पान:पायवाट (Payvat).pdf/134

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

घरी परत येतात. जेव्हा काळोख म्हातारा होऊन खुरडत असतो, तेव्हा हे उत्साहाने उतू जात असतात. जेव्हा पाने सळसळत असतात, तेव्हा हे थकून झोपण्याच्या अवस्थेत आलेले असतात. या जगाला राजकारणाविषयी आस्था किती आहे ? मुळीच नाही. तिकडे मीटिंग चालेल या सूचनेला उत्तर 'मला झोप येत आहे, मरो ती मीटिंग' इतकेच आहे. सुर्व्यांची कविता प्रचाराला बांधलेली आहे हे म्हणणाऱ्यांच्या नजरेतून अशी ठिकाणे सुटावीत हे स्वाभाविक आहे ! या जीवनात मरणे ही गंभीर गोष्टच नाही, मरायचे असेल त्यांनी चटकन मरावे, ताबडतोब स्मशानात पोहोचवून उरलेले परततील आणि झोपी जातील. पण ह्याही जगाला एक विरंगुळा आहे. एक स्वप्नरंजन आहे. त्यांनाही चंद्र पाहावासा वाटतो. गझला गाव्याशा वाटतात. वर्गणी जमवून का होईना पण इसल्याचे लग्न करावेसे वाटते. इसल्याचे लग्न करण्यास सर्वोचा पाठिंबा आहे. कारण आज वर्गणी जमा करून इसल्याचे लग्न केले, तर उद्या आपलेही लग्न होईल अशी अंधुक आशा आहे. आपल्याही दारात सनई वाजेल ही आशा असल्यामुळेच दुसऱ्याची मैना जिथे राहते, तिथे पोस्टर चिटकवण्याची इच्छा नाही. घरच्या मंडळींच्याविषयी काही रोखठोक सद्भावना आहेत. बुढ्यासाठी चष्मा घ्यावा यावर एकमत होण्याइतकी कृतज्ञता अजून शिल्लक आहे. आणि हे जग किती पुढे गेले याची जिज्ञासाही अजून जागी आहे. एका बाजूने पाहिले तर पोस्टर डकवीत जाणारे आणि पोस्टर चिकटवण्यात मरणारे असे हे एक क्षुद्र जग आहे. दुसऱ्या बाजूने पाहिले तर चंद्राविषयी आस्था, बुढ्याविषयी कृतज्ञता, आणि संसाराविषयी आशा शिल्लक ठेवणारे हे एक चिवट आणि जिद्दीचे जग आहे. ज्या क्षणी एखादा रोगच सगळे शरीर सुजून आल्यामुळे बाळसे दाखवू लागतो, त्यावेळी ते दर्शन जसे चमत्कारिक वाटते, तसा या कवितेचा प्रकार आहे. या कवितेत हसणे, खिदळणे, उल्हास, स्वप्नरंजन या सगळ्याच बावी कायम व्यथेच्या गटारात पुन्हा पुन्हा उगवणाऱ्या बुडबुड्यांसारख्या एका बाजूने दिसतात. दुसऱ्या बाजूने काही बुडबुड्यांवर इंद्रधनुष्याचे काही रंग उमटलेले दिसतात. अशा कथा सुर्त्यांच्या कवितेत सारख्या पसरलेल्या आहेत. या कथांमध्ये 'माझे विद्यापीठ' हीच एक प्रदीर्घ कथा आहे. सुर्व्यांच्या कवितेतील सगळे सामर्थ्य अशा वेळी उचंबळून येते आणि त्यांचा साधासुधा शब्द एकाच वेळी अर्थघन होऊ लागतो, उत्कट होऊ लागतो.

 शेवटी शब्द हाच प्रत्येक कवीचे हत्यार असतो. ज्याची मनात कल्पना नसेल असे अर्थ व्यक्त करणाराही शब्द असतो, आणि अनंत व्यथा बोथट करून टाकणाराही शब्द असतो. या शब्दांची जपणूक करणे, त्या शब्दांचा विचार करणे प्रत्येक कवीला भागच असते. कालिदासासारखा महाकवीसुद्धा पार्वती-परमेश्वराला आणि शब्दार्थांच्या कायमच्या जोडप्याला एकत्रित नमन करून टाकतो. नवकाव्याचे जनक मर्डेकर यांना शब्दाची फार चिंता होती. शब्दाच्या तुमानीत आशयाचे शरीर मावेलच, याची कुणीच खात्री देऊ शकत नाही. कित्येकदा ही तुमान दाटून जाते. आशयाला रखडत चालावे लागते. कित्येकदा ही तुमान फाटून जाते. ही शब्दाची तुमान फाटून जावी आणि त्यातील उघडानागडा आशय

१२८ पायवाट