Jump to content

पान:पायवाट (Payvat).pdf/104

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सामाजिक गट म्हणून त्या जुन्या जीवनात या वर्गाचे स्थान नेमके काय होते, हा थोडा विवाद्य प्रश्न आहे. स्वतःच्याच धर्मग्रंथांत स्वतःच्या मोठेपणाविषयी ब्राहाण काहीही लिहोत, व्यवहारात हा वर्ग धनसत्ता व राजसत्ता असणाऱ्या गटांच्या दयेवर आश्रित म्हणून जगणारा वर्ग होता. आणि म्हणून स्तुतिपाठक असेच या वर्गाचे स्वरूप होते. या वर्गाच्या उपजीविकेचां खुशामत करणे, श्रीमंताच्या पदरी जगणे हा एक भाग होता. विदूषक हा या घटनेचे एक नाट्यरूप आहे अशी माझी समजूत आहे. रूढ अर्थाने संस्कृत नाटकात खलनायक नसतो. नायक-नायिकेच्या मीलनाला अडथळा दैवाचा किंवा नायकाच्या पत्नीचा असतो. या सामान्य नियमाला अपवाद फक्त 'मृच्छकटिका'तील शकार आहे. पण शकार हे परंपरेप्रमाणे अधम व मूर्ख पात्र. तो राजाच्या रखेलीचा भाऊ असतो. म्हणून त्याचे चित्रण हे वर्गाचे चित्रण नव्हे. राहता राहिला 'मुद्राराक्षसा 'तील अमात्य राक्षस हा प्रतिनायक. पण तो उदात्त आणि चारित्र्यवान आहे. तेव्हा ब्राह्मणांनी कनिष्ट जातींना वाङ्मयात तुच्छतेने उल्लेखिले, यात फारसा अर्थ नाही.
 अशी तुच्छता पाहण्यासाठी अभिजात वाङ्मयाच्या बाहेर जावे लागेल. प्रत्यक्ष जीवनात कनिष्ठ जमातींच्याविषयी ही तुच्छता होतीच. त्याचे चित्रण स्मृतिग्रंथांतून उमटलेले आहे. आणि प्रत्यक्ष जीवनात हे असे असणे हीच खरी भयानक बाब आहे. पण वाङ्मयात मात्र या वस्तुस्थितीचे चित्र उमटलेले नाही, हेही तितकेच खरे.
 मिसेस स्टोव स्वतः नीग्रो नव्हती. तिने नीयोंच्याविषयी उत्कट अनुकंपा अमेरिकन जनतेत निर्माण केली, हा तिचा गुन्हा झाला की काय ? महात्मा गांधी स्वतः हरिजन नव्हते. तसे म. फुले, प्रा. माटे, सावरकर हेही हरिजन नव्हते. यांतील प्रत्येकाने दलित समाजाची विधायक सेवा करण्याचा आटोकाट प्रयत्न केला, सहानुभूती जागी केली, दलितांच्या मागण्यांना सतत पाठिंबा दिला हा त्यांचा गुन्हा झाला की काय ? दलित समाजाचे प्रश्न दयेने व अनुकंपेने सुटणार नाहीत हे मान्यच आहे. त्यासाठी त्या समाजाची लढाऊ संघटना निर्माण व्हावी लागते, हेही खरे आहे. पण म्हणून अनुकंपेने व्याप्त होऊन सेवा करणान्यांविषयी, सुधारणा घडवून आणणाऱ्यांविषयी तुच्छता कशी समर्थनीय ठरेल ? परमकारुणिकाच्या उपदेशावर हक्क सांगणाऱ्यांनी हाही प्रश्न विचारात घेतला पाहिजे.

 खरा प्रश्न पुराणकथेच्या उपयोगाचा होता. इथून काही फाटे फुटल्यामुळे वाहवत जाऊन हे थोडेसे आवश्यक विषयान्तर करावे लागले. शेवटी myths म्हणजे काय ? परंपरेने स्वीकारलेल्या कथांचा, कल्पनांचा व सांस्कृतिक मूल्यांचा संचय हेच myths चे स्वरूप असणार. या परंपरा जशा फार प्राचीन असतील, तशा काही अर्वाचीन परंपराही आहेत. नव्या राजकीय तत्त्वज्ञानांनी कथांच्या स्वरूपाच्या नसल्या तरी कल्पनांच्या स्वरूपाच्या myths निर्माण केलेल्या आहेत. या सर्वांना पर्यायी योग्य शब्दाच्या अभावी मी पुराणकथा असे स्थूल नाव देतो. या पुराणकथा ललित वाङ्मयाला नेहमी उपकारक होत आल्या आहेत. रामायण, महाभारत, भागवत यांतील कथांनी भारतीय ललित वाङ्मय

९८ पायवाट