पान:पायवाट (Payvat).pdf/139

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

उसवणे आणि उजेड शिवणे चालू असते. दुसऱ्या बाजूला प्रकाश माळून उत्सव करणाऱ्या वाटा असतात. कुठे बुटका उजेड पहारा करतो, शब्द साय पांघरलेले असतात. म्हातारा काळोख खुरडत येतो. काळोखाच्या गार वेटोळ्यात जीवन झोपलेले असते. कलंडणाऱ्या दौतीतील शाईसारखा समुद्र निळा असतो. वेश्यांच्याप्रमाणे शब्द डोळे उचलतात, आणि डोळा घालून जवळ येण्यास खुणावतात. आत्मा चुलाण्यात फडफडणाऱ्या लाकडाप्रमाणे फडफडतो. कवीला ब्रह्मांडात हंबरत हिंडता येत नाही. स्वतःच स्वतःच्याजवळ दया मागणारे त्याचे केविलवाणे हात याला कधी दिसतात.-अशा प्रतिमा ओळीओळींतून विखुरलेल्या आहेत.
 पण तारे, वारे आणि लाटा, फुले, पाने आणि चंद्र यांच्याशीच कवितेतील प्रतिमासृष्टी निगडित असते असे ज्यांना वाटते, त्यांना ' किनाऱ्यावर ओझे उतरतात तसा शीण उतरून ठेव' ही प्रतिमा वाटणे कठीण आहे. या मंडळींनी 'दगड' ही कविता मुद्दाम वाचली पाहिजे. कारण या कवितेत अजून पाय मुडपून न निजलेली लाट आहे. न कललेला चंद्र आहे. प्रियेचे फूल पण तिला विसरलेले नाही. आणि दूरवर उजेड नांगरून पडला आहे. आणि ही कविता तारा पिळून सुरांत जुळलेल्या सतारीसारख्या सूरगर्भ प्रेयसीशी बातचीत करणारी आहे. क्रांती वगैरेची तिच्यात काही भानगड नाही. सुर्व्याच्या कवितेतील या प्रतिमांना जिवंत अनुभव साकार करण्याच्या संदर्भात महत्त्व आहे, म्हणून त्या जाणवत नाहीत. पण या प्रतिमा सांकेतिक नाहीत. त्या अनुभवाचे शरीर झालेल्या आहेत, हे नाकारता येत नाही.
 म्हणून सुर्व्यांची कविता गद्याच्या अगदी जवळ गेलेली पण कविता आहे. उलट एखाद्या सुंदर तरुणीने विभ्रमाचे आणि कपड्याचे शिष्ट अडथळे झुगारून देऊन सरळ वेभान आलिंगन द्यावे, असे पाहतापाहता वाचकांच्या मिठीत हरवून जाणारे असे या कवितेचे रूप आहे. अनुभवाचा ताजा जिवंतपणा हेच तिचे सामर्थ्य आहे. जिवंतपणाच्या खात्रीवर उरलेली रचनाप्रयोगाची पांघरुणे तिने आधीच झुगारून दिलेली आहेत.

 सुर्व्यांच्या कवितेकडे एका कम्युनिस्टाची प्रचारकी कविता म्हणून पाहण्यात सारेचजण इतके गढलेले आहेत की या कवीच्या जीवनात एका मार्दवाचा जिवंत पन्हाळ आहे, ज्या पन्हाळाने काळोख पांरुणाप्रमाणे आश्वासक केला आहे, आणि दुःख मिठाप्रमाणे रुचकर व मधुर केले आहे हे त्यांना जाणवतच नाही. कवितेचा हा भागच सहसा त्यांच्या कधी लक्षात येत नाही. ही कहाणी केवळ 'मी'ची कहाणी नाही. ती 'मी'च्या सहचारिणीचीसुद्धा कहाणी आहे. किंबहुना या विद्यापीठात हा विद्यार्थी शिकत राहिला तो या प्राध्यापकाच्या आधाराने. हा आधार जर नसता तर विद्यापीठातून विद्यार्थी केव्हाच पळून गेला असता. सुर्व्यांच्या कवितला प्रेमभावनेचे, वासनेचे रंग आहेत. संसाराचा गंध आहे. फक्त त्याचे रूप आमच्या साच्यात बसत नाही. पण म्हणून ते नाकारायचे की काय ? याचे उत्तर या कवितेच्या चाहत्यांनी दिले पाहिजे. सामान्यत्वे कवितेत वासनेला आणि भावनेला एक स्वयंभू महत्त्व आलेले असते. हे

नारायण सुर्वे यांची कविता १३३