पान:पायवाट (Payvat).pdf/151

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 नाट्यशास्त्राचा काळ विचारात घेतला तर भाण या नावाने अस्तित्वात आलेल्या प्राचीन संस्कृत नाट्यछटेचा आरंभ आपण सुमारे दोन हजार वर्षांइतका जुना गृहीत धरू शकतो. प्रयोगाच्या दृष्टीने लिहिल्या गेलेल्या, प्रयोग म्हणून यशस्वी होणाऱ्या नाट्यछटांची एवढी प्रदीर्घ परंपरा दिवाकरांच्या मागे उभी होती. या परंपरेची जर दिवाकरांना जाणीव झाली असती, तर मग नाट्यछटेसाठी ब्राउनिंगपर्यंत जाण्याची गरजही त्यांना वाटली नसती. नाट्यशास्त्रात असे म्हटले आहे की, भाण हा नाट्यप्रकार एकपात्री आणि एकअंकी असतो. संस्कृत नाटकांत अनेक प्रवेश असणारे अंक नसतात. म्हणून अंकाचे स्वरूप एकप्रवेशीच असते. भाणही एकपात्री, एकप्रवेशी, एकांकिका असते. भाणात पाच संधीपैकी मुख आणि निर्वहण असे दोनच संधी असतात. भाणामध्ये नाट्यान्तर्गत एकच व्यक्ती रंगभूमीवर असते. ही व्यक्ती विट असते. विट हे पुरुषपात्र आहे म्हणून भाणात गीत-नृत्याला प्राधान्य नसते. सगळे महत्त्व संवादांनाच असते. भाणाची प्रधानवृत्ती भारती असते. नाट्यशास्त्रात भाणाचा प्रधानरस कोणता ? याचा उल्लेख नाही.
 परंपरेप्रमाणे भाणाचे स्थळ गणिकांची वस्ती म्हणजे वेश हे असते. विट हा गणिका आणि गि-हाइके यांचा मध्यस्थ असतो. वृत्तीने रंगेल, धन गमावलेला, वृद्धपणाच्या सीमेवर असणारा आणि सर्वांच्या ओळखी असणारा असा हा विट असतो. तो चतुर, केसांना कल्प लावणारा, आकर्षक कपडे घालणारा, उत्तान-शृंगारिक संभाषण करणारा व जोड्या जुळविण्यावर जगणारा असतो. त्याला आणखी एक नाव धूर्ताचार्य असे आहे. हा विट भाणामधील एकमेव पात्र असल्यामुळे भाणाचा रस शृंगार असणार हे उघड आहे. फक्त नाट्यशास्त्रात तसा स्पष्ट उल्लेख नाही. भाणाच्या या स्वरूपात पुढेही फारसा बदल झालेला दिसत नाही. मात्र नाट्यशास्त्रानुसार भाणाचे कथानक दोन प्रकारचे असते. विट स्वतःच्या जीवनाची हकिकत सांगतो अशाप्रकारचे, किंवा तो नायकाच्या जीवनाची हकिकत सांगतो अशाप्रकारचे.

 नाट्यशास्त्रानंतर दीर्घकाळपर्यंत नाट्यविचारांचे ग्रंथ सापडत नाहीत. ते आज लुप्त आहेत. दहाव्या शतकातील धनंजयाने भाणाची प्रधानवृत्ती भारती असते, तो एकपात्री प्रयोग असतो इत्यादी उल्लेखांसह भाणामध्ये शंगार आणि वीर हे प्रधान रस असतात असाही उल्लेख केलेला आहे. संस्कृत नाटकांमधून विटांचे जे उल्लेख आढळतात, त्यांत विट मारामारी आणि गुंडगिरीसाठी प्रसिद्ध असल्याचा उल्लेखसुद्धा आहे. भासाच्या 'चारुदत्ता'त शकाराबरोबर असणारा विट वसंतसेनेला भर रस्त्यावरून पळविण्याच्याच प्रयत्नात आहे. पुढे शूद्रकाने 'मृच्छकटिका'त या प्रसंगाला वेगळी डूब दिलेली आहे. विटाचा गुंडगिरीतील सहभाग लक्षात घेता त्याच्या कथानकात वीररसालाही अवकाश आहे, असे मान्य करावे लागते. पण हा वीररस शंगाराच्या सोबतीला म्हणून असतो. यानंतर अकराव्या शतकात अभिनवगुप्तांनी भाणामध्ये करण व अद्भुत हेही रस असतात, असे म्हटले आहे. संस्कृतातील अद्भुताची कल्पना पुष्कळच शिथिल अशी आहे. अनपेक्षितरीत्या सुखी शेवट झाला तरीही संस्कृत काव्यशास्त्रानुसार विस्मय आला

नाट्यछटेच्या निमित्ताने १४५
पा....१०