पान:पायवाट (Payvat).pdf/109

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

हेही मत खरे असले तरी गाभ्याच्या प्रश्नाचे उत्तर हे मत देत नाही. एकूण समाजातच प्रक्षोभ कमी इतके या आधारे आपण सांगू शकू. पण आहे तो प्रक्षोभ वाङ्मयात प्रकट का होत नाही, याचे फारसे स्पष्टीकरण या भूमिकेने होत नाही.
 मला असे वाटते की, सामाजिक प्रक्षोभाचा आविष्कार फारसा होत नाही याचे फार मोठे कारण वाङ्मयाकडे पाहण्याची आपली भूमिका हेच आहे. प्राचीन काळापासून वाङ्मयाकडे पाहण्याची आपली भूमिका रंजनवादी आणि बोधवादी अशी मिश्र आहे. प्रारंभापासूनच आम्ही नाट्याला व काव्याला 'क्रीडनीयक' म्हणजे खेळाचा व मनोरंजनाचा, करमणुकीचा एक प्रकार मानीत आलो. आणि ही रंजनवादी भूमिका सांगत असतानाच ललित वाङ्मयाद्वारे सकल पुरुषार्थाची सिद्धी होते असेही मानीत आलो. वरिष्ठ वर्गाने निर्माण केलेले काव्य-नाटकादी वाङ्मय असो की बहुजनसमाजात निर्माण झालेला गण-गौळण, वग, लावणी, अभंग असो, लोकवाङ्मयातील ओवी, गीते, लोककथा व दैवतकथा असोत, प्रस्थापित धर्ममूल्यांचा प्रचार व पुरस्कार, प्रस्थापित श्रद्धांचा पुरस्कार हा या सर्व वाङ्मयाचा अवश्यमेव भाग होता; व हे सगळे करूनही रंजनाच्या चौकटीत हे वाङ्मय चपखल बसत होते. रंजन आणि बोध यापलीकडचे समाजदर्शनाचे किंवा समाजनिरूपणाचे प्रयोजन या वाङ्मयाला फारसे नव्हतेच.
 रंजनासाठी निर्माण झालेले वाङ्मय मधूनमधून रंजनाची कक्षा ओलांडून पलीकडे जाते व कलात्मक होते, हा साहित्यसृष्टीचा चमत्कार आहे. निर्मात्याच्या इच्छेच्या मर्यादा निर्मिती नेहमी पाळतेच असे नाही. हा प्रकार कालिदासाच्या 'शाकुंतला'बाबत झालेला आपण सांगू शकतो. एक रमणीय सुखान्त नाटक लिहिण्याचे प्रयोजन त्याच्या मनात गृहीत होते असे म्हटल्याशिवाय 'शाकुंतला'तील कथनिकाच्या मांडणीचा उलगडाच होत नाही. मध्येच दुर्वासाचे पात्र कथानकात प्रवेश करून लुप्त होऊन जाते. दुर्वासाने येऊन शाप का द्यावा, दुर्वासाने शाप व उःशाप दिलेला शकुंतलेला का कळू नये ? ज्या सखीने उःशाप मागितला, तिने तरी शकुंतलेला ते का सांगू नये ? असे एक-ना-दोन अनेक दुवे आहेत. कथानकातील या दुव्यांचा उलगडा रंजनासाठी आकृती निर्माण करण्याचे प्रयोजन गृहीत असल्याशिवाय होत नाही. पण हे प्रयोजन पोटात पचवूनही 'शाकुंतल' कलात्मक होते. रंजनाच्या क्षेत्रात हे जसे होते, तसेच बोधाच्याही क्षेत्रात होते. ज्ञानेश्वरांचे उघड तत्त्वज्ञान, भाष्य, तुकारामाचा फटकळपणे चाललेला उपदेश हाही कलात्मक होऊन जातो. निर्मितीच्या प्रक्रियेत हा अधूनमधून घडणारा प्रकार आपण मान्य केला, तरी त्यामुळे वाङ्मयाकडे पाहण्याच्या दृष्टिकोणातील बोध-रंजनाचे दुवे असिद्ध होत नाहीत.

 रंजन व बोध या परंपरांनी वाङ्मय निर्माण होत आले असे आपण म्हणतो. पण या दोन बाबी परम्परांपासून सामान्यत्वे जितक्या दूर मानल्या जातात तितक्या त्या दूर नाहीतच. बोध करणारे हा बोध रंजक व्हावा यासाठी धडपडत असतातच. आणि त्यासाठी ज्यामुळे रंजनाची हमी मिळते असे काही साचे हाताळण्यासाठी ते धडपडत असतात. आपल्या प्रचाराच्या प्रयोजनासाठी यथाशक्ती रंजनाचा बोजा तेही खांद्यांवरून वाहत

आजचे मराठी साहित्य सामाजिकदृष्ट्या पुरेसे प्रक्षोभक आहे काय ? १०३