पान:पायवाट (Payvat).pdf/111

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ण्याचा दृष्टिकोण दिसतो. रोमॅटिक दृष्टिकोण असला म्हणजे वाङ्मयाचे कलामूल्य कमी होत नाही. तसे ते केवळ या दृष्टिकोणाने वाढतही नाही. पण जीवनाचे आकलन जोवर या पातळीवर होत आहे, तोवर सामाजिक प्रक्षोभ वाङ्मयात अभिव्यक्त होण्याचा संभव फार कमी असतो.
  समाज आहे तोवर त्याला मनोरंजनाची साधने लागणारच. कारण करमणूक हीही एक जीवनाची गरज आहे. या गरजेच्या पूर्तीसाठी रंग वापरले जातील, सूर वापरले जातील, तसे शब्दही वापरले जाणारच. अनेक गोष्टी विकृत होतात, तसे मनोरंजनही विकृत होते व मग बाजारात वासना उत्तेजित करणाऱ्या वाङ्मयाचे गलिच्छ पूर येऊ लागतात. त्यांच्याविरुद्ध आवाजही उंच करावा लागतो. पण हे सगळे घडत असताना एक समजून घ्यावे लागते, की मनोरंजनात शब्दांचा वापर बंद करणे शक्य नसते, तसेच इष्टही नसते. म्हणून रंजनवादी वाङ्मय राहणारच. समाजाच्या एका थराची करमणुकीची अवाङ्मयीन भूक ते पूर्ण करीत राहील. मात्र कलात्मक साहित्य ते हे नव्हे, ही सीमारेषा स्वच्छ ठेवण्याचे काम सतत करावे लागते. रंजनाप्रमाणेच प्रचार हाही जीवनाचा भाग आहे. तो होत राहणार. तिथेही रंग, रेषा, स्वर, शब्द वापरले जाणार. प्रचारही विकृत होऊ शकतो. मग त्याला आक्रस्ताळेपणाचे, सदभित्चीच्या कक्षा ओलांडून चारित्र्यहननाचे रूप येऊ लागते. या विकृतीचा विरोध करतानाच हे समजून घ्यावे लागते की प्रचारासाठी शब्द वापरले जाणारच. ते आपण टाळू शकत नाही, टाळणे इष्ट नव्हे. तेथेही आपण फक्त सीमारेषा स्पष्ट करू शकतो. या सीमारेषा स्पष्ट करतानाच सगळा गोंधळ होत असतो. कलात्मक वाङ्मयाचे प्रयोजन रंजन नसेल, पण त्याहीमुळे रंजन होऊ शकते. त्यामुळेही प्रचार होऊ शकतो. व प्रचार, रंजनासाटी लिहिलेले वाङ्मय अचानक आपल्या चौकटी ओलांडून कलात्मक होऊन जाते. कलानिर्मिती करणाऱ्या मनावर या दोन परंपरांचे जे संस्कार होत असतात, त्यांच्यापासून मुक्त होणे फार कठीण आहे. हे होईपर्यंत कोणतेही वाङ्मय सामाजिक प्रक्षोभाचे दर्शन घडविण्यात फारसे यशस्वी होत नसते.

 पण यापेक्षा महत्त्वाचा आणि भीतीचा खरा भाग असा आहे की जे कलात्मक वाङ्मय निर्माण होत असते, त्यावर आत्मनिष्ठेच्या चुकीच्या आग्रहाचे चमत्कारिक परिणाम होत जातात. वाङ्मयात आत्मनिष्ठेचे महत्त्व स्वयंभू व मूलभूत आहे. ते कुणीच अमान्य करणार नाही. पण आत्मनिष्ठा म्हणजे काय ? मर्ढेकरांनी आत्मनिष्ठा, निःसीम हार्दिक तादात्म्य, आणि वाङ्मयीन महात्मता अशा तीन चढत्या श्रेणी मानल्या आहेत. तिसरीत पहिल्या दोन व दुसरीत पहिली अंतर्भूत आहेच, असे ते मानतात. परिभाषेचा व मांडणीच्या पद्धतीचा प्रपंच सोडून दिला म्हणजे या विवेचनाचा अर्थ फार साधा व सरळ आहे. लेखकांनी स्वतःच्या अनुभवांशी प्रामाणिक राहावे, या अनुभवांत अंगभूत व्यापकपणा असावा, हे अनुभव जीवनाच्या मूलभूत स्वरूपांवर प्रकाश टाकणारे असावेत, या अनुभवांना स्वतःची लय, घाट निवडू द्यावा असे मर्ढेकरांना म्हणावयाचे आहे. चर्चा करताना हे सगळे विवेचन आपण मान्य करतो. कारण या विवेचनाच्या सर्वसामान्य

आजचे मराठी साहित्य सामाजिकदृष्ट्या पुरेसे प्रक्षोभक आहे काय ? १०५