Jump to content

पान:पायवाट (Payvat).pdf/148

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

लेखकाच्या वयाच्या वाढीबरोबर त्याचे व्यक्तिमत्त्व अधिक परिपक्व व्हावे आणि वाङ्मयात प्रतिबिंबित व्हावे ही अपेक्षा दिवाकरांचे लिखाण पूर्ण करीत नाही.

 या नाट्यछटा आकाराने फारशा मोठ्या नाहीत. त्यांतील सर्वात मोठी नाट्यछटा सत्तावन्न ओळींची आहे. इतर बहुतेक तीस-पस्तीत ओळींच्या आहेत. पाने आणि ओळी हे बहिरंग सोडून आपण अंतरंगाकडे वळलो, म्हणजे आपणास अतिशय विविध आणि जिवंत अनुभवांच्या नाट्यजगात प्रवेश केल्याचे आढळून येते. या नाट्यछटांमधील नाट्य तसे स्थूलच आहे. बहुतेकवेळी बोलणे आणि वागणे यांतील विरोधच निरनिराळ्या व्यक्तींच्या रूपाने आपल्यासमोर येतो, हेही खरे आहे. काही वेळेला माणसे बोलल्याप्रमाणे वागण्याचे ठरवितात आणि या त्यांच्या स्वतःशी प्रामाणिक राहण्याच्या जिद्दीतूनच फार मोठे संघर्ष उभे राहतात. वागण्याबोलण्यात विरोध असणे, हा सामान्यांच्या जीवनाचा परिपाठ आहे. वागण्या-बोलण्यात संगती ठेवण्याच्या धडपडीतून असामान्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार येत असतो. दिवाकरांच्या नाट्यछटेत या प्रकारचे नाट्य टिपलेले नाही. परस्परविरोधी अशा प्रेरणांच्या ताणांत माणसाची इच्छाशक्ती कधी बधिर होऊन जाते. त्या अवस्थेतच तो स्वतःशी काही बोलू लागतो, काही स्पष्टीकरण करू लागतो. ही किंकर्तव्यमूढताही नाट्यरूप घेते. नाट्यछटेत असे घडताना दिसत नाही. फार खोल असे चिंतन, जीवनदर्शन अगर जीवनाच्या गूढ रहस्याला स्पर्श असे काहीही दिवाकरांच्या नाट्यछटेतून दिसत नाही. तरीही पण या वस्तुस्थितीमुळे जे आहे ते फारसे खोल नसले तरी अतिशय नीटस, रेखीव, मोहक आणि जिवंत आहे, हे सत्यही नाकारता येत नाही. आपल्या या अतिशय मोजक्या लिखाणामुळे मराठी सारस्वतात दिवाकर आपला ठसा अमर करून गेले आहेत, यात शंकाच नाही.
 या नाट्यछटा लिहिताना दिवाकरांनी स्वतःवर काही मर्यादा घालून घेतलेल्या आहेत. या मर्यादांचा नाट्यछटेच्या केवळ बहिरंगावर परिणाम झालेला नसून अंतरंगावरही तो झालेला आहे. या नाट्यछटा लिहिताना त्यांच्या प्रयोगाची जाणीव दिवाकरांच्यासमोर जवळजवळ नाहीच. प्रयोगाच्या दृष्टीने जर त्यांनी विचार केला असता, तर इतर अनेक बाबींचा विचार दिवाकरांना करावा लागला असता. त्याचा परिणाम नाट्यछटेच्या स्वरूपावर झालाच असता. माध्यमिक शाळांच्या स्नेहसंमेलनांतून या नाट्यछटांचे प्रयोग अधूनमधून होतात, पण कोणताही प्रयोग कधी फारसा यशस्वी होत नाही. नाट्यछटांचे प्रयोग पाहताना सतत हे जाणवते, की प्रेक्षकांना प्रयोगाशी समरस होण्याची वेळ येण्यापूर्वीच नाट्यछटेचा प्रयोग संपून जातो. नाट्यप्रयोगाची बांधणी काही प्रमाणात स्वतंत्रच असते. नाट्यप्रयोगाचा आस्वाद वैयक्तिक नसून तो सामूहिक असतो. या जनसमूहास प्रयोगाशी समरस होण्यासाठी काही अवधी असावा लागतो. प्रत्येक वाक्यातील खोचदारपणा प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यास संधी मिळावी लागते. प्रसंग आणि रचनांची विविधता, संवादांचे स्वरूप यांचाही विचार प्रयोगाच्या संदर्भात करावा लागतो. दिवाकरांच्यासमोर वैभवाने मिरवत असलेल्या रंगभूमीचे रूप ध्यानात घेतले, तर त्या रंग

१४२ पायवाट