पान:पायवाट (Payvat).pdf/116

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
नारायण सुर्वे यांची कविता


गेल्या पाचसहा वर्षांत ज्या कवींनी आपल्या काव्यगत सामर्थ्यामुळे मराठी कवितेच्या आस्थेवाईक वाचकांचे मन स्वतःकडे ओढून घेतले आहे, त्यांत नारायण सुर्वे यांचे नाव अग्रभागी घेतले पाहिजे. कवींच्याखेरीज उरलेला रसिकवर्ग कवितेच्या बाबतीत दिवसेंदिवस अधिक उदासीन होत असताना, सुर्व्याच्या कवितासंग्रहावर अनुकूल-प्रतिकूल टीका होऊ शकतात, त्या कराव्याशा वाटतात, अनेकांना परीक्षणे लिहावीशी वाटतात या गोष्टीला एक स्वतंत्र महत्त्व आहे. सुर्वे यांची कविता कुणाला आवडेल, कदाचित कुणाला आवडणारही नाही. पण ती कविता आपल्याला समजत नाही असे कुणी म्हणणार नाही, आणि या कवितेचे अंगभूत सामर्थ्य खासच इतके निश्चित आहे की तिच्याकडे उपेक्षेच्या नजरेने पाहणे कवींना, समीक्षकांना शक्य होत नाही.

 विनोबांनी एके ठिकाणी एक अत्यंत मार्मिक प्रश्न विचारला आहे. त्यांचे म्हणणे असे की समजा, दोरीवर सापाचा भास झाला, आणि असा भास जीवनात प्रत्यही होतच असतो- की दोरी सापच वाटू लागते. मग काही भित्रे, साप-साप म्हणून पळू लागतात आणि काही शूर, धैर्याने काठ्या व दगड घेऊन हा साप ठेचू लागतात. या दोन गटांपैकी कुणाचे कृत्य उचित समजावे? समर्थन कुणाचे करावे? जोपर्यंत दोरीवर सापाचा आभास होतो आहे हे माहीत नसेल, तोपर्यंत कोणतीतरी एक बाजू घेता येते. ज्या क्षणी हा भास उघडकीला येतो, त्या क्षणी दोन्हीही गट काही प्रमाणात हास्यास्पद होऊन जातात. आचार्य विनोबा भावे यांना कुणी वाङ्मयसमीक्षक म्हणून ओळखत नाहीत, याचे मला भान आहे. पण प्रश्न वाङ्मयसमीक्षचा नसून प्रश्न त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्दयाचा आहे. नारायण सुर्वे यांच्या कवितेबाबत हा मुद्दा सारखा तीव्रतेने आठवत राहतो. कारण सुर्वे कम्युनिस्ट आहेत. हा माणूस कम्युनिस्ट आहे, यावर दुमत होण्याचे कारण नाही. आणि आपले जरी दुमत झाले तरी त्याला अर्थ नाही. कारण स्वतः नारायण सुर्वेच मोठमोठ्याने घोषणा करून आपण कम्युनिस्ट असल्याची खात्री पटवून

११० पायवाट