Jump to content

पान:पायवाट (Payvat).pdf/140

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

त्या त्या क्षणी त्या अनुभवाचे स्वयंभू व स्वयंपूर्ण असणे हा जीवन-वास्तवाचा एक भाग आहे. प्रेममीलनाच्या क्षणी त्या मीलनाचाच एक उन्माद आणि उल्हास असतो. तिथे बाकीचे सगळे संदर्भ निदान त्याक्षणी रद्द होऊन जातात. पण जीवनाच्या या वास्तवाला अजून एक दुसरी बाजू आहे. आणि ही बाजू वास्तवाचाच एक भाग आहे. ज्याचा जगण्यासाठी लढा चालू आहे, त्यांचे मन या लढ्यातून कधी मोकळे होऊच शकत नाही. मग भावनांना आणि वासनांनाही कुठेकुठे वास्तवाचे पदर प्राप्त झाले आहेत, कुठे वास्तवाच्या चौकटी पडल्या आहेत, असे जाणवत राहते. सुर्व्यांच्या कवितेतील प्रेयसीचे चित्र हे नुसते प्रेयसीचे चित्र नाही, तर ते भक्कम सहकारिणीचे, आधार देणारीचेही चित्र आहे. आणि प्रेरकाचे, मार्गदर्शकाचेही चित्र आहे. येथे प्रिया प्रेयसी म्हणून, सहकारी म्हणून, आणि नियंत्रक म्हणून एकाच वेळी उभी राहते. पण त्यातून जन्मणारी कहाणी एकमेकांची नाही. ती एक सांसारिक कहाणी होऊन जाते.
 एक दिवस ही प्रेयसी कवीच्या जीवनात त्याची पत्नी म्हणून प्रवेश करते. या आधीचा सगळा भाग जणू या कवितेने रद्द करून टाकला आहे. म्हणून भेटी, आठवणी, हुरहूर, लज्जा, अस्वस्थता, काहूर, आश्वासने, आतुरता हा सगळा पूर्वभाग या कवितेतून पुसलाच जातो. मीलनापासूनच या कवितेला आरंभ होतो. जणू जबाबदारीने एकमेकांची जीवने संलग्न केली, इथूनच नात्याला आरंभ झाला. पण या मीलनाच्या क्षणालाही पुन्हा वास्तवाचे संदर्भ आहेत. पलीकडे खडखडणारे कारखाने आहेत. खोल्या-खोल्यातून अंथरलेले बिछाने आहेत. ईश्वराच्या नावे मुल्लाने दिलेली शेवटची हाक आहे. शेवटी या नव्या जोडप्याने एकत्र यायचे कुठे ? भावंडांना घेऊन आईने कोनाडा जवळ करावा आणि बापाने फुटपाथवर जाऊन झोपावे, तेव्हा एकान्त मोकळा होतो. म्हणूनच या एकांताला मीलनाची, समर्पणाची ओढ आहे. शब्दांची गरज नाही. तेव्हाही रात्र घुमी होती. आजही रात्र घुमी आहे. वास्तवाचा हा संदर्भ असला तरी ओठ गरम असतात. रात्री ओढाळ असतात. ओठ खडीसाखर होतात. या रतीचा शेवट रती नाही. रतीचा शेवट नव्या पिढीचा जन्म आहे. या नव्या पिढीचा जन्म जसा एक आनंद असतो, तशी एक जबाबदारीही असते. एक टप्या अधाशीपणे घुम्या रात्रीत हरवण्याचा असतो; दुसरा टप्या या काठावर विसावण्याचा असतो. पण भाकरीचे प्रश्न कधी संपत नाहीत. कोनाडा कितीही हळहळला, तरी न टळणारे एकच उत्तर असते ते म्हणजे, 'बाबा नारायणा, उद्यापासून तिलाही काम पाहा.' या चौकटीत सुर्व्यांच्या कवितेत वासनेला जागा आहे.

 ही प्रेयसी नुसती रतीची सहचारिणी नाही. ती घराच्या उभारणातील एक महत्त्वाची भागीदारीण आहे. ती जेव्हा दमून घरी परत येते, तेव्हा सगळे आकाशच छानसे पाखरू होऊन खिडकीत येऊन बसते. तिच्याबरोबर श्वास बाहेर जातात, दम कोंडला जातो. ती घरी आली म्हणजे श्वास पुन्हा सापडतात. या तिच्या सहकार्यामुळे तिच्या आणि कवीच्या जीवनाचे धागे एकत्र गुंफले जातात. तिच्याही कष्टाची जाणीव

१३४ पायवाट