पान:पायवाट (Payvat).pdf/105

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

नेहमीच प्रभावित केले आहे. भास-कालिदासापासून अगदी आजच्या शिरवाडकर, कानिटकर, शिवाजी सांवत यांच्यापर्यंत. 'उरुभंग', रघुवंशा'पासून 'ययाती', 'मृत्युजंया'पर्यंत हा वाङ्मयाचा फार मोठा प्रवाह आहे. या प्रवाहात सफल-असफल अशा दोन्ही प्रकारच्या साहित्यकृती आहेत. अस्सल कलाकृती या प्रवाहात निर्माण झाल्या, यापुढेही निर्माण होतील. या पुराणकथांना नवा अर्थ देण्याचा प्रयत्न सतत चालूच असतो. या प्रयत्नातूनच खांडेकर आजच्या भोगलोलुप व विस्कळित व्यक्तिमत्त्वाच्या माणसाचा प्रतिनिधी म्हणून ययातीकडे पाहतात. विंदा करंदीकर ईव्हला ज्ञानजिज्ञासेचा व सत्यनिष्ठेचा प्रारंभ मानून तिचे पाप पुण्याहून अधिक उज्ज्वल ठरवितात. अहिल्येच्या शिळा होण्यात त्यांना आत्यंतिक तृप्तीचा साक्षात्कार दिसतो. यंदाच निघालेल्या 'अमृतवेल' मध्ये खांडेकरांनी अश्वत्थाम्याला व इरावतीबाई कर्वे यांनी गांधारीला नवा अर्थ देण्याचा प्रयत्न केला आहे.

 हे प्रयत्न कधी कलादृष्ट्या यशस्वी होतात, कधी होत नाहीत. या धडपडीचे एक कारण असे असते की, कलावंतांना प्रतीकांचा मोह असतो. त्यांना परंपरा सर्वस्वी सोडता येतच नाही. इच्छा असली तरी ते त्यांना शक्य नाही. मग कवी परंपरेचा एक भाग नाकारतात व एका भागाशी आपला सांधा जोडतात. इलियट उत्तरकालात असा आपला सांधा पोपशी जोडतो. मकर रामदास-तुकाराम यांच्याशी आणि केशवसुत मोरोपंतांशी असा सांधा जोडीत असतात. ही एक धडपड असते. परंपरेला जपण्यात, तिला नवा अर्थ देण्याचा प्रयत्न करण्यात कलावंताला कोणतेतरी समाधान लाभत असले पाहिजे. पण शेवटी पुराणकथांचे ललित वाङ्मयात स्थान कोणते ? इसापाच्या कथेतील कोल्हा किंवा खलिल जिब्रानच्या कथेतील मासा व सुसर हे प्राणी नसतातच. ती प्रतीके असतात. 'क्रौंचवध' असे रूपकाला नाव देऊन सामाजिक कादंबरी लिहिली काय, किंवा 'ययाती' हे नाव देऊन पौराणिक कादंबरी लिहिली काय, आजचा आशय सांगण्यासाठी उचित प्रतीके रचण्याची ही धडपड आहे. वाङ्मयाच्या विश्वात हा प्रतीक हुडकण्याचा उद्योग विविध थरांवर चालू असतो. 'मला मदन भासे हा' ह्या उत्प्रेक्षेपासून कादंबरीचे किंवा कथेचे नाव देईपर्यंत हा उद्योग चालू असतो. 'एकच प्याल्या 'पासून तो 'पॅराडाईज लॉस्ट 'पर्यंत वेगवेगळ्या थरांवर हा व्यापार आहे. हा व्यापार आशयाला कलापूर्ण रूप देईल, सजवील, उत्कट आणि प्रभावी करील. रूपकात कोंबण्याचा अट्टाहास कधी आशयाला शिथिल, विस्कळित व परिणामशून्य करील. पण याहून अधिक पुराणकथांना काही करता येणे शक्य नसते. पुराणकथा फार तर नवे वैचारिक दर्शन घडवू शकतील. आजचा सामाजिक प्रक्षोभ व्यक्त करण्याला पुराणकथा कशा उपयोगी पडतील ? लिंगायतांना शिवाचा, महानुभावांना कृष्णाचा, जैनांना तीर्थकराचा व बौद्धांना बुद्धाचा अभिमान असल्यास ते मी समजू शकतो. हिंदू पुराणकथा मोक्ष देणार नाहीत, महानुभाव पुराणकथा मात्र मोक्ष देतील हे विधान धार्मिकांचा आग्रह म्हणून ठीक आहे. त्याच धर्तीचे दुसरे एक विधान आहे- हिंदू पुराणकथांनी ललित साहित्याला जखडले

आजचे मराठी साहित्य सामाजिकदृष्ट्या पुरेसे प्रक्षोभक आहे काय ? ९९