सांगावयाची, मग इतरांच्या दुःखांचे काय ? हा एकांगीपणा आहे. या खोट्या भीतीतून सगळी आरडाओरड सुरू होते. सुर्व्याची कविता जी दुःखे सांगते, ती मजुरांची दुःखे नाहीत: सुर्व्याच्या कवितेतील व्यथेची पातळी भूक, भाकर, काम, विश्रांती, सुरक्षितता ही नाही; दारिद्रयाच्या आगीत होरपळणारी या कवितेतील सृष्टी आहे. पण तिची व्यथा माणसाची आहे, सांस्कृतिक आहे. सुर्व्याच्या कवितेतील व्यथेचे हे सांस्कृतिक रूपच कणी फारसे लक्षात घेत नाही. कारण या कवितेत तलवारीचा उल्लेख असतो, कधी मुठी वळलेल्या असतात, तर कधी चंद्र भरल्या पोटाने पाहता आला नाही याचा कडवट उल्लेख असतो.
ज्या पद्धतीने सुर्वे आपली कथा सांगतात, किंवा अधिक नेमकेपणे बोलायचे तर, त्यांच्यातील कवी आपली कथा सांगतो, ती पद्धत पाहण्याजोगी आहे. एका अर्थी स्वतःविषयीच्या या कविता म्हणजे कवीचे आत्मनिवेदनच आहे. खाजगी जीवनात सुर्वे कधी मजूर राहिले असतील, कधी एखाद्या ठिकाणी चपराशी म्हणून राहिले असतील. उपासमारीचे दिवसही त्यांच्यावर येऊन गेले असतील. हा जो नारायण सुर्वे नावाचा माणूस, त्याच्या जीवनाची कहाणी आणि कवितेतून व्यक्त होणारा कवी याच्या जीवनाची कहाणी समांतर असली तरी ती एक नाही. दोन्ही ठिकाणी काही घटना व प्रसंग सारखे असले, तरी त्यांची पातळी भिन्न आहे. कारण या अब्रूदारांच्या जगात आपली बेअब्रू खूपच झाली ही ती व्यथा आहे. ही व्यथा संवेदनाक्षम मनाला जिव्हारी झोंबलेल्या उपेक्षेची व अवहेलनेची व्यथा आहे. ते उपासमारीचे दुःख नाही. लौकिकाच्या बाजारात अब्रूदारही जगतात आणि आम्हीही जगतो. अब्रूदाराच्या पतपेढ्या आहेत. तिथे आमची चर्चा निघते. पण त्या पेढीवर आमची पत मात्र नाही. दुपारच्या अंधारात आम्ही तारेच मोजीत बसलो, पण दुपार उजेड झाली नाही. आम्ही उरात एक वेदना घेऊन वावरतो आहोत, पण त्या जखमेला औषध मिळत नाही. एखादा चंद्र परप्रकाशित असावा, त्याला स्वतःचे प्रयोजन नसावे, तशा वेकार चंद्राप्रमाणे आम्ही हिंडतो. कधी आम्हालाही स्वतःचा प्रकाश मिळेल, या आशेवर आम्ही वावरतो आहोत. कवीची ही व्यथा केवळ 'माझे विद्यापीठ' या संग्रहातीलच नाही. या व्यथेचे धागेदोरे 'ऐसा गा मी ब्रह्म' या पहिल्या संग्रहातही आहेत. शेकडो वेळा आकाशात पौर्णिमेचा चंद्र आला, तारे फुलले, रात्री धुंद झाल्या, पण त्याचा आम्हाला काहीच उपयोग नव्हता. आमच्यासाठी भाकर हाच चंद्र होता. 'भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बरबाद झाली.' हे माझे हात इतकेच माझे भांडवल होते. ते नेहमी दारिद्रयाकडे गहाणच राहिले. स्वाभिमानाने कधी हे हात मान ताठ करून चालत होते, कधी हे हात कलम झाले, आणि हे पाहण्यापलीकडे आम्ही काही करू शकलो नाही. या जगाच्या शाळेत जगावे कसे आणि दुःख पचवावे कसे, हे शिकण्यातच आयुष्य संपले. दोन दिवस सुखाची वाट पाहण्यात गेले. दोन दिवस दुःख भोगण्यात गेले. या असल्या आयुष्यावर कुणाला समाधान वाटावे असे त्यात काहीच नव्हते. पण हा प्रश्न काही वाटण्याचा नव्हता. ही परिस्थिती बदलणे आपल्या हातातच नव्हते. या जीवनाचा कितीही धिक्कार केला, तरी ते एक बेतून दिलेले