पान:पायवाट (Payvat).pdf/137

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

विलासाच्या रूढ राजरस्त्यानेच येईल असे नाही. आरंभ-शेवटाची चिरेबंदी इमारत इतकेच तंत्रवादाचे रूप नसते. आशयापेक्षा निराळी अशी स्वतःकडे लक्ष वेधून घेणारी प्रत्येक क्लुती हा तंत्रवादाचा एक भाग असतो. म्हणून ज्या कवितेत आशयच प्रधान असतो, आणि त्याला योग्य वाहन इतकेच अभिव्यक्तीचे स्थान असते, त्या कवितेत शब्द हा शरीराशी अवयव एकजीव व्हावा तसा कवितेशी एकजीव झालेला असतो. आधुनिक मराठी कवितेत रचनेच्या दृष्टीने सुर्व्यांच्याइतकी साधी कविता इतर कोण्याही कवीची नाही. सुर्वयोच्या या साधेपणाची तुलना जर आधुनिक काळात कुणाशी करता आली, तर ती फक्त बहिणाबाई चौधरींच्याबरोबर करता येईल. मर्ढेकरांच्या कवितेतील अशा साधेपणाचे स्वरूप निराळे आहे. “टिऱ्या-अर्धपोट । जोवरी आहेत । ओंगळ समस्त | आम्ही नंगे ॥” असे मर्ढेकरांनी म्हटले आहे. “ नाही कुणी जर कुणाचा | बापलेक मामा भाचा । मग अर्थ काय बेंबीचा । विश्वचक्री ।। " असेही मर्ढेकरांनी म्हटले आहे. पण ज्या ठिकाणी मर्ढेकरांची कविता इतकी रोखठोक होते, त्यावेळी ती आपली बहुतेक सर्व काव्यमूल्ये गमावून बसलेली असते. मर्ढेकरांच्या समर्थकांनीही " 'काही कवितां 'तील कवितांमध्ये मर्ढेकरांचा आवाज चिरका होऊन फाटला आहे" असेच म्हटले आहे. बहिणाबाईचे तसे नाही. “ बिना कपासीनं उले । त्याले बोंड म्हणू नाही । हरिनामा इना बोले। त्याले तोंड म्हणू नाही ॥” हा बहिणाबाईंचा प्रयोग नाही. त्या कवितेची ही प्रकृतीच आहे. बहिणाबाईंची कविता सर्व दुःखे पचवून त्यावर मात केलेल्या तृप्त श्रद्धाळू मनाची कविता आहे. सुर्व्यांची कविता तशी दुःख पचविलेली आहे, पण ते त्यांच्या रक्तातून जागे आहे. हा दोन कवितांच्यामधील प्रकृतिभेद मान्य केला, तरी रचनेचा साधेपणा आणि सरळपणा शिल्लकच राहतो. वरवर पाहताना त्यामुळे सुर्व्यांची कविता गद्याच्या अगदी जवळ सरकल्यासारखी दिसू लागते. ती मनातल्या मनात वाचताना तर त्या कवितेची लयही जाणवत नाही. कारण सुर्व्यांच्या कवितेला रचनेची फारशी लय नाही. त्या कवितेत जी लय आहे, ती त्या कवितेतील आशयाची आहे. आशयाशी इतकी एकजीव झालेली आणि रचनेची सर्व प्रावरणे फेकून देऊन फक्त शब्द हेच शरीर धारण करणारी अशी ही कविता आहे. तरीही या कवितेत एक आंतरिक ताल आढळतो. तो ताल आणि लय व्यथेशी सहकंप घेणे आणि कथेचे तटस्थपणे दर्शन घेणे यांतून निर्माण झालेला ताल, लय आहे.

 एका समीक्षकाने या कवितेला प्रयोजक लय आहे असे म्हटले आहे. हा प्रयोजक लयीचा मुद्दा एका चुकीच्या गृहीतकृत्यावर आधारलेला आहे. ही कविता प्रयोजक आहे. या समजुतीतून हा मुद्दा उपस्थित होतो. सुर्व्यांच्या कवितेला असे कोणते प्रयोजन आहे काय ? ती आपल्या वाचकांकडून कवीसाठी कीव, अनुकंपा, दया मागणारी कविता आहे काय ? एखाद्या लढाईच्या रथाला कवितेने स्वतःला जुंपून घ्यावे आणि इतरांना साह्यासाठी आवाहन करावे, असे या कवितेचे रूप नाही. 'माझे विद्यापीठ 'सारख्या कवितेतसुद्धा कवी याकब नालबंदवाला दंग्यात मेला म्हणून सांगतो. दंगे का होतात ? आणि ते टाळाण्यासाठी कोणती उपाययोजना करावी हे सांगत नाही. फक्त कवीच्या डोळ्याला पाणी

नारायण सुर्वे यांची कविता १३१