जिवंत ठेवणे भाग आहे.
ज्याला आपण शब्द जपणे म्हणतो, त्या रूढ अर्थाने सुर्व्यांची कविता ही शब्द जपणारी कविता नाही. कारण, तिला शब्दांच्या नादाचा मोह नाही. वेचक नवेनवे शब्द हुडकून काढावेत, शब्दांच्या व त्यांच्या मांडणीचे प्रयोग करावे, असा जाणीवपूर्वक प्रयत्न सुर्व्यांच्या कवितेत नाही. या दृष्टीने सुर्व्यांची कविता नवकवितेतील अभिव्यक्तीच्या सर्व तिरकसपणाच्या प्रयोगांना तुच्छ करून टाकणारी कविता आहे. मराठी नवकवितेला अभिव्यक्तीच्या तिरकसपणाचे एक स्वतंत्र महत्त्व वाटते. जणू तिरकसपणा हेही वाङ्मयीन मूल्य आहे, असे या कवितेत गृहीत धरले आहे. जे सरळ सांगताच येणे शक्य नाही ते सांगण्यासाठी भाषा वाकडीतिकडी करावी लागली, तर ते आपण क्षम्य मानू , किंवा अशावेळी भाषेचे शरीर मुद्दाम पिरगाळून वाकडीतिकडी करणेही आपण अपरिहार्य मानू . कारण अशा ठिकाणी मांडणीची पद्धती सरळ ठेवण्याच्या नादी लागून आशयाची मान मुडपून टाकण्यापेक्षा, आशयाचे जिवंत स्पदंन शिल्लक ठेवण्यासाठी भाषेची बोटे तिरपी करणे भाग असते. पण ज्यावेळी आपला तिरकसपणा आणि तिरकस राहण्याचा स्वभाव हा भाषेला हक्क वाटू लागतो, त्यावेळी पुन्हा एकदा या प्रश्नाचा नव्याने विचार करावा लागतो. उदाहरण म्हणून आपण खालच्या ओळी पाहू शकतो. मर्ढेकरांनी ज्यावेळी " पिपात मेले ओल्या उंदिर" अशी रचना केली, त्यावेळी आपण " ओल्या पिपात उंदीर मेले" असे मर्ढेकरांनी का म्हटले नाही याचा विचार करू शकतो. त्यांना पीप आणि मरून पडलेले उंदीर ही प्रतीके ज्या अर्थाने वापरायची आहेत, तो अर्थ नेमका करण्यासाठी अशी रचना करावी लागते, हे मान्य करता येते. पण सर्वच ठिकाणी हा प्रकार नसतो. काही ओळी अशाही असतात-
या ओळींचा अर्थ लागत नाही. त्या दुर्बोध आहेत असे मी म्हणणार नाही. पंडिती कवितेतील दूरान्वयाला न घाबरता कवितेचा पदान्वय करणाऱ्यांना ही कविता समजण्यास अवघड वाटण्याचे कारण नाही. कारण विभक्तिप्रत्ययांनीच सगळ्या सोयी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. हे डोळ्यांचे तळे एक विचित्र पदमपात्र आहे. हे पदमपात्र, भ्रमररात्र मेषपर्णीनी जरी झाकले तरी काय ? कारण पद्मपात्रात मध कुठे आहे ? असा या ओळींचा अन्वय लागतो. प्रश्न इतकाच आहे : हा मांडणीचा तिरकस प्रयोग करणे आवश्यक होते काय ?
याठिकाणी असा प्रयोग आवश्यक होतो किंवा नाही, यावर दुमत संभवते. पण असे तिरकसपणाचे प्रयोग का करावेसे वाटू लागतात, याचे उत्तर दिले पाहिजे. खऱ्या कवितेत शेवटी आशय आणि अभिव्यक्तीचे अद्वैत असते. ज्या कवितेत अभिव्यक्तिपद्धतीची आशयातून भिन्न अशी निराळी जाणीव होऊ लागते, तिथे कवितेवर तंत्रवादाने मात केली आहे असे म्हटले पाहिजे. तंत्रवाद ही एक वृत्ती आहे. तो सांकेतिक कल्पना