पान:पायवाट (Payvat).pdf/103

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मानले जावे, असा हा प्रकार आहे. यामुळे उतरंडीची समाजरचना बदलत नसते हे विसरून जाऊन विचार करण्यात अर्थ नाही. इसवी सनापूर्वीचा हिंदुधर्म हा काही काळानंतर प्रगतीला अडथळा ठरला, हे खोटे नाही; व त्याने प्रगतीचे सर्व मार्ग हजार वर्षे अडवून धरले, हे नाकारण्यातही अर्थ नाही. पण तसाच इसवी सनापूर्वी निर्माण झालेला बौद्धांचा धर्म आहे.
 आजच्या जगात हा धर्म प्रगतीच्या नव्या वाटा कशा दाखवून देणार ? हिंदुधर्म शाक्त, शैव, वैष्णव तंत्रमार्गात, वामाचार-अभिचारांत मध्ययुगात अधःपतित झाला हे जसे इतिहासाचे एक सत्य आहे, तसेच त्याच मध्ययुगात बौद्धधर्मही मंत्रयान, वज्रयान या स्वरूपात अधःपतित झाला हे दुसरे सत्य आहे. हा सगळा इतिहास मुद्दाम सांगण्याचे कारण आहे. अस्पृश्यांनी बौद्धधर्माचा स्वीकार करावा की करू नये, याविषयी मत देण्यासाठी हा इतिहास उगाळलेला नाही. याचा निर्णय त्या समाजाने स्वतः करावयाचा आहे. पण हिंदूंच्या ब्राहाणी वाङ्मयपरंपरा, त्यांतून शतकानुशतके चालत आलेल्या पुराणकथा ( myths ) बाजूला सारल्याच पाहिजेत. त्यांच्या प्रभावातून मन मोकळे झाल्याविना व बौद्धधर्माच्या पुराणकथांना काव्याचा आधार केल्याविना वाङ्मयाची कोंडी फुटणार नाही असे सांगण्याचा जो प्रयत्न केला जात आहे, त्याच्याशी मतभेद दाखविण्यासाठी धर्माच्या इतिहासाकडे बोट दाखविणे भाग पडते. एक पुराणकथा गेली आणि दुसऱ्या पुराणकथा आल्या, म्हणजे कार्यभाग होत नाही. पुराणकथांचे बदल वाङ्मयाची कोंडी फोडू शकणार नाहीत. प्रत्येक पुराणकथेला स्वतःची परंपरा असते.
 ज्या समाजात जातीचे जन्मजात उच्चनीच भाव आहेत, त्या समाजात वरिष्ठ वर्गाच्या मनात कनिष्ठ समाजाविषयी तुच्छतेची भावना असणार हे ओघाने आलेच. पण हे वास्तविक जीवनातील सत्य वाङ्मयात कसे आविष्कृत होईल त्याचा नेम नसतो. अमेरिकन वाङ्मयात नीग्रांचे चित्रण उपहासास्पद, हास्यास्पद, तिरस्करणीय म्हणून किंवा खलनायक म्हणूनच येत असे. मिसेस स्टोवसारखी लेखिकासुद्धा सहानुभूती, दया, अनुकंपा यांबाहेर जाऊ शकली नाही. आपल्याकडे कनिष्ठ जातींचे चित्रण संस्कृत वाङ्मयात असेच असते, असा एक मुद्दा चर्चेच्या ओघात मांडला गेला. मी नम्रपणे या प्रतिपादनाशी मतभेद दाखवू इच्छितो. अमेरिकन वाङ्मयात काय होत असे, त्याची मला माहिती नाही. त्या वाङ्मयाशी माझा पुरेसा परिचय नाही. पण संस्कृत वाङ्मयात मात्र हास्यास्पद व मूर्खशिरोमणी हा नेहमी विदूषकच असतो व विदूषक नेहमी ब्राह्मण असावा असा नियम आहे. संस्कृत नाटकांचा लेखकवर्ग हा ब्राह्मण लेखकवर्ग होता. योगायोगाने या लेखकांनी उपहासास्पद म्हणून जो नमुना उभा केला आहे, त्याचीही जात ब्राह्मणच ठरविलेली आहे, ही घटना आपण नीट समजून घेतली पाहिजे.

 ब्राह्मण लेखकांनी विदूषक ब्राह्मण रंगवला, हा त्यांच्या दयाळूपणाचा अगर सज्जनपणाचा भाग नव्हे. एखादा ब्राहाण तपस्वी, ज्ञानी, विचारवंत असे, त्याचे स्थान व्यक्ती म्हणून त्या समाजात कसेही असो. ब्राह्मणवर्ग हाही एक समाज होता. एक

आजचे मराठी साहित्य सामाजिकदृष्ट्या पुरेसे प्रक्षोभक आहे काय ? ९७


 पा...,७