पान:पायवाट (Payvat).pdf/133

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

जातानाही आपली जगण्याची इच्छा मागे ठेवून गेली आहे. तिचा एक उघडा डोळा मागे राहणाऱ्यावर रोखला आहे. आणि हा रोखलेला एक उघडा डोळा जाणाऱ्या जीवाची जाण्याची अनिच्छा दाखवणारा आहे. म्हणून 'जातेरे' हे शब्द आता निरोप घेण्याचे राहत नाहीत, तर त्यांचा अर्थ माझी जाण्याची मुळीच इच्छा नाही असा होऊ लागतो. याला जाणाऱ्याचाही इलाज नाही, राहणाऱ्याचाही इलाज नाही- या दोघांच्याही पराभवाचा एक मिटलेला डोळा आहे.

एक उघडा डोळा माझ्यावर रोखलेला
दुसरा मिटलेला तिच्या मालकीचा

 या ओळींच्यामध्ये अर्थाची किती वलये निर्माण करण्याची शक्ती आहे, याची मोजदाद घेतानाच इथेही एक सार्थ योगायोग आहे, तो पाहिला पाहिजे. हा सार्थ योगायोग दुरून चर्चच्या घंटा घणघणत आहेत हा आहे. चर्चच्या घंटांना इथे काय चालू आहे याची जाणीव असण्याचे काही कारण नाही. पण तरीही योगायोगाने या घंटांनी मरण सार्थ केले आहे. अशा निरुपाय मरणांनी व त्यामागे असणाऱ्या अगतिकतेच्या जाणिवांनी सर्व धर्मपीठांना मानवी जीवनात नवा अर्थ दिला असेल.
 यापेक्षा अगदी निराळ्या पातळीवर वावरणारी कविता 'पोस्टर' ही आहे. ही कविता एकाचवेळी थकवा, दारिद्रय, स्वप्नरंजन, उत्साह, उल्हास आणि वैफल्य यांचे परस्परविरोधी धागेदोरे एकमेकांत गुरफटून टाकते. जेव्हा चार घरांतील चौघेजण पोस्टर -चिकटवण्यासाठी घराबाहेर निघत असतात, त्यावेळी म्हातारा काळोख खुरडत येत असतो. ज्यावेळी जग विश्रांतीकडे वळत असते, त्यावेळी हे चौघेजण नवे काम घेऊन बाहेर पडतात. एका बाजूने पाहिले तर ही कधीही न संपणाऱ्या दारिद्रयाची कहाणी आहे. दुसऱ्या बाजूने पाहिले तर तितक्याच अखंड असलेल्या उल्हासाची कहाणी आहे. कारण ही चार मुले आपल्या दारिद्रयावर कुंथत बाहेर पडलेली नाहीत. काम मिळाल्याच्या उल्हासाने ती बाहेर पडलेली आहेत. त्यात कुणी शिंदे आहे. त्याच्या बायकोचा सद्गुण ती 'खळ चांगली करते' हा आहे. एक इसल्या आहे. त्याची आई मोठी 'कडक बाई' आहे. आपल्या मुलाने उडाणटप्पूपणा करावा असे तिला वाटत नाही. तिची नजर चुकवृन तिच्या मुलाला बोलवावे लागते. दाराशी एक कुत्रेही आहे. या कुत्र्याच्या अंगावर पाय न पडता आलो हीच हुशारी. ज्या जगात खळ चांगली करता येणं हा स्त्रीत्वाचा विलोभनीय सदगुण आहे, त्या जगात डोळा चुकवून पळालो हीच कर्तबगारीची कथा राहणार. हा सगळाच पोस्टर चिकटवीत हिंडणाऱ्या दरिद्री जीवनाचा भाग आहे. पण त्यालाही विविध परिमाणे आहेत. प्रत्येकाची मैना त्याची त्याला प्यारी असते. तिच्याकडे इतरांचे लक्ष जाऊ नये, याची या मुलांना काळजी आहे. पोलीस हा त्यांच्या कायम शत्रुत्वाचा भाग आहे. त्याच्या डगल्यावर एखादे पोस्टर चिकटवावे काय हा विचार मनात येणे हा खोडकरपणाचा भाग. रात्र अशी जाते आणि जेव्हा जग जागे होत असते, झाडाची पाने सळसळत असतात, तेव्हा हे थकून

नारायण सुर्वे यांची कविता १२७