पान:पायवाट (Payvat).pdf/138

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

येते. चंद्रा नायकिणीच्या पुढ्यातला पोर युद्धाचे गिधाड अलगद उचलून नेते, त्यामुळे त्या नायकिणीने किंवा कवीने कायमच्या शांततेसाठी एखादी प्रचारआघाडी उघडलेली नाही. कवीलाच पोटाशी धरून ती नायकीण आपल्या वात्सल्याला एक अधिष्ठान शोधते. आफ्रिकी चाचा काम करणे नाकारतो. कवी त्याचा संपाचा हक्क सांगत नाही, संपाचे औचित्य सांगत नाही. तो फक्त काम केले नाही तर पोट कसे भरेल इतकेच विचारतो. कवीला आठवतो आहे तो चाचाचा पाठीवरून फिरविलेला हात, सद्गदित झालेला गळा, एक गळून पडलेला अगतिक अश्रू. या सगळ्यांचे प्रयोजन काय आहे ? या उघड्यानागड्या नागव्या जगात वावरताना कवीने टिपलेल्या अनुभवांना कोणतेही बाहेरचे प्रयोजन नाही. त्या अनुभवाचे मोठेपण त्या अनुभवातच आहे. दोन देत, दोन घेत जगायचे आहे; हे जगताना 'पापणी ठेवीन जागी' इतकेच कवीचे आश्वासन आहे. ही कविता प्रयोजनवती आहे हा मुद्दा गृहीत धरायचा आणि मग तिची लय प्रयोजक लय आहे असे म्हणायचे, यात काहीच अर्थ नाही.
 याच मुद्दयातून निर्माण होणारा दुसरा एक उपसिद्धान्त आहे. जी कविता प्रयोजनवती असते, तिचा उद्देशच डिवचून जागे करणे हा असतो. या कवितेचे स्वरूप व्याख्यानासारखे असते. आणि त्या व्याख्यानाला एक शैली असते. ही शैली जितकी प्रक्षोभक असते, तितकी परिणामकारक असते. पण तितकीच ती अर्थघनतेच्या दृष्टीने, अनुभवाचे व्यक्तिवैशिष्टय टिकविण्याच्या दृष्टीने पोकळ आणि निर्जीव असते. सुर्वे यांची कविता अशी पोखरलेली कविता आहे, हा तो उपसिद्धान्त आहे. या उपसिद्धान्ताचा मूळ पायाही कविता प्रयोजनवती आहे हा असतो. त्यामुळेच या कवितेला अनेकपदरी अनेकार्थसूचकता आहे की नाही हा प्रश्न निर्माण होतो. सुर्व्यांची कविता वरवर दिसताना तरी गद्याच्या अगदी जवळ गेलेली असते आणि त्यांच्या कवितेतील प्रतिमा न जाणवण्याइतक्या आशयाशी एकजीव झालेल्या दिसतात. म्हणून या कवितेत प्रतिमांचे वैभवच नाही असे समजणे चुकीचे होईल. एक गोष्ट खरी आहे की, आशयाकडे डोळेझाक करण्यास भाग पाडणाऱ्या, स्वतःकडे स्वतंत्र लक्ष वेधून घेणाऱ्या प्रतिमा या कवितेत नाहीत. पण याही कवितांना स्वतःचे असे एक प्रतिमांचे सामर्थ्य आहे. उगवत्या रोपाची दोन्ही पाने जुळलेली असतात. हे पाहताच बहिणाबाईना उगवणाऱ्या सूर्यनारायणांना ही पाने नमस्कार करीत आहेत असे वाटू लागते. बहिणाबाईच्या श्रद्धाळू मनाशी आणि जीवनाशी एकजीव झालेली ही प्रतिमा आहे. अशा प्रतिमा जागजागी सुर्व्यांच्या कवितेत आहेत. त्यांना भाकरीचा चंद्र दिसतो. कारखान्यांनी दगडी गाऊन घातलेले आहेत. मेलेले शब्द खाटकाच्या दुकानात हारीने मांडलेल्या धडांसारखे आहेत. जन्म पोक असलेल्या म्हाताऱ्या घरात होतो. भोवतालचे जग पाठ शेकवीत बसलेले आहे. स्मृतीच्या दगडांवर त्यांचे मन ऊन खात बसते. तिसऱ्या पाळीच्या कामगाराप्रमाणे विचार मनात येतानाच थकलेले असतात. काही शब्द कुदळ घेऊन रस्ता खोदणारे असतात. काळोख कोरीत कुठे जीव जगतो तर वाघुट आटवून चाललेल्या भोयांप्रमाणे मन दबकत जाते. एका बाजूला अंधार

१३२ पायवाट