पान:पायवाट (Payvat).pdf/110

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

असतात. पण यापेक्षा रंजनाचे स्वरूप निराळे असते. रंजनाचे प्रयोजन सतत नवनवी रूपे धारण करीत असते. रंजनवादाला जनतेच्या श्रद्धा दुखवून चालतच नाही. त्यांच्या सगळ्यां नायिका तरुण आणि सुंदर असतात. पण तारुण्य पूर्णविकसित झालेल्या अवस्थेत असणाऱ्या या नायिकांच्या मनात खळबळ माजविणारा पहिला पुरुष नायकच असतो. त्याआधी पुरुषांचे आकर्षण तारुण्योदयापासून विकसित होणाऱ्या अवस्थेपर्यंत जणू वाटलेलेच नसते. सगळे शाप आणि आशीर्वाद फलद्रप करावेच लागतात. धार्मिक सज्जनांचा शेवटी विजय घडवूनच आणावा लागतो. रहस्यमय कादंबरीला शेवटी गुन्हेगार पकडून द्यावा लागतो. वाइटाचे शेवटी वाईट होते, हे सांगावेच लागते. प्रस्थापित व मान्य मूल्ये उचलून धरण्याचा उद्योग बोधवादापेक्षा रंजनवादच अधिक करतो. आणि म्हणून रंजनवाद नेहमी कोणत्यातरी बोधवादाचे पांघरूण अंगावर घेऊनच वावरत असतो.
 मग जुने पंडितकवी ईशभक्तीचे निमित्त सांगोत, की नवे कादंबरीकार राष्ट्रभक्तीचे निमित्त सांगून ऐतिहासिक कादंबरी लिहोत. बोधवादाला निदान स्वतःची ईर्षा व जिद्द असते. त्याला कुणाचेतरी खंडन करावेच लागते. या बोधरंजनाच्या चौकटी फेकून दूर होऊन मराठी वाङ्मयाला दिवसच किती झाले ? आणि ज्यांनी या चौकटी दूर फेकल्याची घोषणा केली, त्यांना तरी पूर्णपणे या चौकटी कुठवर फेकता आल्या ? पंचेचाळीस सालापर्यंत मराठी वाङ्मय या वर्तुळातच फिरत होते. खरी अडचण अशी आहे की व्यक्तिवादाच्या उदयापूर्वी सामाजिक बंडखोरीला अस्तित्व नसते, आणि व्यक्तिवादाच्या उदयानंतर एकीकडे प्रचाराच्या भूमिका प्रभावी होतात. आणि हा प्रचार नेहमी उसना आणलेला असतो. प्रतिभावंतांच्या अनुभव-चिंतनाचा तो अवश्यमेव घटक नसतो. दुसरीकडे धर्माच्या गुलामीतून मोकळे होताच कलावंत जिद्दीने 'इंद्रियांचे मार्गदर्शन' स्वीकारण्याची व स्वप्नसृष्टीत रमण्याची, हरवण्याची घोषणा करू लागतात. या अवस्थेच्या पुढे जावे लागते म्हणजे मग जीवनाचे कुंटित करणारे चित्र क्रमाने वाङ्मयात दिसू लागते. त्या जोडीला सामाजिक क्षोभ मुखर होऊ लागतो.

 ही क्रिया घडण्यासाठी वाङ्मयात रोमॅटिसिझमच्याविरुद्ध एक प्रचंड चळवळ यशस्वी झालेली असावी लागते. आपण युरोपच्या वाङ्मयाची मराठीशी तुलना करीत असताना युरोपमध्ये असलेला अँटि-रोमँटिसिझमचा प्रचंड झोत विसरतो. या झोतातून वाङ्मयाचा स्वप्नाळूपणा क्रमाने संपत जातो. मराठीत दुसऱ्या महायुद्धानंतरच्या वाङ्मयात नवकाव्य आले, नवी कादंबरी व नाटके आली. या सर्वांचा नवेपणा मान्य केला तरी रोमँटिसिझमपासून आपण पुढे सरकलो आहोत काय, हा प्रश्न शिल्लक राहतोच. रेगे, पाडगावकर, बापट यांच्यापासून ग्रेस-महानोरपर्यंतची कविता ही तर रोमँटिक आहेच, पण त्यापेक्षा आश्चर्याची गोष्ट म्हणजे मर्टेकर, विंदा करंदीकर यांचीही कविता तशीच आहे. रोमँटिसिझम ही नुसती आविष्कारपद्धती नाही, तो जीवनाकडे पाहण्याचा एक दृष्टिकोण आहे. मर्ढेकरसुद्धा प्रेमकविता लिहू लागले की त्यांच्या मनाचा रोमँटिक भाग दिसू लागतो. पेंडसे यांची कादंबरी किंवा अगदी 'स्वामी' कादंबरी घेतली, तरी तोच जीवनाकडे पाह-

१०४ पायवाट