Jump to content

पान:पायवाट (Payvat).pdf/108

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

जनतेतील लेखकही प्रक्षोभ निर्माण करीत नसतात. सामाजिक क्षोभाचा उदय वैचारिक भूमिकेत असतो, बदललेल्या समाजपरिस्थितीने शक्यतेच्या आटोक्यात आणलेल्या स्वप्नात असतो. नव्या उत्पादन-साधनांनी मुक्त केलेल्या, जाग्या केलेल्या सामाजिक शक्तीत असतो. ही प्रक्रिया समाजात आधी बलवान व्हावी लागते. मग तिचे वाङ्मयात प्रतिबिंब पडू लागते.
 आमच्या सगळ्या समाजजीवनाची यंत्रणाच असिधारा बोथट करणारी आहे. स्वातंत्र्याचा लढासुद्धा आम्हाला फार जोमाने अगर त्वेषाने द्यावा लागला नाही. अल्जीरियासारख्या देशात नुसता स्वातंत्र्यलढा लढताना लोकसंख्येचा काही टक्के भाग गारद होत असलेला आपण पाहतो. त्यामानाने आपली चळवळ फारच सौम्य होती. आणि जी चळवळ सौम्य होती, तिच्यातही जनतेचा फार मोठा भाग समाविष्ट नव्हताच. ज्या सुधारणा मिळविण्यासाठी प्रचंड लढे इतर देशात द्यावे लागले, त्या सुधारणा राजकारणाच्या उदारमतवादी भूमिकेमुळे आपल्याला जवळजवळ आपोआपच मिळत गेल्या. स्वातंत्र्याबरोबर सार्वत्रिक मतदानाच्या उपलब्धीमुळे दर जातीतील वरिष्ठ मुखंडांनी जातिव्यवस्थेचा आधार घेऊन आपापल्या मागे दरिद्री मतदार उभा केला. जे लढून मिळविलेले नसते, ते घटनेच्या पुस्तकात मिळाल्यासारखे दिसते; प्रत्यक्षात मिळालेलेच नसते. More it changes, more it remains the same अशी एक इंग्रजीत म्हण आहे. तिचाच प्रत्यय सर्वत्र येऊ लागतो. स्वातंत्र्याबरोबर घटना निर्माण होत असतानाच कायद्याने अस्पृश्यता हा गुन्हा झाला. मतदानाचा हक्क, राखीव जागा, मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व, शैक्षणिक सवलती, नोकरीत काही प्रमाणात प्राधान्य-इतक्या सगळ्या बाबी फारशी खळबळ न करताच मिळालेल्या होत्या.

 एका दृष्टीने पाहिले तर मिळवायचे काहीच उरले नव्हते. दुसऱ्या दृष्टीने पाहिले तर खरोखरी काहीच मिळाले नव्हते. आस्पृश्यांच्या संघटनासुद्धा आपापली संघटना टिकवण्यात व निवडणुकांवर आपापला प्रभाव टाकण्यात इतक्या कार्यरत झाल्या की त्यांना यापलीकडे फारसे कामच उरले नव्हते. जे पदरात पडलेले आहे ते पचावे कसे, स्वतःचा विकास वेगाने कसा साधून घ्यावा हाच प्रश्न उरला. सगळे हक्क मान्य. कुणाचाच विरोध नाही. या एका सर्वव्यापी दंभामागे सगळी समाजव्यवस्था आपले अपरिवर्तनीय रूप टिकवून धरण्यासाठी प्रयत्नरत होती. समाजनेत्याला हतबल करून टाकणारी ही परिस्थिती आहे. समाजात प्रक्षोभ नाही असा त्याचा अर्थ नाही. प्रक्षोभ आहे, पण त्याची धार बोथट झाली आहे. दुर्दैवाने भारतातील बुद्धिवादी वर्गही जातींच्या चौकटीत अडकलेला आहे. आपल्या जाती-जमातीबाहेरच्या नेत्यांचे कठोर वैचारिक मूल्यमापन करण्याची त्याला संधी नाही. त्यासाठी लागणारे धैर्यही नाही. आणि स्वजातीय नेत्यांचे पुनर्मुल्यमापन करण्याची त्याची इच्छा नाही. या तडजोडवादामुळे होते असे की क्षोभाची धार बोथट होते, व प्रश्न तसेच शिल्लक राहतात. या समन्वयवादाचा परिणाम म्हणून वाङ्मयात सामाजिक प्रक्षोभ येत नाही असे एक मत चर्चेत दाखल केले आहे. आपल्या मर्यादेत

१०२ पायवाट