पान:पायवाट (Payvat).pdf/107

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

दिसत नाही. कनिष्ठ वर्गातून लेखक उदयाला आले म्हणजे त्यांच्या वाङ्मयात कनिष्ठ वर्गाच्या ऐतिहासिक गरजा अभिव्यक्त होतील, ही समजूत चुकीची आहे. जनतेतून लेखक उदयास यावयाचे व त्यांनी परंपरागत वाङ्मयीन दृष्टिकोण स्वीकारावयाचा, हाच क्रम जनाबाईपासून बहिणाबाई चौधरीपर्यंत व चोखामेळयापासून अण्णाभाऊ साठ्यांपर्यंत जवळजवळ अप्रतिहत चालू असताना दिसतो.
 आपण वाङ्मयाचा विचार करताना लोकवाङ्मयाचा विचार करीतच नाही. या लोकवाङ्मयात परंपरेने चालत आलेल्या कथा आहेत. त्यांची गाणी आहेत. त्यांच्या ओव्या आहेत. तशाच श्रद्धा आहेत. ब्राह्मण स्वतःला 'अग्रज' म्हणजे सर्वप्रथम जन्मलेले मानीत. पण सोनारांचीही हीच भूमिका होती. 'आधी सोनार आणि नंतर दुनिया होणार ' असे त्यांचे म्हणणे होते. तेली म्हणत 'आधी तेली मग दुनिया झाली!' सगळेच स्वतःला आपापल्या जागी अग्रज मानीत. आदिवासींनी स्वतःला जंगलाचे राजे म्हटले आहे. हा लोकवाङ्मयाचा जनतेने केलेला सर्ग पाहिला तरी त्यात कुठे प्रक्षोभ नाही; आणि हे लेखक ब्राह्मण नव्हते, जनतेतील होते. आपण गुलाम आहोत, जातिव्यवस्था हा अन्याय आहे, तिच्याविरुद्ध आपण बंड करू. हा विचारच कुठे इंग्रजपूर्व वाङमयात किंवा लोकवाङ्मयात अभिव्यक्त झालेला दिसत नाही. म्हणून लोकवाङ्मयाचे काही अभ्यासक म्हणतात, हे सगळे वाङ्मयच अंधश्रद्ध आहे. प्रगतीची सारखी वाट अडविणारे आणि मनाला मागे खेचणारे आहे.

 युरोपमध्येही याहून निराळे काहीच घडलेले दिसत नाही. तेथेही ग्रीक-रोमनांच्या परंपरागत धर्माशी व ज्यूंशी ख्रिश्चनांचा संघर्ष होता. आणि त्याचे स्वरूप हिंदू-मुस्लिम, शैव-वैष्णव यांच्या मध्ययुगीन संघर्षासारखे होते. इसवी सनाच्या तिसऱ्या चौथ्या शतकात क्रमाने चर्च संघटित झाल्यानंतर सरदार, सम्राट व चर्च या त्रिपुटीने पाचव्या शतकापासून पुढची हजार वर्षे सर्व प्रकारचे शोषण व जुलूम केला. पण या काळातील समाजजीवनात भू-दासांच्या मनात कुठेच सामाजिक क्षोभ दिसत नाही. युरोपातील सामाजिक क्षोभाची सुरुवात रिनेसान्सनंतरची म्हणजे व्यक्तिवादाच्या उदयानंतरची आहे. असा व्यक्तिवाद उदयाला येतो व मग गुलामीची जाणीव होऊ लागते. आज ज्याला आपण सामाजिक गुलामगिरी म्हणतो, तिचे अस्तित्व किमान दीड हजार वर्षे या भारतात आहे. पण एखाद्या गोष्टीचे अस्तित्व असले म्हणजे तिची जाणीव होते असे नव्हे. ही गुलामगिरी एकेकाळी कुणी कुणावर लादलेली नाही. जे लादलेले असते त्याच्याविरुद्ध बंडाचीही परंपरा असते. प्राचीन भारतातील सामाजिक गुलामगिरी त्या वेळच्या समाजाने प्रदीर्घ परंपरेने स्वीकारलेली व्यवस्था होती. शतकानुशतके ती स्थिरावत गेली. त्या व्यवस्थेत असामान्यांच्या विकासाला अडथळा अवश्य होता, पण सामान्यांच्या व्यावहारिक सुरक्षिततेवर ती व्यवस्था जगत होती. या व्यवस्थेविरुद्ध बंड करण्याचा विचार त्या काळात संभवतच नव्हता. मुद्रणपूर्व युगात सार्वत्रिक शिक्षणाचा विचारच संभवनीय नव्हता. हे प्रश्न आपण काळजीपूर्वक कधी लक्षात घेतच नाही. नव्या पुराणकथा प्रक्षोभ निर्माण करीत नसतात, त्याचप्रमाणे

आजचे मराठी साहित्य सामाजिकदृष्ट्या पुरेसे प्रक्षोभक आहे काय ? १०१