आयुष्य होते. या बेतलेपणाच्याबाहेर पुन्हापुन्हा जावेसे वाटले, पण जाता आले नाही. जन्मलो त्यावेळी प्रकाशही मोजकाच होता. ज्या खोलीत जीवन जगलो, ती खोली आणि जगण्याचे रस्ते बेतलेपणाचेच होते. बेतलेल्या जीवनावर जर समाधानी राहता आले असते तर चार खांबांच्या चौकटीतला स्वर्ग मिळाला असता. पण या चाकोरीचा पहिल्यापासूनच कंटाळा होता. ही चाकोरी मोडण्याची इच्छा होती. पुनःपुन्हा या चौकटीचा मनाशीच धिक्कार केला. पण ही चौकट मोडणे जमले नाहीच. 'वेतून दिलेले आयुष्य ' या कवितंचा शेवट एका 'थू' या शब्दाच्या तिरस्कारवाचकावर झालेला आहे. हा धिक्कार म्हणजे जगाचा धिक्कार नाही. आपण वेतलेपणावर कधीच समाधानी नव्हतो. पण चौकटी आपल्याला मोडता आल्या नाहीत, या स्वतःच्या दुबळेपणाचा धिक्कार आहे. याही निषेधाचे धागेदोरे मागे 'ऐसा गा मी ब्रह्म 'पासून पाहता येतात.
ज्यावेळी आपली शक्तीच कमी पडते आहे असे वाटते, त्यावेळी माणूस नुसता जगाच्या नजरेतून उतरत नाही, तो स्वतःच्या नजरेतूनही उतरू लागतो. ऋतु-वाऱ्यांच्या दृष्टीने तर तो तुच्छ ठरतोच, पण प्रेयसीच्याही नजरेतून तो उतरू लागतो. अशा वेळी आकाश आणि माती दोन्हीही आपला तिरस्कार करीत आहेत की काय असे वाटू लागते. व मग स्वतःला स्वतःचीच करुणा येऊ लागते. आपलीच आपल्याला कीव करावीशी वाटते. अशा वेळी स्वतःला धीर देत जगणे कठीण वाटू लागते. कारण आपलाच आपल्यावर विश्वास उरलेला नसतो. आपणच आपल्याला धीर द्यावा, आपणच आपल्याला आवरावे, मनाचा आकान्त चाललेला असतो; हा स्वतःचा आक्रोश स्वतःच थांबवावा, तडजोडी करीत जगावे हे जसजसे कठीण होत जाते, तसतसा भडका उडण्याचा क्षण जवळ येतो. हा भडका उडणार नाही याची हमी देणे कठीण होऊन जाते.
अशा ठिकाणी भडका उडणे म्हणजे काय ? हेच समजून घेण्याची गरज निर्माण होते. कारण कधीकधी कवी तलवारीच्याही भाषेत बोलत असतो. जीवनापासून पळून जावे, तर कुठे जावे कळत नाही. भोवताली असणारे गज कापावेत, तर ते कापता येत नाहीत. या जगाशी असणारे सगळे संबंधच तोडून टाकावेत, नाळ कापून ज्याप्रमाणे मूल गर्भापासून वेगळे करून टाकतात तसे स्वतःला जगापासून वेगळे करावे, म्हणताना कैक ऋतू उडून जातात. पण हे वेगळे होणे जमतच नाही. अशा अवस्थेत जे अस्तित्व आहे ते स्वीकारणेही कठीण होते, आणि अस्तित्व नाकारणेही कठीण होते. आणि मग तेवढी कोपऱ्यातली तलवार डोळ्यांसमोर दिसू लागते. त्या तलवारीचा उल्लेख 'माझे विद्यापीठ'मध्ये पुन्हा एकदा आला आहे. काय म्हणून आपण म्यानावरचा हात आवरला ? ज्याप्रमाणे फायरमन इंजिनाच्या आगीत फावडे झोकतो, त्याप्रमाणे आपण स्वतःला झोकून का नाही घेतले ? या सगळ्या ठिकाणी वेगळ्या भाषेत तोच भडका खदखदत असताना दिसतो. कवीने तलवार म्यानात ठेवली. समजा रक्ताला हुकूम करून ती म्यानातून बाहेर काढली असती, तर काय झाले असते ? इंजिनात फावडे झोकावे त्याप्रमाणे आगीत झोकून टाकून कवीने स्वतःला नष्ट करून घेतले असते. जेव्हा धीर देत जगणे कठीण होते, त्या वेळेला