व्यक्त करणारी व्यक्ती राजकीय तत्त्वज्ञानाने भारलेली, उदात्त ध्येयवादी व्यक्ती असतेच असा काही नियम नाही. ती व्यक्ती क्षुद्र व स्वार्थीही असेल, तिच्यात फारसा दूरदर्शीपणा नसेल, पण समाजाची चौकट बदलू इच्छिणाऱ्या कोणत्यातरी सामाजिक थराची ती प्रतिनिधी असते. कलावंताच्या मनाचे हे दुहेरी स्वरूप मान्य केले पाहिजे.
व्यक्तिवाद हे जीवनाचे एक मूल्य आहे. पण ते जीवनाचे एकमेव मूल्य नाही. सामाजिकता हेही जीवनाचे दुसरे मूल्य आहे. रोमॅटिसिझमने व्यक्तीला फार मोठी प्रतिष्ठा मिळवून दिली, हे या चळवळीचे मानवी इतिहासातील महत्त्व कधीही विसरता येणार नाही. पण या चळवळीने व प्रवृत्तीने व्यक्तीला सामाजिक जबाबदारीतून मोकळे होणे समर्थनीय मानण्याची शिकवण दिली. संपूर्ण अहंनिष्ठा समर्थनीय बनली. बुद्धी मानवी जीवनाचे मार्गदर्शन करूच शकत नाही, म्हणून तिच्यापेक्षा इंद्रियांचे मार्गदर्शन अधिक श्रेष्ठ मानले. आजचे नवकाव्य निदान तोंडाने बोलताना तरी आपण रोमँटिसिझमची प्रतिक्रिया आहोत असे स्वतःला म्हणवून घेते. पण कधीकधी असे दिसते की एकमेकांचे शत्रूच एकमेकांच्या धोरणाचे सातत्य चालवितात. विरोधकांच्या छलपूर्वक हत्येच्या रोमन परंपरा मध्ययुगाच्या आदि-अंती विरोधक ख्रिश्चनांनी चालविल्या. इस्लामची असहिष्णुता त्याच्या विरुद्ध असणारा हिंदुत्ववाद चालवताना दिसतो. हाच प्रकार इथेही झालेला दिसेल. ज्याप्रमाणे रंजनवाद साहित्याला साधन मानीत होता, तसेच रंजनवादाचे प्रखर विरोधक असणारे बोधवादी साहित्याला साधनच मानीत राहिले. रोमँटिसिझमच्या विरोधाचीही अँटि-रोमॅटिक प्रतिक्रिया जुन्या अहंनिष्ठेच्या परंपरा तशीच चालवीत बसली. वाङ्मयातील आत्मनिष्ठा म्हणजे व्यक्तिवादातून जन्मलेली अहंनिष्ठा नव्हे. अहंनिष्ठाही आत्मनिष्ठेत येते, पण त्याखेरीज वेगळी असणारी सामाजिकतासुद्धा प्रामाणिक असू शकते व ते अनुभवही आत्मनिष्ठेच्या पोटात येतात. माझा आक्षेप वाङ्मयातील अहंनिष्ठेला किंवा विफलतेला नाही. तेवढेच एक जीवनाचे चित्र नव्हे. यंत्रयुग माणसाचा एकाकीपणा निर्माण करते हे जितके खरे आहे, तितकेच माणसांची संघटितपणे प्रभावी होण्याची शक्ती ते वाढविते हेही खरे आहे. अमुकच एक जीवनाचे संपूर्ण प्रतिबिंब आहे, या सुशिक्षित अहंकारातून वाङ्मयीन वातावरण निर्माण होणे सामाजिक प्रक्षोभ व्यक्त करण्याला उपकारक नसते.
आजच्या मराठी वाङ्मयात सामाजिक प्रक्षोभ निर्माण का होत नाही याविषयीची ही माझी भूमिका सांगताना माझ्या डोळ्यांसमोर उद्धव शेळक्यांची 'धग' कादंबरी, जयवंत दळवींचे 'चक्र', भाऊ पाध्यांचा 'वासुनाका' हे प्रयोग आहेत. समाजाच्या दर्शनाचे आणि चित्रणाचे हे प्रभावी प्रयोग होते. पण त्यात कुठेतरी काहीतरी कमी पडलेले दिसते. ही उणीव निरूपणात्मक प्रतिभेची आहे. निरूपणात्मक प्रतिभेचा हा अभाव सर्व चिंतन, सर्व सामाजिक अंतःप्रवाहाचा वेध घेणे या गोष्टींना बोध व प्रचार म्हणून टाळण्याच्या धडपडीतून निर्माण झालेला आहे असे मला वाटते. वाङ्मयाकडे पाहण्याचा दृष्टिकोण ओलांडून एखादा कलावंत पुढे जात नसतो काय ? याचे उत्तर, जात असतो असेच