त्यांची कलावंत म्हणून अशी समजूत झाली आहे की, थोडेतरी तिरकस, चटकन लक्ष वेधणारे, अस्वाभाविक व विकृत होणे, व शक्यतोवर सारे चिंतन टाळणे हे माझे कर्तव्य आहे. या सगळ्या प्रवृत्तीतून वाङ्मयीन आकलने होतात, रसग्रहणे होतात. या प्रवृत्तींचे कौतुक करण्यात सगळा वाङ्मयविचार रमलेला आहे. आणि आपणच पुन्हा मध्येच थांबतो व विचारतो, सामाजिक प्रक्षोभ वाङ्मयात व्यक्त का होत नाही ? यंत्रयुगात माणसाला जाणवणारा विफल एकाकीपणा मर्ढेकरांनी व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे ही गोष्ट आनुषंगिक असून त्यांचे खरे महत्त्व नवीन प्रतिमासृष्टी, अनुभवाची घट्ट वीण व विलक्षण आत्मनिष्ठा यांत आहे असे आपण सांगतो; व दुसरे दिवशी विचारतो, सामाजिक प्रक्षोभाचे काय ? नारायग सुर्व्याच्या कवितेवर ती भलतीच रुक्ष, गद्यप्राय होणारी कविता आहे, असा आक्षेप आपण घेतोच. संवेदनांच्या कल्पनाचित्रावर काव्यमीमांसेचा एकूण प्रपंच आपण उभा करतोच व विचारतो की सामाजिक प्रक्षोभाचे काय ? वाङ्मयीन दृष्टिकोणात जोपर्यंत निरूपणात्मक प्रतिमेचे महत्त्व आपण मान्य करणार नाही, तोपर्यंत सामाजिक प्रक्षोभ व्यक्त करण्याची जबाबदारी लेखकांना का वाटावी ?
सामाजिक प्रक्षोभाची अभिव्यक्ती जीवनावरील श्रद्धेतून होत असते. एखाद्या राजकीय विचारसरणीवर श्रद्धा असणे आणि नसणे ही वेगळी बाब आहे. एखाद्या कार्यक्रमावर श्रद्धा असणे आणि नसणे निराळे. पण ज्यांची जीवनावरच श्रद्धा. उरलेली नाही त्यांचे काय ? कधीच, केव्हाच, कुणाचेच चांगले होत नसते हा शून्यवादही एक मानवी नमुना आहे. शून्यवादही वाङ्मयात व्यक्त होऊ शकतो. व्हायलाच हवा. पण ही भूमिका सामाजिक प्रभोक्ष व्यक्त करीत नसते. जे आहे ते उलथून टाकण्याची जिद्द धरणारे मन मूल्यांची कोणतीतरी कल्पना मनाशी धरणारे, नव्या जगाचे कोणतेतरी स्वप्न पाहणारे मन असते. त्या मनाला एक ताठरपणा असतो. मोडून पडलेली मने कण्हू शकतात. त्या कण्हण्याचा प्रामाणिकपणा मान्य करून आपण पुढे जातो. त्या वाङ्मयाचे कलामूल्य ठरवून टाकतो. पण ही मने खऱ्या अर्थाने बंडखोर नसतातच. बंडखोरीला प्रस्थापित मूल्यांशी विरोध एवढा एकच पदर नसतो. तर काही सार्वजनिक मूल्यांवर श्रद्धा हा दुसराही पदर असतो. ही मने बेभान स्वरूप धारण करतात, त्यांच्या विप्लवाला विध्वंसक रूप प्राप्त होते हे खरे, पण ही मने तडजोडवादी नसतात. 'चालायचेच, जग हे असेच असते' या चालीवर विचार करणे त्यांना जमत नाही.
त्यांना स्वतःसाठी फारसे काही नकोच असते. ते समाजाच्या एखाद्या थराच्या आकांक्षेशी एकरूप झालेले असतात. अशावेळी अनुभव घेणारी व्यक्ती ही केवळ व्यक्ती उरत नाही. त्या व्यक्तीच्या अनुभवांत समाजाच्या अंतःप्रवाहाचे ओष मूर्त होऊ लागलेले असतात. ज्या अनुभवाच्या पोटात असे अंतःप्रवाह समाविष्ट करून घेणारी चिंतनगर्भता असते, त्या अनुभवाच्या अभिव्यक्तीतूनच सामाजिक प्रक्षोभाला वाट सापडत असते. कोणतातरी तर्कसंगत सविस्तर सामाजिक ध्येयवाद स्वीकारल्याशिवाय सामाजिक प्रक्षोभ लेखकाला व्यक्त करता येत नाही असा माझ्या या विवेचनाचा अर्थ नाही. सामाजिक प्रक्षोभ