पान:पायवाट (Payvat).pdf/141

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

होऊ लागते. त्याच्या कवितेवर तिच्या शब्दांचा पाहारा असतो. इच्छांचे घर लेखणीने टोकरले जात असते. त्यावर दोघांच्याही आकांक्षा कवितेत गुंडाळल्या जातात. शेजारी तिच्या गालांचा गारवा असतो. तीच या तप्त जीवनात हिरव्या फांदीची सावली आहे. तिच्या पापणीच्या पाहाऱ्यात सगळे चांदणे घरट्यात उतरू लागते आणि कवी आपलेच पंख पसरून मोराप्रमाणे नाचू लागतो. तिच्या पापणीच्या पाहाऱ्यात याची कविता असते, तर तिच्या झोपेवर याचा पाहारा असतो. चंद्रावळ खुराड्यात दमून निजलेली असते, कवी शब्द जुळवीत उशाशी बसलेला असतो. एकेक स्वप्न सारिका होऊन तिच्याशी बोलत असते. अशावेळी झोपेतल्या कृष्णाबरोबर सारे गोकुळ खेळत असते. अक्रुरांच्या सैनिकांनी येऊन ही झोप मोडू नये असे कवीला वाटते. सौख्याच्या इच्छा श्रीमंतांनाच असतात असे नाही. दारिद्रयातही स्वप्न रंगत असते. असे वाटते, सगळे विसरून जावे, तिला घेऊन निळ्या समुद्राकाटी जाऊन सुखदुःख विसरून शांत पडावे, रात्र संपूच नये. माझ्या बाहूत तिने स्वप्ने पाहावीत. पण या स्वप्नरंजनाला अर्थ नसतो. असे वाटणारे क्षण माघारी निघून जातात. कारण लोकल धरायची असते.
 ही आपल्या प्रिय सखीची जाणीव सारखी कवीच्या मनात डाचत असते. जेव्हा ती जवळ नसते, तेव्हाही मन तिच्याचभोवती घिरट्या घालीत असते. उदास काळोखात झाडांची पाने सळसळत असतात. आता ती कूस बदलत असेल. कदाचित आता ती उठली असेल. कदाचित कापल्या ओळीवर अश्रू टपटपत असतील. पण हा एकमेकांच्या आठवणींचा धागा परिपूर्ण नाही. तिथेच अजून एक परिमाण आहे. ते संसाराचे आहे. कारण कदाचित ती बाळ-अंगाखालील चिरगुटेही बदलत असेल. तिच्याभोवती मन असे गुरफटलेले असल्यामुळे निसर्गाशी तन्मय होणे कठीण आहे. पावसाळासुद्धा केवळ पावसाळा न राहता त्याचे स्वरूप या ठीकाणी बदलून जाते. प्रत्येकाने पावसाळ्याचे वर्णन निराळे केले आहे. आकाश ढगांनी व्यापून गेले म्हणजे कुणाचा विरह अधिक तीव्र होतो. पावसाची पहिली सर आल्याबरोबर सबंध संसार जीवनमय झाल्यासारखे कुणाला वाटू लागते. धावणाऱ्या क्षणाला ओलसर गोडी येते, मेष लाल कौलारे हुंगू लागतात, असे कुणाला वाटते. पण ज्यांची जगण्याचीच लढाई चालू आहे, त्यांच्यासाठी पावसाचा आरंभ हा नव्या दुःखाचा आरंभ असतो. फुटपाथवर झोपणाऱ्यांना पावसाच्या सरी फारशा नयनरम्य वाटणे शक्य नसते. आकाश ढगांनी भरून येते. त्याचा उन्मत्त गडगडाट चालू राहतो. विजेच्या आसुडाने रस्ते आणि मेघ दुभंगल्यासारखे वाटू लागतात. या वादळात दबलेला सगळा गाळ वर येतो. पण कवी निसर्गाच्या या रौद्र रूपात हरवू शकत नाही. कारण या पाण्याने भरलेल्या वाटांवरून दोन पोरे सांभाळीत ती घरी कशी येईल, हा प्रश्न त्याला पडतो. ही जगण्याची लढाई निसर्गाकडे कवीला मुक्तपणे पाहू देण्यास तयार नाही.

 अशा सर्व ठिकाणी एक प्रश्न पुनःपुन्हा निर्माण होतो की, भोवतालचे जग अशा रीतीने स्वतःच्या संदर्भात पाहणे उचित आहे काय ? जेव्हा पावसाळा येतो तेव्हा

नारायण सुर्वे यांची कविता १३५