Jump to content

पान:पायवाट (Payvat).pdf/117

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

देतात. हा कवी कम्युनिस्ट असल्यामुळे काहीजणांना त्याच्या कवितेचे समर्थन करणे अत्यंत आवश्यक वाटते. असे समर्थन करीत असताना सुर्वे एक कम्युनिस्ट कवी आहेत हा मुद्दा डोळ्यांसमोर ठेवून सगळी चर्चा चालवणे स्वाभाविक आहे. लगेच दुसऱ्या बाजूने ज्याअर्थी सुर्वे कम्युनिस्ट आहेत, त्याअर्थी त्यांची कविता प्रचारकी, साचेबंद व सांकेतिक असणारच असे गृहीत धरले जाते आणि मग आरोप-प्रत्यारोप, उत्तरे-प्रत्युत्तरे सुरू होऊ लागतात.
 एखादा माणूस कम्युनिस्ट असल्यामुळे चांगला कवी ठरत नाही, तसा तो वाईटही कवी ठरत नाही. कम्युनिस्ट असणे आणि नसणे ही गोष्टच कवितेच्या संदर्भात अप्रस्तुत आणि गैरलागू आहे. सुर्वे कम्युनिस्ट असतील. पण त्यांची कविता पक्षाला बांधलेली कविता आहे काय ? पक्षीय विचारसरणीची किंवा पक्षीय तत्त्वज्ञानाची बंधने या कवितेला पडलेली आहेत काय ?- हा प्रश्नच खरा महत्त्वाचा ठरतो. या प्रश्नाचे उत्तर देणे वाटते तितके सोपे नाही. कुण्याही कवीची प्रकृती आपण त्याची कविता पाहूनच ठरवीत असतो. अशा ठिकाणी कविता हा शब्दच सर्व घोटाळ्याचे कारण होऊन बसतो. असल्या प्रकारचा गोंधळ मराठी काव्यसमीक्षेत सुर्वे यांच्या निमित्ताने पहिल्यांदाच होत आहे असे नसून केशवसुतांच्या कवितेपासून या मुद्दयाबाबतचा गोंधळ चालू आहे. कवी कविता लिहिण्याचा प्रयत्न करतो. या कविता काव्यसंग्रहात समाविष्ट करण्याचा प्रयत्न करतो. हे जे संग्रहात समविष्ट झालेले रचनांचे साचे, त्या सर्वांचीच कविता म्हणून गणना करायची काय, हा प्रश्न मतभेदाचा असतो. कारण कवी म्हटला तरी तोही या वास्तविक जगातला माणूस असतो. वास्तविक जगातला माणूस म्हणूनच त्याच्याही स्वतःच्या काही आवडीनिवडी असतात, ग्रह-आग्रह असतात. इतरांची बंधने जुमानली नाहीत तरी या माणसाने स्वतःच्या गळ्यात निष्कारण काही बंधने अडकवून घेतलेली असतात. पु. शि. रेगे यांच्यासारखा कवी जर आपण घेतला तर खरोखर या कवीचा सामाजिक जाणिवेशी निगडित असणाऱ्या प्रश्नांशी काही संबंध आहे काय ? पण याही कवीला गांधीजींच्या हत्येवर एखादी कविता पाडावी वाटते, आणि ती संग्रहात समाविष्ट करावी वाटते. टिळक-जन्मशताब्दी आली की सर्व कवींना टिळकांच्यावर एकेक कविता लिहिण्याचा उत्साह येतो. या बाबी कवी हा वास्तविक जगातला एक माणूस असल्यामुळे घडत असतात. सर्वच कवींच्या कवितासंग्रहांत या पद्धतीच्या काही कविता असतात.

 नारायण सुर्वे यांची कविता या नियमाला अपवाद नाही. भारतीय फौजांनी गोवा ताब्यात घेतला की त्यांना एक कविता लिहावीशी वाटते. कांगोच्या लुमुंबाचा खून झाला की त्यावर एक कविता लिहिणे आपले कर्तव्य आहे असे त्यांना वाटते. आणि मग ते 'लुमुंबास सलाम'सारखी कविता लिहितात. या बाबी म्हणजे वास्तविक जीवनात कवीच्या जीवनात जो एक माणूस उभा असतो त्याचे कवितेवर खरोखरी आक्रमण असते. ही आक्रमणे कवितेवर होऊ नयेत, असे अवश्य म्हणता येईल. पण काव्याचे मूल्यमापन करताना असल्या प्रकारची कविता सरळ बाजूला टाकून कवीच्या प्रकृतीचा विचार करावा

नारायण सुर्वे यांची कविता १११