पान:पायवाट (Payvat).pdf/125

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भडका उडाला तर काय होते ? हा भडकाही आत्मघाताचाच असतो. जेव्हा गज तोडून उडावे एवढे बळ नसते, त्यावेळी कोपऱ्यातली तलवार फक्त आत्मघातासाठीच उपयोगी पडत असते.
 ज्या कविता आपण कविता म्हणून मान्य करू. त्या कवितेतील तलवार ही सामाजिक क्रांतीची तलवार नाही. अशा जीवनापेक्षा त्याविरुद्ध बंड करून आपलाच शेवट करून घेण्याची तीव्र बळ-ऊर्मी आहे! सगळी बंडखोरी अशीच निर्माण होत असते. अनेक अन्याय सहन करताना एकाक्षणी माणूस चिडून उठतो आणि येथवर सहन केले, आता सहन करणार नाही हे सांगू लागतो. माझ्याही जीवनाला मूल्य आहे. ते मूल्य टिकवीत जर जीवन टिकणार असेल तर टिको; एरव्ही जीवन समाप्त होणेच इष्ट आहे. या जाणिवेतून बंड निर्माण होत असते. आणि असे व्यक्तीचे बंड आत्मघात करू शकते. सामाजिक क्रांती आणि व्यक्तीचे बंड या दोन बाबी एक नसतात. व्यक्तीचे बंड परिस्थितीची वाट पाहत नाही. ते बलिदान करून मोकळे होते. जीवनाहून अधिक प्रिय असलेल्या मूल्यांच्या पायावर आत्मविसर्जन करून मोकळे होते. असे मोकळे होण्याची प्रबळ ऊर्मी आलेली असूनही मोठ्या कष्टाने ती आवरली आहे.
 जगणे कठीण होत आहे, हा वैताग आहे. जगणे कठीण होत असले तरी जगले पाहिजे. कारण अजून सर्वच प्रकारची दुःखे भोगून झालेली नाहीत. पुष्कळ सहन केलेले आहे, पण अजून सहन करायचे पुष्कळ राहिलेले आहे. वाटा मुक्या होतात. दिवस सुने जातात. तरीही अजून चालणे सोडलेले नाही. एक उद्याचे जग माझ्यासमोर आहे. त्यावरची श्रद्धा संपलेली नाही. म्हणून जगणे कठीण असले तरी जगलेच पाहिजे. अशावेळी सारी हत्यारे मी खाली ठेवावीत आणि काळोखाचे कैदी व्हावे, ही अपेक्षा करू नका. कारण अजून मी निराश झालेलो नाही. याही वातावरणात स्वतःची रचना करीत बसणे आवश्यक आहे. भविष्याचा नुसता आशावाद मी स्वीकारला नाही, भवितव्याच्या लहरीवर मी स्वतःला सोडले नाही. समोर येईल त्याला लाचार नमस्कार करून मी तडजोड केली नाही. अनेक प्रेपित भेटले, पण त्यांच्याहीसमोर निष्कारण हात जोडले नाहीत. कारण माझे मीपणही शेवटी मलाच रचावे लागणार आहे. ही रचना चालू असताना कुठेच स्थिरावणे शक्य नव्हते म्हणून स्थिरावलो नाही. प्रवास चालू राहिला. दर वळणावर नवा मुक्काम करावा लागला. त्यावेळी चालून चालून थकलो. त्या गल्लीत झांजरवेळी आम्हीही हताश होऊन बसकण घेतलीच. पण उटताच चालण्याचा प्रयत्न करण्याआधी बसलो नाही. आणि बसलो तरी कायम बसलोच नाही. स्वतःला शोधण्यात अर्ध आयुष्य गेले. काही मुक्कामांवर आम्हालाही जिव्हाळा मिळाला. तिथेच थांबावेसे वाटले. त्या जागा सोडताना दुःख झाले. हळहळलो. पण स्वतःच्या शोधाशी वेइमान झालो नाही. प्रत्येक अंधारी रात्र स्वतःशी चर्चा करण्यातच आम्ही घालविली. अशी चर्चा करण्यासाठी प्रत्येकाजवळ स्वतःचा आत्माच असतो. त्याचा शोध घेत बसणे भाग होते.

 प्रत्येकाने आपला आत्मा तळघरात कोंडलेला असतो. माझाही आत्मा असाच

नारायण सुर्वे यांची कविता ११९