Jump to content

पान:पायवाट (Payvat).pdf/149

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भूमीवर अनेक नट, अनेक प्रवेश, विविध देखावे, गायनाची समृद्धी- असा फार मोठा पसारा दिसतो. ख्याल गायन रंगभूमीवर आकर्षक स्वरूपात उभे करण्याची धडपड एकीकडे, आणि देखावे अधिक हुबेहूब करण्याची धडपड दुसरीकडे. या दोन प्रवृत्तींनी भारलेला असा तो रंगभूमीचा वैभवकाळ होता. प्रयोगाचा विचार जर दिवाकरांनी केला असता तर त्यांच्या नाट्यछटेचे स्वरूप मुळातच बदलून गेले असते. त्यांच्यासमोर नाट्यछटा होती ती फक्त वाचण्यासाठी होती.
 आणि हा वाचकवर्ग दिवाकरांनी नेहमीच विशिष्ट वयाचा गृहीत धरलेला आहे. त्यांच्यासमोर वाचक, श्रोता आणि प्रेक्षक म्हणून माध्यमिक शाळेतील विद्यार्थी वावरतो आहे. विद्यार्थ्यांच्यासमोर जीवनाचा कोणता भाग यावा, याविषयी शिक्षकाच्या मनात काही संकेत ठरलेले असतात. सगळ्याच ललित वाङ्मयाला आस्वादक म्हणून जो रसिक आपण आपल्या मनासमोर ठेवतो, तो जर दिवाकरांच्या समोर असता तरीही नाट्यछटा बदलली असती. प्रयोगाच्या कल्पनेचा अभाव आणि समोरचा श्रोता या दोन बंधनांमुळे केवळ नाट्यछटेतील विषयाच्याच मर्यादा निर्माण झालेल्या नाहीत, तर तो विषय कोणत्या पातळीवरून, किती खोलात जाऊन पाहायचा, याच्याही मर्यादा निर्माण झालेल्या आहेत. आपण हाताळीत असलेल्या वाङ्मयप्रकारातील शक्यता आणि नाट्यछटेचे प्रायोगिक रूप जर दिवाकरांच्यासमोर किंवा त्यानंतर येणाऱ्या इतर लेखकांच्यासमोर असते, तर ही घटना मराठी वाङ्मयाच्या समृद्धीला हातभार लावणारी ठरली असती, असे मला वाटते.

 नाट्यछटा हा एकपात्री प्रयोग आहे. तो एकपात्री या अर्थाने की रंगभूमीवर एकच नट आपली भूमिका घेऊन वटविण्यासाठी उभा आहे. हा प्रकार सादर करताना दिवाकरांच्या डोळ्यांसमोर प्रसिद्ध इंग्रज कवी रॉबर्ट ब्राउनिंगचे 'मोनोलॉग' होते. ब्राउनिंग हा चिंतनशील, गंभीर आणि प्रौढ मनोवृत्तीचा कवी आहे. भाषाशैलीच्या दृष्टीनेही ब्राउनिंगची भाषाशैली अर्थगौरवाच्या बाजूने संपन्न असली, तरी ती पुष्कळच बोजड असणारी शैली आहे. दिवाकरांनी ब्राउनिंगची चिंतनशीलता, त्याची मनोवृत्ती आणि भाषाशैली यांपैकी कशाचाच स्वीकार केलेला दिसत नाही. त्यांनी फक्त 'घाट' उचललेला दिसतो. हा घाटसुद्धा संस्कारित करून घेतलेला आहे. अलिकडे पु. ल. देशपांडे आणि सौ. सुहासिनी मुळगावकर यांनी काही एकपात्री प्रयोग सादर केले आहेत. त्यांचे अनुकरण इतर अनेकांनी केलेले आहे. या नव्या एकपात्री प्रयोगांत नट एकच असतो, पण तो नाट्यान्तर्गत असणाऱ्या अनेक व्यक्तींच्या भूमिका क्रमाने वटवीत असतो. सर्वांचेच संवाद त्या त्या भूमिकेत अनुप्रवेश करुन नट बोलत असतो. परंपरागत रसर्चच्या परिभाषेत सांगायचे, तर या नव्या एकपात्री प्रयोगात एकाच नटाला क्रमाक्रमाने वेगवेगळ्या अनुकार्याशी एकरूप व्हावे लागते. अर्जुन आणि सुभद्रा, कृष्ण आणि रुक्मिणी असा सारखा भूमिकांचा बदल आणि भूमिकांची पुनरावृत्ती या प्रयोगात होत असते. यामुळे नाट्यप्रयोगातील आभासमय वास्तवाला सतत छेद मिळत असतो. असे अजूनही हे एकपात्री

नाट्यछटेच्या निमित्ताने १४३