पान:पायवाट (Payvat).pdf/119

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

असा एक आक्षेप या कवितेवर आहे. खरे म्हणजे हा आक्षेप 'जर 'पासून सुरुवात होणारा आहे. जर कवींची मते पूर्वसिद्ध असतील, तर कविता एकपदरी होते. पण ह्या 'जर-तर 'ला आधार कुठे शोधणार? तो आधार सुर्वे यांच्या कवितेत शोधावा लागतो. असा आधार एखाद्या कवितेतल्या एखाद्या ओळीच्या आधारे शोधणे धोक्याचे असते. कोणताही कवी त्याच्या कवितेत मधूनमधून ठाम विधाने करीत असतो. मर्ढेकरांसारखा कवीसुद्धा 'आहे वुद्धीशी इमान । जाणे विज्ञानाची ज्ञान' असे खात्रीलायक विधान करतो. बुद्धिप्रामाण्यवाद आणि विज्ञानाने उपलब्ध करून दिलेले ज्ञान या दोन्हीला या कवीने बांधून घेतले आहे, असे समजण्यात अर्थ नसतो. कारण ही ठाम विधाने खरोखरी ठाम नसतातच. ती ठाम भाषेत मांडलेली असतात. मर्ढेकरच त्या पुढच्या ओळीत 'परी कोठे तरी आण । ताण पडे ॥' असे नांदवून ठेवतात. 'जाणे विज्ञानाची ज्ञान' ही खात्री पटल्याच्या नंतरसुद्धा शोध संपतच नसतो. म्हणून एखाद्या कवीला ठाम मते असणे निराळे आणि त्याचा शोध संपणे निराळे असते.
 माणूस सुर्वे हे कम्युनिस्ट असतील, पण कवितेत जो कवी दिसतो त्याचा त्या तत्त्वज्ञानाशी काही अपरिहार्य संबंध नाही. दोन दिवस वाट पाहण्यात गेले, दोन दुःखात गेले, यापलीकडे काहीच घडले नाही. ही आपली व्यथा घेऊन कवी पुढे आलेला आहे. जगाचाही शोध संपलेला नाही, आपल्या स्वतःचाही शोध संपलेला नाही असे त्याला सारखे जाणवत असते. त्यामुळे या कवितेत जर खरोखरी काही ठाम असेल, तर ते तत्त्वज्ञान नाही. पक्षीय तत्त्वज्ञान तर सोडाच, पण कोणतेही ठाम तत्त्वज्ञान या कवितेत नाही. निश्चित जर काही असेल तर दुःखाची वास्तवता आणि ती भोगूनही अजून हताश न झालेले मन-या दोनच बाबी निश्चित आहेत.
 सुर्व्याची कविता व्यथेच्या चित्रणाने भरलेली असूनही आशावादी आहे. ती आशावादी आहे हेच काहीजणांना आवडत नाही. 'तरी का कोण जाणे माणसाइतका सृजनात्मा मला भेटलाच नाही' असे या कवीला वाटते. आजचे दुःख मान्य केल्यानंतरचासुद्धा एक सुखाचा दिवस येऊ घातलेला आहे, तो नक्की येणार आहे, यावर सुर्व्याचा विश्वास आहे. कोणतीही कविता व्यथेच्या चित्रणामुळे निराशवादी होत नसते. खरा निराशावाद हा या व्यथा कधी संपणारच नाहीत, चांगले कधी होणारच नाही, या जाणिवेतून निर्माण होत असतो. सुर्व्याच्या डोळ्यांसमोर एका नव्या सुंदर जगाचे स्वप्न आहे. आजच्या कवि-मंडळीची मानसिक अडचण या ठिकाणी आहे. मानवी जीवनाचा व्यर्थपणा आणि तो ध्यानात आल्यामुळे वाटणारे गडद नैराश्य हे एकच परम सत्य आहे असे त्यांना वाटते. अशा परिस्थितीत हा कवी खात्रीलायकपणे आशावाद कसा काय सांगतो ? ज्या अर्थी तो आशावाद सांगतो, त्या अर्थी त्याची कविता खोटी असली पाहिजे. दिवे लागले 'तरी काळरात्र संपत नाही । संपणार नाही।।' हेच एक परमसत्य

आहे. ज्याला आपण आत्मा-आत्मा म्हणतो, तो आत्मा एक कमालीचा निष्ठावंत मूर्ख आहे. तो निष्ठावंत असल्यामुळे मूर्खपणा सोडीत नाही, आणि मूर्ख असल्यामुळे

नारायण सुर्वे यांची कविता ११३
पा....८