की तिथे अद्भुत रस येऊ शकतो. याबरोबरच नायक अगर नायिकेचे विरहवर्णन म्हटले की करुण रसाला त्यात अवकाश मिळतोच. यानंतरच्या काळात विश्वनाथाने भाणात कैशिकी वृत्ती असू शकते असे म्हटलेले आहे.
यावरून आपण जर असा अंदाज करू लागलो की, भाणाची रूपे त्या त्या कालखंडात क्रमाने बदलत होती, तर ते अनुमान चुकीचे ठरणार आहे. भाणाचे स्वरूप तेच होते. विट हेच मुख्य पात्र होते. त्याचा व्यवसायही तोच होता. स्थळही तेच होते. पण वेगवेगळ्या विचारवंतांमध्ये विचार करण्याच्या पद्धतीत बदल होता. विट हे पुरुषशपात्र समोर आहे, म्हणून कैशिकी नाही ही विचार करण्याची एक पद्धत. कथानकाच्या वर्णनात स्त्री-शृंगार, गीत-नृत्य, सर्वांचेच वर्णन असते; म्हणून तिथे कैशिकी मानावी, ही विचार करण्याची दुसरी पद्धत. प्रत्यक्ष रंगभूमीवर एकच पात्र असल्यामुळे ते कुणाशी लढू शकत नाही म्हणून भाणात वीररस नसतो, ही विचारांची एक पद्धत, तर विटाच्या बोलण्यात त्याने केलेल्या मारामारीचे वर्णन असते, म्हणून तिथे वीररस मानावा अशी दुसरी पद्धत. एकाच वस्तूबाबत किंवा समोर असणाऱ्या एकाच वाङ्मयप्रकाराबाबत विचार करण्याच्या या भिन्न भिन्न पद्धती आहेत. डे यांच्यासारखे प्रसिद्ध समीक्षकसुद्धा उपलब्ध भाण आणि काव्यशास्त्रातील वर्णने यांचा ताळमेळ जमत नाही अशी शंका व्यक्त करतात. म्हणून हा तपशील करावा लागला. वेगवेगळ्या ग्रंथकारांच्या विवेचनांत जो मतभेद दिसतो, त्याचे कारण भाणाच्या स्वरूपात नाही. भाण तो व तसाच आहे; फक्त विचार करण्याची पद्धत निराळी आहे.
भाणामध्ये एकच पात्र-विट-असते. पण उपरूपक-प्रकारात याहून निरनिराळे असे उपरूपक-प्रकार उल्लेखिले गेलेले आहेत. या उपरूपक-प्रकारात चोरटे प्रेम उघडकीला आणण्याची धमकी देणाऱ्या दासींचे उल्लेख आहेत. नायकाविषयी आपला अनुराग व्यक्त करणाऱ्या किंवा विप्रलंभ व्यक्त करणाऱ्या अशा नायिकांचे उल्लेख आहेत. या रूपकप्रकारांची वेगळीवेगळी नावेही आहेत. संस्कृत रंगभूमीच्या परंपरेत शेकडो वर्षे विविध प्रकारचे एकपात्री प्रयोग चालत आले. भाण हा त्यातील सर्वात प्रतिष्ठित असा एकपात्री प्रकार, इतकाच याचा अर्थ आहे. उरलेल्या एकपात्री उपरूपक-प्रकारांना भाणाची प्रतिष्ठा कधी मिळाली नाही; पण तेही लोकप्रिय होते.
भाणाची चर्चा जरी प्राचीन काळापासून चालत असली, तरी फारसे प्राचीन भाण मात्र उपलब्ध नव्हते. उपलब्ध असणारे भाण तेराव्या शतकानंतरचे होते. असे हे उत्तरकालीन एकूण अकरा भाण उपलब्ध आहेत. या उत्तरकालीन भाणांमध्ये विट नेहमी स्वतःच्या जीवनाची कथा सांगत असतो. आपण गेल्या रात्री कोणते सुखविलास कुणाबरोबर भोगले याचे तो तपशिलाने वर्णन करीत असतो. म्हणजे या भाणांची कथा विटाची स्वतःची कथा असते. प्राचीन भाण दीर्घकालपर्यंत उपलब्ध नव्हते, आणि उत्तरकालीन भाण सांकेतिक व कंटाळवाणे होते. त्यामुळे आधुनिक विद्वानांचे लक्ष दीर्घकाळपर्यंत या वाङ्मयप्रकाराकडे जाऊ शकलेच नाही. इ. स. १९२२ साली एम. रामकृष्ण कवी यांनी गायकवाड प्राच्यमालेत