Jump to content

पान:पायवाट (Payvat).pdf/135

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

बाहेर पडावा असेही कधी वाटते. तर द्रोपदीची लाज जशी राखली गेली, तशी आपल्या भाषाशरीरात म्हणजे शब्दांची लाज राखली गेली, तरच आशय शिल्लक राहू शकेल असेही वाटू लागते. शब्दांविषयी असणारी ही जाणीव कमीजास्त प्रमाणात प्रत्येक कवीमध्ये आढळते. सुर्व्यांना या शब्दांचा मोहही आहे, त्यांचा तिरस्कारही आहे. कारण शब्द जसे मित्र आहेत, तसे शब्दच शत्रूही आहेत. हे शब्द परिचारिकांप्रमाणे आशयाची सेवा करणारे असावेत, कामगारांच्याप्रमाणे आशयाची निर्मिती करणारे असावेत, ही अपेक्षा करणे ठीक आहे. पण नेहमीच शब्द असे असतील याचा नेम नाही. काही शब्द खाटकाने ओळीने मांडलेली, सोलून ठेवलेली मृत शरीरे असावीत त्याप्रमाणे विक्रीसाठी मांडलेले, वापरापूर्वीच मृत झालेले असतात. काही शब्द माणसांप्रमाणे घाटगे झालेले असतात. समर्थ शब्दसुद्धा तापून, शेकून निघाल्याशिवाय समर्थ होत नाहीत. शहर तापले म्हणजे शब्द तापतात. जीवनाचा अग्नी जेव्हा शब्दांत साठला जातो, तेव्हा तो धगधगीत शब्द ओठांओठांवर ओक्ला जातो. तो पिढ्यापिढ्यांचे मनोगत सांगू लागतो. पण याही शब्दांना चकवा देणारे हुजरे असतात. ते साय पांघरून बसतात. प्रेमळपणे येणाऱ्या-जाणाऱ्यांना आश्वासन देतात आणि चुकीच्या रस्त्याने वाटभूल करून टाकतात. ही वाटभूल झाल्यानंतर शोधणाऱ्यांची आणि शब्दांची गाठभेटच पडत नाही. कारण शब्द हा जिवंत करावा लागतो. आणि जे स्वतः जीवन जगतात, त्यांना शब्द जिवंत करतात. काही शब्द गिरवणारे असतात. काही भाषेची मोडतोड करणारे असतात. त्यांना जगणेही जमत नाही, शब्द जिवंत करणेही जमत नाही. असे हुन्नरी लोक, काही बाटगे शब्द, काही साय पांघरलेले शब्द भोवताली असल्यामुळे आपल्या शब्दांना सतत सावध ठेवावे लागते. भोवताली असणाऱ्या हुन्नरी, बाटग्या, साय पांघरलेल्या आणि मृत अशा शब्दांच्या पाहन्यातून आपले शब्द वाचवावे लागतात. शब्दच शब्दांना बांधून टाकणारे साखळदंड तयार करतात. या साखळ्यांपासून दूर राहावे लागते.

 ' खरे म्हटले तर शब्दांची इतकी गरज नसतेच. कारण जगण्यासाठी फारच थोडे शब्द लागतात. मरण्यासाठी तर तितकेही लागत नाहीत. जिवंत राहणे आणि जगणे याहून पलीकडे ज्यांना काही काम असते, ते युगायुगाचे भणंग असले तरी त्यांना मधुघट जोपासायचे असतात. त्यांना नवे चंद्र शोधायचे असतात. त्यांना आपल्या शब्दांतून अश्रू जतन करायचे असतात. विजयाच्या क्षणापर्यंत आपली कथा टिकवायची असते. त्यांना फक्त शब्दांची चिंता करावी लागते. म्हणून शब्दांची गरज माणूस जगण्यासाठी नसते. माणुसकी जगविण्यासाठी असते. असे हे शब्द पाहुणे म्हणून येतात आणि जिवाला चटका लावून निघून जातात. ज्यांना नेहमी चालतच राहावे लागते, त्यांची केवळ माणसांचीच ताटातूट होत नाही तर मुक्कामाचीही होते. कधी शब्दांचीच ताटातूट होते. शब्दांची ताटातूट झाली म्हणजे उदास वाटू लागते. या शब्दांच्याबरोबरच वाहवत जावे असे वाटू लागते. पण मन घट्ट करावे लागते, आणि शब्दांना पोहोचवून यावे लागते. हे पाहुणे शब्द पुनः पुन्हा यावेत, त्यांना आपल्या मनातील कढ समजावेत, यासाठी शब्द

नारायण सुर्वे यांची कविता १२९
पा....९