पान:पायवाट (Payvat).pdf/118

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

लागतो, हे विसरून चालता येणार नाही.
 संग्रहातील कवितेत एवढा एकच प्रकार नसतो. त्याखेरीज वाङ्मयीन अनुकरणाचे इतरही भाग असतात. केशवसुतांसारखा युगप्रवर्तक कवीसुद्धा उगीचच आपल्या आयुष्याच्या शेवटच्या भागात मोरोपंतांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करून पाहतो. आरंभीच्या काळात तर असे अनुकरण करण्याचा प्रयत्न न करणारा कवी विरळाच असतो. मान्यवर कवींच्या कविता डोळ्यांसमोर असतात. त्यांसारख्या कविता आपल्यालाही कराव्याशा वाटतात. सुर्व्याची 'मेघ बरसे'सारखी कविता या जातीच्या कवितेत समाविष्ट करावी लागेल. ह्या आणि अशा प्रकारच्या किती कविता एखाद्या कवीचे मूल्यमापन करताना बाजूला साराव्या लागतील याचा नेम नसतो.
 मतभेदाचा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. एखाद्या कवीने जे जे लिहिण्याचा प्रयत्न केला आहे, ते सारे गृहीत धरून त्या आधाराने त्याच्या कवितेची प्रकृती हुडकावी हे अधिक योग्य, की जे लिहिताना लेखकाचा कविप्रकृतीशी सहकंप मिळाल्यामुळे कवितेच्या पातळीवर आपला आविष्कार नेण्यात कवीला यश लाभले आहे, त्या आधारे त्या प्रकृतीचा शोध घ्यावा, याचे उत्तर देता येणे कठीण आहे. जर आपण याबाबत काव्याच्या पातळीवर जाणारा आविष्कार ही मर्यादा मान्य केली नाही, तर मग कुण्याही कवीच्या काव्यगत प्रकृतीचा शोध घेणेच कठीण होऊन जाईल. जे संग्रहात समाविष्ट झालेले आहे, तितकेच तरी काय म्हणून गृहीत धरावयाचे १ जे कवीलाही संग्रहित करण्याच्या लायकीचे वाटले नाही, तेही त्याच्या लेखणीतून बाहेर पडलेलेच असते. सारस्वत आणि विनसारस्वत यांतील सगळी सीमारेपाच या ठिकाणावर येऊन पुसली जाण्याचा धोका असतो. म्हणून सुर्व्याची कविप्रकृती ठरविण्याचा मार्ग त्यांच्या दोन संग्रहांतील एकूण कविता हा नसतो, तर त्यांच्या ज्या रचनांना आपण कविता म्हणून मान्यता देऊ शकतो, तेवढ्याच रचना अशा वेळी विचारात घेता येतात. सुर्वे यांच्या ज्या रचना कविता म्हणून आपण मान्य करु, त्या रचनांचे स्वरूप कम्युनिस्ट कवितेचे नाही.
 सुर्वे हा माणूस कम्युनिस्ट असेल पण त्याची कविता ही फक्त त्याच्या व्यथेचा हुंकार आहे. 'जाहिरनामा' या कवितेत सुर्व्यानी असे म्हटले आहे की, त्यांचा जाहिरनामा आजच्या नावाने आणि आजच्या दुःखाच्या नावाने आहे. हा जाहिरनामा आपली व्यथा घोषित करणारा आहे. या व्यथेवर हुकमी उपाययोजना सुचविण्याचा उद्योग या कवितेत केलेला नाही.

 सुर्वे कम्युनिस्ट आहेत म्हणून त्यांची कविता कम्युनिस्ट आहे, म्हणून त्यांची मते निश्चित झालेली आहेत, ही पूर्वसिद्ध मते घेऊन जर कुणी जीवनाकडे जाणार असेल, तर मग त्या ठिकाणी जीवनाचा शोध घेण्याची सारी धडपड संपून जाते. अशा वेळी कविता साचेबंद आणि एकपदरी होते. तिच्यात काव्यात्म अनेकार्थता, काव्यात्म अनेकसंदर्भसूचकता हे गुण शिल्लक राहू शकत नाहीत. कारण सर्व प्रश्नांची उत्तरे सापडल्यानंतर मनाला कुंटित करणारे काही शिल्लक राहत नाही, सगळेच सोपे व सवंग होऊन जाते,

११२ पायवाट