Jump to content

पान:पायवाट (Payvat).pdf/150

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रयोग मोठ्या प्रमाणात प्रायोगिक यश मिळविणारे ठरले. कोणत्याही प्रयोगातील नाटय हे प्रेक्षकांच्या मनात साकार होत असल्यामुळे प्रत्यक्ष रंगभूमीवर वास्तवाभासाला छेद मिळाला तरी त्यामुळे आस्वादाला बाधा आली असे काही सर्वसामान्य प्रेक्षकाला वाटले नाही.
 नाट्यछटेच्या निमित्ताने जो एकपात्री प्रयोग उभा राहतो, त्यात नट एकच असतो आणि तो एकच भूमिका वठवीत असतो. प्रयोगाच्या आरंभापासून शेवटापर्यंत भूमिकेत बदल होत नसल्यामुळे प्रयोगातील अंतर्गत वास्तवाभासाला छेद जाण्याची शक्यता अशा प्रयोगात अतिशय कमी असते. इतर पात्रे गृहीत धरायची असतात. ती प्रत्यक्ष रंगभूमीवर नटांच्याद्वारे साकार होत नसतात. पण ती पात्रे नाट्यानुभवाचा मात्र भाग असतात. या रंगभूमीवर अमूर्त असणाऱ्या पात्रांनाही नाट्यानुभवात स्वतःचे व्यक्तित्व असते. नाट्यप्रयोगात हा गृहीत धरण्याचा भाग फार मोठा आहे. ज्याप्रमाणे नट हा राम आहे, हे नाटयान्तर्गत वास्तव आपण गृहीतच धरले पाहिजे कारण त्याशिवाय प्रयोगाच्या आस्वादाला आरंभ होतच नाही त्याप्रमाणे नाट्यप्रयोग सादर करणाऱ्यांना समोरचा प्रेक्षक तिथे अस्तित्वात नाही हे गृहीत धरलेच पाहिजे. नाट्यप्रयोगात जशा अनेक गोष्टी आपण गृहीत धरतो, त्याप्रमाणे इथे एकाखेरीज असणारी उरलेली सर्व पात्रे गृहीत धरायची असतात. हा सर्वसामान्य संकेत एकदा आपण मान्य केला की मग आपल्या सर्व छटांच्यानिशी सगळे नाटय नाट्यछटा या प्रकारात अबाधित राहते. नाट्यछटा हेही काही मान्य संकेतांवर आधारलेले नाटकच असते. या नाटकांचे प्रयोगसुद्धा यशस्वी होणे अशक्य नाही. एकेकाळी हे प्रयोग यशस्वी झालेले आहेत.
 नाट्यछटाकार दिवाकरांच्या नाट्यछटा आज आहेत त्या अवस्थेतही जिवंत नाट्याचा प्रत्यय देणाऱ्या आहेत. अनेक नाटकांतील नाटकीपणापेक्षा नाट्यछटा अधिक जिवंत आहे. पण जर या वाङ्मयप्रकाराचा मागोवा व्यवस्थितपणे घेता आला असता, तर हा प्रकार याहून गुंतागुंतीचा आणि समृद्ध झाला असता. अशाप्रकारच्या एकपात्री प्रयोगाची प्रदीर्घ परंपरा भारतीय नाट्यात आहे, याची जाणीव स्वतः दिवाकरांना अगर त्यांचे अनुकरण करून नाट्यछटा लिहिणाऱ्या इतर कुणाला दिसत नाही. नाट्यछटेवर विवेचनात्मक मजकूर लिहिणाऱ्या समीक्षकांनाही हा मुद्दा जाणवलेला दिसत नाही. निदान यापूर्वी इतर कुणी या प्रश्नाचा उल्लेख केलेला माझ्या पाहण्यात नाही.

 प्राचीन भारतीय रंगभूमीवर रूपकप्रकार म्हणून एकपात्री नाट्यप्रयोगांची परंपरा प्रदीर्घ आहे. या एकपात्री प्रमुख रूपकप्रकाराखेरीज उपरूपकांमध्ये विविध रसांतील एकपात्री उपरूपकांच्या परंपरा त्याकाळी पुष्कळच विकसित झालेल्या दिसतात. उपरूपकप्रकार सोडले तरी मुख्य रूपकप्रकारात 'भाण' हा एकपात्री प्रयोग आहे. संवाद, स्वगत, आकाशभापिते, परिक्रमा यांनी मिळून भाण या रूपक प्रकाराचे शरीर सिद्ध होते. हा अतिशय प्राचीन नाटकप्रकार आहे. भरतनाट्यशास्त्राच्या काळीच हा रूपकप्रकार प्रतिष्ठित झालेला होता. भरतांनीच दशरूपकांत त्याचा उल्लेख केलेला आहे.

१४४ पायवाट