांतील आहेत, असा निर्णय संशोधकांनी दिलेला आहे. हे कै. कवींना उपलब्ध झालेले जे चार भाण, ते प्राचीन भाण म्हणून ओळखले जातात. संस्कृत वाङ्मयाच्या क्षेत्रात या भाणांची उपलब्धी हा एक सुखद असा प्रकाश मानला जातो.
 या चारही भाणांत विट हे एकच पात्र असले, तरी ते स्वतःची कहाणी न सांगता नायक-नायिकांची कहाणी सांगत असते. या भाणांचे स्थळ पाटलीपुत्र किंवा उज्जैनमधील गणिकांची वस्ती हे आहे. उपहास, उपरोध, अतिशय जिवंत अशी संस्कृत भाषा, विनोद आणि शृंगार हे या प्राचीन भाणांचे वैशिष्टय आहे. भाण समजून घ्यायचा असेल तर तो ज्या वातावरणात निर्माण होतो, त्याची काही प्रमाणात कल्पना असावी लागते.
 गणिकांची वस्ती हे भाणाचे स्थळ असते. भाणामध्ये जी नायिका असते ती गणिका असते, आणि नायक असतो तो व्यापारी अगर सरदारपुत्र असतो. त्याला ही गणिका भोगविलासासाठी हवी असते. ही घटनाच या वेशवस्तीत प्रेम, विरह अशा पद्धतीने सांगितलेली असते. वेश हा सर्व खोटेपणांचा व बदमापीचा अड्डा असतो. येथील प्रेम, कलह, एकनिष्ठा साऱ्याच बाबी खोट्या असतात. कारण सधन गिऱ्हाइकावर रुसणे गणिकांना परवडणारे नसते. रुसावयाचे ते मनधरणी व्हावी म्हणून, आणि तो योग जमला नाही तर आपणहोऊन नायकाकडे जायचे. त्याला अभिसार असे म्हणतात. प्रेमरंजन आणि भोग ही बाजू गणिकेने सांभाळायची. ती प्रेमात पडल्याचा, विरहाचा अभिनय करीत असते. नायकही विरहाच्या बाबी बोलत असतोच. या दर्शनी व्यवहारामागे असणारा धंदा, पैसा, व्यवहार ही बाजू गणिकांच्या माता पाहतात. त्याखेरीज विटांची त्यांना साथ असते. व्यवहारात विट गणिकांना गिऱ्हाइके आणि गिऱ्हाइकांना गणिका गाठून देऊन त्या उद्योगावर चरितार्थ चालवीत असतो, पण बोलताना मात्र तो आपण मित्रकार्य करतो आहोत असे बोलतो. सर्वांनाच व्यावहारिक सत्य माहीत असते. सर्वानीच एक अभिनय चालू ठेवलेला असतो. भाणामधून शब्दांतून दिसत असेल तर तो संकेतमान्य अभिनय आहे. शब्दांमागे जाऊन व्यवहारातील सत्य अनुमानाने जाणायचे असते.
 गणिका-वस्तीची एक स्वतंत्र परिभाषा आहे. या परिभाषेचा विट अवलंब करणार हे उघडच आहे. मराठीत ही परिभाषा फारशी समृद्ध नाही. या परिभाषेत अनेक शब्दांना स्वतंत्र ध्वन्यर्थ आहेत. विटांच्या बोलण्याला जरी भोगविलासाचा गंध असला, तरी त्यांचा रंगेलपणा शब्दापुरता आहे. त्याचा खवचटपणा, मिस्किलपणा आणि विनोद हा मात्र खरा आहे. विटामध्ये उपहासाची शक्तीही खूप मोठी आहे. भाणात काव्यही भरपूर आहे. काही ठिकाणी अतिशय चांगला कल्पनाविलास आहे. पण कल्पकता आणि काव्य भाणात मध्यवर्ती नसून शृंगार आणि उपहास यांचे स्थान या ठिकाणी मध्यवर्ती आहे.

 रतिकलहात रुसलेल्या प्रेयसीची समजूत घालण्याचे काम विट पार पाडतो. कारण

नाट्यछटेच्या निमित्ताने १४७